Sunday, 30 August 2020

शिक्षक दिन (मराठी निबंध )Teachers Day

 

शिक्षक दिन

"गुरुविण कोण दाखविल वाट,

आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर-घाट"

               आई-वडील या आपल्या पहिल्या गुरु नंतर आयुष्याच्या गाडीला योग्य वळण देणारी देवता म्हणजे आपले शिक्षक होय.

             गुरु-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून शिक्षकांना मानाचे व महत्त्वाचे स्थान आहे. 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षकाप्रति आदर व्यक्त करण्यासाठी व त्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

              आपल्या प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे एक महत्त्वाचे स्थान आहे. समाजामध्ये शिक्षकाविषयी एक विशेष आदर आहे. राष्ट्र घडविण्यामध्ये व राष्ट्रनिर्माणयामध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. घरातील सुरक्षित वातावरणातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर शाळेत गेल्यापासून शिक्षकांबरोबर घडण्याचा सुरू झालेला हा प्रवास स्वतःच्या पायावर सन्मानाने उभे राहण्यापर्यंत सतत सुरू असतो. आपल्या मनातील भीती दूर करून आपल्या नजरेत आत्मविश्वास भरून ज्ञानसागरामध्ये तरुन राहायला शिक्षक आपल्याला शिकवतात.

             , , , ई पासून सुरू झालेली ही सुरुवात आपल्या आयुष्यात यशस्वीते पर्यंत चालूच असते. कोणत्याही देशाचे भवितव्य हे देशातील शिक्षकांच्या हाती असते.  देशाच्या उन्नतीसाठी लागणारे डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनीअर, वकील, पोलिस, लेखक, सुजान शेतकरी यासारखे अनेक विद्यार्थी घडवून देशासाठी उज्वल पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्यावर असते. त्याप्रमाणे शिक्षक देशासाठी सामर्थ्यवान व संस्कारक्षम पिढी घडवीत असतात.

            आई-वडिलांच्यानंतर शिक्षकच आपल्याला समजावून घेऊन नवनवीन ज्ञान देत असतात. आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. आपल्याला ज्ञान देण्याबरोबरच आपले व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये, आपल्याला संस्कारक्षम बनविण्यामध्ये, आपल्याला शिस्त लावण्यामध्ये आपल्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.  सर्व गुणांनी संपन्न बनवून जगासमोर आत्मविश्वासाच्या ताकदीने उभे राहण्यास आपले शिक्षक आपल्याला शिकवतात.

              आपल्या जीवनातील शिक्षकांचे हेच महत्व समजून घेण्यासाठी शिक्षक दिन साजरा करतात. अनेक शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाप्रति आदर व सदभावना व्यक्त करण्यासाठी या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना फुल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, भेट कार्ड देऊन त्यांचा सन्मान करतात. त्याबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. शिक्षकांविषयी विद्यार्थी मनोगते व्यक्त करतात. अनेक ठिकाणी विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दिवशी स्वतः शिक्षक होऊन ज्ञानदानाचे काम बजावतात.

              गुरू-शिष्याचे हे नाते पवित्र आहे. आई-वडिलांच्या नंतर शिक्षक हे पालकासमान असतात.  काळ बदलला, नवनवीन साधने आली तरी गुरुचे,  शिक्षकांचे महत्त्व कमी होत नाही व होणार नाही.  प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील शिक्षकाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.

              5 सप्टेंबर हा आपल्याला घडवणाऱ्या व आपल्याला ज्ञानामृत देणाऱ्या आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण आपल्या शिक्षकाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण या शिक्षक दिनाच्या निमित्ताने कायम त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या कार्याचा गौरव व  आदर नक्की करूया.

 धन्यवाद...

--------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी.

sandip.koli35@gmail.com


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...