Sunday, 24 June 2018

प्लास्टिक बंदी

च्यामारी अलीकडं आनं पलीकडं बी बंदी म्हणलं की अंगावर सारकण काटाच येतुया. त्यात भर म्हनून आता ही पॅस्टिक बंदी. तसं पॅस्टिक बंदीला आपला इरोध नाय हाय पण पॅस्टिक बंद झाल्यामुळं लय गोची हुतीय बगा. गेल्याचं आठवड्यात आमचं बंड्या दुकानात जाऊन लाज काडून आलंय. गोडं तेल आणायला हात हालवत मोकळच गेलंय. १५ मिंट झालं तरी दुकानदार ध्यानं दिना म्हणून तेला कावालत. दुकानदार शांत पण म्हणलं पॅस्टिक पिशवी बंद हाय वंजळीत भरून नेतूस. तोंडात मारल्यावाणी पोरगं परतं. तवा पसन नाराज हाय. बंड्या म्हणतंय पॅस्टिक बंद हुतयच कसं. कारण तेनं कवाच घरातन पिशवी नेली नाय आनं अचानक असं म्हणजी? तेचं बी खरं हाय म्हणा पॅस्टिक म्हंजी घरातल्याचं माणसासारखा हाय. कुठ्ल्याबी कामात गरज पडतीयाच की. आमच्या आय नं तर घरात चांगल्या चांगल्या पिशव्या घडी घालून ठेवल्या हुत्या आमी मागितलं तरी बी चांगली पिशवी कवा देत नाय. येवढा जीव हुता तिचा पॅस्टिक पिशवीवर.
        काल लईच वाईट वेळ आली आमच्यावर, ते खालच्या गल्लीच 'विक्या', तेचा हॅप्पी बडडे हुता. मग काय पार्टी, आमी बी फुकटच जेवायला भाया माग सारून हजर. जेवायला बसल्यावर पंचायत झाली राव पॅस्टिक बंदीमूळ पॅस्टिकच्या ताट, वाट्या, गलास बंद त्यामुळं पत्रावळीवर वाढलं. रस्सा भातात वतला की दुसऱ्या बाजूनं डायरेकट्ट मातीत. तवा आता कुणाच्यात जेवायला आपली ताट-वाटी घिऊन जावा नाहीतर उपाशीच बसायला लागलं. 'परशा' न तर पॅस्टिक बंदीची हापकीच खाल्लीय. ते हाय ढापन तेचा चस्मा हाय पॅस्टिकचा. बंदीमुळं ते चस्मा बी घालनां तेला वाटतंय सापडलं तर दंड व्हायचा.
पॅस्टिक बंदीच्या नादात 'पम्या' न घरात मार खाल्ला. तोंडात कायम चघळायची पुडी खिशात राहिली आनं पॅस्टिकची पिशवी नसल्यानं खिशावर डाग. मग काय काकून धू-धू धुतला बिचाऱ्याला.गल्लीतली पोरं म्हजी दुसरी SBI. पॅस्टिकच्या पिशवीच्या रंगावरण कुणाच्या घरात काय आणलं ते वळकत्यात पण आता ते बी कळना कारण सगळ्याला एकच पिशवी वापरत्यात आता. तरी बरं दुधाची पिशवी चालत्या म्हणून नायतर पावसाळ्यात मोबाईल ठेवायचा कुठं ही पंचायत झाली असती. सगळा पावसाळा कुंबडी सारखा घरातच गेला असता. आमची तेवढी तरी सोय बघितल्याबद्दल मंडळातर्फे जाहीर आभार.
          या बंदीचा फायदा घेत कोपऱ्यावरच्या दुकानदारानं कापडाच्या पिशव्या २० रु ला एक देतंय. आता २० रु ची पिशवी घ्यायला आमी काय खुळ हाय व्हय. तेच्या पेक्षा आमच्या जुन्या बनियान, शर्टाची पिशवी शिवल आय आमची.
       मराठी शाळ पुढंन येताना ऐकलं, गुरुजी  पॅस्टिक बंदी का महत्वाची हाय ते सांगत हुतं. पर्यावरणाची कि काय ती हानी हुतीय म्हणं. अपल्यासनी तरास हुतुय म्हणं या पॅस्टिकनं. आम्हास्नी कवा कळलं नाय. पण गुरुजी सांगत्यात म्हंजी १०० आण खरं. हे सगळं खरं असलं तरी २ प्रश्न हायती पॅस्टिक बंदीमुळं मटण, चिकण आणायला डबा चाललं पण मासे आणायला केवढा डबा न्यायचा हे कळतंच नाय.आनि गावाला जाताना वल्ली कापडं कशातन न्यायची. बघा तुमाला उत्तर सापडलं तर सांगा आमास्नी बी.
    बाकी पॅस्टिक बंदी झालीच पाहिजे. तुमी बी पॅस्टिक वापरत नाय ना, वापरायलाच नाय पाहिजे. तवा आता बाहेर जाताना आपली कापडाची पिशवी न्या. "पॅस्टिकच्या धोका, अणुयुद्धापरास मोठा."
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

Sunday, 3 June 2018

भारतात 5G येणार

हाय फ्रेंड्स..बघता बघता उन्हाळा संपत आला. परीक्षा, आयपीएल चा सिझन संपलासुद्धा आणि आंब्याचा सिझन जवळपास संपत आला. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे वातावरणात ऋतू बदलाचे वारे वाहू लागले आहे.
         वातावरणातील सौम्यतेमुळे गप्पाचे अड्डे पुन्हा रंगू लागले आहेत. सगळेच फ्री असल्यामुळे वेळेची कमतरता जाणवतच नाही. गप्पा रंगल्या कि कधी-कधी त्याचा पतंगच होतो. अशाच गप्पा रंगल्या होत्या. 'सच्या' एक वायर घेऊन आला " भावांनो भारतात 5G येणार". गप्पांचा विषयच पालटला. मोबाईल आणि इंटरनेट हे तर 'जवा दिलो की धडकन' म्हणजे अगदी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाबरोबर मोबाईल आणि इंटरनेट हि लागतेच इतका जिव्हाळ्याचा विषय. जीवनातील आवश्यक गोष्टीतील  Compulsory वस्तू म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट शिवाय मोबाईल 'किस काम का'. 'सच्या' ने छेडलेल्या विषयात 'परश्या' उतरला, "होय रे मी पण ऐकलंय".  तेवढ्यात अभ्यासातला किडा 'राहुल्या' नेहमीच्या नारीजीच्या स्वरात म्हणाला " मग त्यानं काय फरक पडणार आहे. आताही इंटरनेट आहेच की, 4G मुळे स्पीड पण आहे". यावर मात्र आमचा इंटरनेट तज्ञ 'विक्या' चिडला, "तुला काय कळतंय त्यातलं, 5G आलंच पाहिजे. इंटरनेट चे स्पीड भयानक वाढेल. आता आपल्याला 3 तासाचा पिक्चर डाउनलोड करायला अर्धा-एक तास लागतो पण 5G आल्यावर तो 3 तसाचा HD पिक्चर 1 सेकंदात डाउनलोड होईल. जग आणखी जवळ येईल कळलं का? म्हणे काय फायदा?" 'विक्या' आवेशात 5G ची वकिली करत होता जस काय टेलिकॉम कंपन्या 5G चा ब्रँड एम्बेसडर करणार आहेत. फायद्या-तोट्याच्या जुगलबंदीत 5G ची चर्चा रंगतदार झाली.
           भारतात 2019 पर्यंत 5G येण्याची शक्यता आहे. पण याची सुरुवात 1G पासून झाली होती हे आपल्याला माहीतच नाही. त्याचा वापर फक्त कॉलिंग साठी होत होता. त्यानंतर 2G आले त्यात sms व इतर सुविधा आल्या. 3G आले व इंटरनेट युगात क्रांती झाली. ब्राउजिंग, ईमेल, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअरिंग आले. माणसाबरोबर फोनही स्मार्ट झाला. त्यानंतर 4G आले व स्मार्ट फोन चा वापर आणखी स्मार्ट झाला. स्पीड वाढले दररोजच्या 1 ते 1.5 gb डाटाने आपल्याला खिळवून ठेवले. 4G चा सरासरी वेग 12mbps इतका आहे. आता मात्र या सर्वांच्या पुढची जनरेशन म्हणजे 5G येत आहे. याचे स्पीड साधारण 20gbps इतके भयानक असणार आहे. 2019 च्या शेवटीपर्यंत 5G भारतात येईल. याचा अर्थ असा की 4G सर्वत्र पोहचयच्या आधी 5G भारतात येईल. 4G पेक्षा 20 पट वेग वाढल्यामुळे कोणतीही माहिती पाठवण्यासाठी 1 मिलीसेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. 5G मुळे देशातील बहुतेक सुविधा इंटरनेट च्या माध्यमातून पुरवल्या जातील. सेल्फ ड्राइविंग कार, रिमोट कंट्रोल सर्जरी, आर्थिक व्यवहार जास्त सोपे होतील.
      5G च्या बातमीमुळे पोरं मात्र जाम खुश आहेत. येणाऱ्या स्पीड ची कल्पना करून 5G ची आतुरतेने वाट बघत आहेत कारण आपल्याला 'थोडा और' पाहिजच असते. आत्ताच कामाच्या व्यापात पोरांना 1.5Gb डाटा पुरत नाही. बघू 5G आल्यावर काय होते ते पण या 3G, 4G,5G च्या नादात जीवनातील 'जी' मात्र हरवता काम नये.
-----------------------------------------------------------
संदीप.....
sandip.koli35@gmail.com

Friday, 1 June 2018

पालक आणि पालकत्व Parent and Parenthood

पालक आणि पालकत्व

  जागतिक पालक दिनानिमित्त......
                फोन ठेव आणि पुस्तक घे.... बास कर आता ते गेम खेळणे....! बंद कर ते युट्युब....! फोन ला हात लावू नकोस....! फोन बाजूला ठेवा आणि जेव आता....! तुमच्या आमच्या घरात मुलांशी संवाद हल्ली याच त्रासिक वाक्याने सुरू होतात व त्याचे पर्यावसन रागात व आदळ-आपटीे होते. पण प्रश्न काही सुटत नाही.
              मोबाईल चे व्यसन हे  आजच्या कुटुंबापुढचा यक्ष प्रश्न बनला आहे. आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते शाळा-कॉलेजच्या पाल्यापर्यंत हे व्यसन तितकेच गंभीर बनले आहे.यात लहान मुलांच्यामध्ये प्रचंड आकर्षण आहे. मग ते गेम खेळण्याविषय असो, फोटो पाहण्याविषयी असो, गाणी, व्हिडिओ पाहण्याविषयी असो, वा काही मनोरंजनात्मक अँपविषयी असो.... आपल्या घरातल्या चिमुरड्यांना उठल्यापासून झोपेपर्यंत हा स्मार्टफोन लागतोच. झोपेतून उठल्यावर मुड ठीक करण्यासाठी, जेवण करताना, दुपारी गेम खेळायला, काही खाताना मोबाईल शेजारी हवा असतो. शेवटी  झोप यावी म्हणून ही मोबाईल उशाशी हवाच असतो.
         मुले लहान असताना त्यावेळी पालक म्हणून आई-वडिलांना त्यांचे फार कौतुक वाटते. इतक्या लहान वयात आपलं बाळ किती सहजपणे मोबाईल हाताळते याविषयी कुतूहल वाटते. बाळाचं फोन वापरणे, फोटो पाहणे, गाणी, व्हिडिओ चालू करणे. पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सहज लक्षात ठेवून काढणे ही आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता प्रत्येक आई-वडिलांसाठी काही काळ अभिमानाची गोष्ट ठरते. पण जस-जसे आपल्या मुलांना मोबाईलची सवय पडून त्याचे व्यसन लागते तशी तशी पालक म्हणून अभिमानाची वाटणारी बाब आता डोकेदुखी ठरू लागते. व काळजीचा विषय बनते. आपल्यातील सुज्ञ पालक जागा होतो मोबाईल चे दुष्परिणाम दिसू लागतात. मग पालक म्हणून आपण बैचेन होतो. मोबाईल चे प्रमाण कमी करायला हवे याचा विचार करतो. एकमेकांना दोष देतो. तुझ्या लाडामुळे झाले म्हणून एकमेकांकडे बोट दाखवतो.आपण झटक्यात मोबाइल बंद करतो. पण ते तितके सोपे राहत नाही. मुले हट्ट करतात, चिडचिड करतात, रडतात, आदळा-आपट करतात, रुसतात, जेवत नाहीत, मग आपण पुन्हा वात्सल्यापोटी माघार घेतो. कमी-जास्त प्रमाणात हर घर की यही कहाणी है।
         आपल्या घरातील ही चिमुरडी हल्ली या फोन समोरून उठतच नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्टीत फोन हवा असतो. अगदी घरातील खेळण्यांना ही मुले हात लावत नाहीत. मोबाईल हे एक खेळणे हातात असते व बाकीच्या खेळण्यांना अडगळीची जागा दाखवलेली असते. १०-१५ वर्षांपूर्वी लहान मुलं इतकी खेळायची की आई-वडिलांना त्यांना घरात ओढून घेऊन जावे लागत होते. पण आता मुले बाहेरच पडत नाही. ही मोबाईल ची ओढ असली तरीही यात पालकाची भूमिका महत्त्वाचीं आहे.
          २१ व्या शतकात आपल्याबरोबर फोन पण स्मार्ट झाला व बोलण्याबरोबर फोनचे अनेक उपयोग समोर आले. त्यामुळे आपल्याला त्याचा मोह झाला व गरजही बनली. घरात ही पालक म्हणून आपला फोनचा वापर खूप वाढला आहे. आपल्या पाल्यांच्या समोर आपण मोबाईल, सोशल मीडिया यासाठी आपण बऱ्याच वेळ देतो. नकळत आपल्या पाल्यांनाही त्याचे आकर्षण वाढते. व मोबाईल ची सवय होते. पालकांच्या बरोबर घरातील इतर ही व्यक्ती मोबाईल ला अधिक महत्त्व देतात. शिवाय मोबाईल चे स्वतःचे खिळवून ठेवणारे गुण आहेतच. त्यामुळे मुले सहज आकर्षित होतात.
            याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे संशोधन सांगते. पालक म्हणून आपण काही बंधने पाळणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा मुले फार त्रास देतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. कधी घरात फोनची संख्या जास्त असेल तर मुलांना फोन उपलब्ध होतात. घरात असताना आपल्या फोनची इंटरनेट बंद ठेवायला हवे. मुलांना घडवणे ही फक्त आईची जबाबदारी नसून दोघांची आहे हे पाळणे तितकेच गरजेचे आहे. मुलांना वेळ द्यायला हवा. गोष्टी, छोटे खेळ, नवीन ठिकाणे यांची माहिती द्यायला हवी. त्यांच्याशी बोलायला हवे. त्यामुळे मुले वेगळ्या गोष्टीत गुंतून राहतात. व यातून बाहेर पडायला मदत होईल.
                आपले पाल्य आपला अंश असतात. वस्तू खरेदी करताना शंभर वेळा चौकशी करणारे आपण पाल्याच्या बाबतीत तितकेच चौकस असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण आपल्या पाल्याला द्यायची असेल तर ती आहे 'वेळ' आणि फक्त 'वेळ'.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी .....
  9730410154
sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...