Tuesday, 14 September 2021

तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची....

 

तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची....

 

                  इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरत असताना दोन दृष्टिहीन दिव्यांग मुलगा- मुलगी आपल्या चटकन नजरेत आली असतील. अगरबत्ती व कापूर विकणारी ही जोडी म्हणजे करीम आणि अनिशा.  चंदूरला राहत असणारी ही जोडी दररोज सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 - 6 वाजेपर्यंत  इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरून अगरबत्ती व कापूर विकून सन्मानाने जगत आहे. अगरबत्ती 15 रुपये व कापूर 10 रुपये या फिक्स दराने या दोनच वस्तू ते दिवसभर विकतात. स्टँड पासून डेक्कन पर्यंत, तर कधी शाहू पुतळा-ASC कॉलेज पर्यंत, तर कधी जनता चौक, महात्मा गांधी पुतळयापर्यंत, एकमेकांना आधार देत- एकमेकांचा आधार होत या रहदारीच्या रस्त्यावर त्यांचा उद्योग मोठ्या आनंदात व उत्साहात सुरू असतो.

              करीम पदवीच्या पहिल्या वर्षात तर अनिशा बारावी कॉमर्स झाली आहे. बोलताना विनम्र व सभ्य बोलणारी ही जोडी जगण्याचा नवा उत्साह देते.

            दोन मिनिटे अंधार झाला तरी आपल्याला चाचपडायला होते पण आयुष्याच अंधारमय असताना करीम व अनिशा त्यावर मात करून जगण्याचा नवा मंत्र देतात. सर्व काही असताना एखादी गोष्ट करताना अडचणींचा भला मोठा पाढा आपल्याला तोंडपाठ असतो. नकाराची इतकी कारणे आपण तयार केलेली असतात की त्या नकाराचे ओझे आपल्या मानगुटीवर बसलेले असते.

               आपल्या सभोवती करीम-अनिशा सारखे उर्जास्त्रोताचे  अखंड झरे पाहिले की आपल्या नकाराचे मुखवटे आपोआप गळून पडायला हवेत. अडचणी पाहून नकाराची घंटा वाजवत पळून जाण्यापेक्षा याच अडचणीच्या छाताडावर नाचून त्यावर मात करायला अशी ऊर्जा स्त्रोत प्रेरणा देतात.

" ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं।

इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है।"

         त्या दोघांकडे बघितले की आपल्या काही अडचणी व समस्या शुल्लक वाटू लागतात. आयुष्य आव्हानांनी भरलेले असावे आणि अशी सर्व आव्हाने आपल्याला पेलता यावेत ही सकारात्मक ऊर्जा ही मुलं देतात.

"जो वळखीतसे औक्ष म्हणजी मोठी लडाई

अन हत्याराच फुलावानी घाव बी खाई

गल्यामंदी पडल तिच्या माळ इजयाची

तु चाल पुढ तुला र गड्या भीती कशाची, पर्वा बी कोणाची"

 

(टीप- सदर पोस्ट ही आपण त्या दोघांना  मदत करावी म्हणून नाही तर आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणून लिहिली आहे. बाकी दोघे आत्मनिर्भर, प्रचंड उत्साही व आपल्या कष्टात व कामात आनंदी आहेत)

 ---------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप कोळी

Sandip.koli35@gmail.com

(सदर छायाचित्र दोघांची परवानगी घेऊन घेतले आहे.)


Tuesday, 11 May 2021

Such innocence must last : इतकी निरागसता टिकायला हवी

 

इतकी निरागसता टिकायला हवी....

                   लॉकडाऊन म्हणजे सक्तीची सुट्टी.  वेळ जात नव्हता म्हणून शेतात फेरफटका मारायचा बेत ठरला. फिरत असताना सायंकाळी 6 च्या सुमारास शेताच्या एका कोपऱ्यात पक्षांचा गलका सुरू होता. थोडं बारकाईने बघितल्यावर लक्षात आले की ससाणा खाली बसला होता. सुरुवातीला वाटले त्याला इजा झालीय म्हणून तो बसला आहे पण पक्ष्याच्या गोंधळामुळे तो उडून जाऊ लागला पण पायात काहीतरी होते त्यामुळे त्याला उडता येईना. शेवटी पक्ष्याच्या गोंधळा मुळे तो ससाणा उडून गेला.

                  उत्सुकतेपोटी  अर्णव आणि मी त्या जागेवर पोहचलो. आमचा अंदाज खरा ठरला. त्या ससाण्याने छोटा ससा पकडला होता पण तो त्याला घेऊन जाता आला नाही. तो ससा तिथेच पडला होता. ते पाहून अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. "बाबा तो जिवंत आहे त्याला वाचवूया, त्याला पाणी देऊया, त्याला घरी नेऊया, मी त्याला गवत देतो" अशी त्याची केविलवाणी धडपड सुरू होती. मी त्याला समजावले त्या पक्ष्याने चोचीने त्याला इजा केली आहे, ते पिल्लू छोटे आहे, घरी घेऊनही ते जगणार नाही. आपण त्याला फार काही मदत करू शकणार नाही.

                 अर्णव मात्र ऐकायला तयार नव्हता, शेवटी त्याचा केविलवाणा चेहरा, त्याची संवेदनशीलता व त्याची निरागसता पाहून त्याला पाणी पाजून, हळद लावूया व पुन्हा त्याला त्या ठिकाणी सोडुया यावर या माझ्या सल्ल्यावर  तो जड मनाने तयार झाला.

                आम्ही त्याला थोडे पाणी पाजले, काही ठिकाणी रक्त येत होते तिथे हळद लावली. मात्र त्या सस्याला खूप इजा झाली होती त्याची मान सरळ होत नव्हती. काही वेळ त्याने धडपड केली पण थोड्या वेळातच त्याचा जीव गेला.

                 अर्णवच्या डोळ्यात त्याला वाचवता आले नाही याचे दुःख व त्या ससाण्याविषयी प्रचंड राग होता. पण हाच निसर्ग आहे व त्याचे नियम सर्वांना लागू असतात हे त्याला पटत नव्हते. अंधार झाला तरी तो घरी यायला तयार नव्हता.

                एखाद्याला इतक्या सहज मदत करावी ही त्यांच्यातील भावना पाहून बाप म्हणून अभिमान वाटला. आयुष्यात प्रत्येक प्रसंगी इतकं निरागस राहून इतरांना मदत करायला यायला हवे. अर्णव ची इतकी निरागसता वाढत्या वयाबरोबर  टिकून रहावी हीच इच्छा....

 

( टीप : छायाचित्र यासाठी की अर्णवच्या डोळ्यात दिसणारी मदतीची तळमळ सुखावणारी  होती )

संदीप कोळी

sandip.koli35@gmail.com




Tuesday, 27 April 2021

Everything has to be done by me : सगळं ‘मी’ च करायला हवे

 

सगळं ‘मी’ च करायला हवे

                    एक दिवस उजाडतो. आपल्या समोर कामाचा डोंगर अचानक उभा राहतो. हे काम करू, का ते काम करू का ते करू, सगळा गोंधळ उडतो. क्रम ठरवायला गेलो  तर सर्वच कामे महत्वाची वाटू लागतात. मग कोणते काम प्राधान्याने करायचे व कोणते नंतर करायचे हेच लवकर ठरत नाही.

                   मनाचा गोंधळ उडतो. धावपळ व्हायला लागते. हे करू कि ते करू यात कोणतेच काम धड्से होत नाही.  प्रथम कोणते काम करायचे हे ठरवायला व आपले काम तर ठरतच नाही व  आपले काम न ठरता आपला बराच वेळ फक्त ठरवण्यात जातोय हेच समजायला बराच वेळ जातो.

                  तसे बघायला गेले तर हा सर्व पसारा व कामाचा डोंगर आपणच उभा केलेला असतो. फक्त त्या-त्या वेळी आपल्या कामाचा योग्य पाठपुरावा करून काम पूर्ण न केल्यामुळे ती कामे आपल्या पुढे ब्रह्म म्हणून अचानक उभी राहतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो.

                  मुळातच प्रत्येक गोष्ट आपल्या साठीच आहे , प्रत्येक वेळी ती आपणच करायला हवी व आपल्यालाच मिळायला पाहिजे. कदाचित या सर्वाचा एकत्रित परिणामातून अनेक प्रश्न निर्माण होत असतील. बहुतेक वेळा आपल्या अतिमहत्वकांक्षेचा हा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो व आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.

                 आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला हवी. निसर्गाचा एक अंतिम नियम आहे. आपण नव्हतो त्यावेळीही जगाच्या सर्व क्रिया सुरळीत सुरु होत्या, सध्या  आपण काहीही केले नाही तरीहि हे सर्व सुरळीत असणार आहे व उद्या आपण नसल्यावरही हे सुरूच राहणार आहे.

           फक्त आपला एक मोठा गैरसमज आहे कि “सगळं मी च करायला हवे.”

कदाचित हाच आपल्या समोरील प्रश्न व हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल!!!

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

Friday, 9 April 2021

Guddhi Padwa : गुढी पाडवा

 

गुढी पाडवा

‘जुन्या दुखःना मागे सोडून

स्वागत करा नववर्षाचे

गुढी पाडवा घेऊन येतो क्षण  

प्रगती व आनंदाचे’

 

                 आपल्या भारत देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणूनही ओळखले जाते. भारतीय पंचागानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. गुढी पाडवा हा चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी महाराष्ट्रा बरोबर भारतातील अनेक प्रांतामध्ये साजरा केला जातो.

              परंपरेनुसार मानले जाते की, गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रम्ह देवाने विश्वाची निर्मिती केली होती. तसेच दुसऱ्या कथेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी भगवान श्रीराम आपला १४ वर्षाचा वनवास भोगून आणि रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परत आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील जनतेने गुढ्या आणि तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले होते.

                 महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवले जाते, गुढीच्या काठीला कडुलिंबाची डहाळी किंवा आंब्याची पाने बांधतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. पाटाभोवती सभोवती रांगोळी घातली जाते. तयार केलेली गुढी दारात किंवा उंच गच्चीवर लावतात.

                गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करतात. घरात गोड गोड पदार्थ करतात.  आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा तसेच  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात.

               चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते

                   गुढी पाडव्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. विद्यार्थी आपल्या पुस्तकाचे पूजन करतात. पालक आपल्या मुलांना गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शाळेत दाखल करतात. गुढी पाडवा हा दिवस हिंदू पंचागानुसार असणाऱ्या साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन जागा, वास्तू , वस्तू, वाहन, दागिने खरेदी केले जातात. असे मानले जाते कि, या दिवशी हातात घेतलेले काम यशस्वी होते.

                      गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. या वेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. गुढी पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते

                  गुढी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. हा सण प्रसन्नतेचा साज घेऊन येतो. गुढी पाडवा हा सण विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढी पाडवा हा सण गोड धोडाचा, पंचाग पूजेचा,  चैत्र पालवीने नटलेला आणि वसंत ऋतूच्या आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपणा सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

 

 

 

 

Monday, 29 March 2021

You don't even notice... : आपल्या लक्षातही येत नाही...

 

आपल्या लक्षातही येत नाही......

              आपल्या दररोज पाहण्यातील झाडांची शरद ऋतूत पानगळ होऊन वसंतात नवी पालवी येऊन ती झाडे पुन्हा बहरून जातात आपल्या लक्षातही येत नाही......

               घराच्या शेजारी एखाद्या झाडाच्या फांदीवर इवलीशी चिमणी अथक प्रयत्नाने छोटेसे इमले बांधून त्यात छोटी अंडी देऊन पिलांना जन्मही देते. चिवचिवाटाने गजबजलेले ते घरटे कधी रिकामे होते हे आपल्या लक्षातही येत नाही....

               घराच्या परसबागेत आपण प्रेमाने लावलेल्या फुलाच्या रोपाला नाजूक कळ्या लागून त्याची सुंदर फुले उमलून कधी कोमेजून गेली हे आपल्या लक्षातही येत नाही....

              लहानपणी एखादा पदार्थ, एखादे फळ कधी बाजारात येते याची आतुरतेने वाट पाहणारे आपण आता ते फळ, तो पदार्थ बाजारात येऊन गेला तरी आपल्या लक्षातही येत नाही....

              होय या निसर्गचक्रातील बाबी आहेत कधी आपल्या लक्षात येतात कधी नाही. कामाच्या व्यापात आणि मोठेपणाच्या ओझ्याखाली आपण गुरफटले गेले आहोत त्यामुळे हे घडणारे बदल आपल्याला फारसे महत्वाचे वाटत नाहीत.

              घडणारे हे बदल आपल्या सभोवती घडत असतात त्याचा परिणाम आपल्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या होतच असतो याबरोबरच आणखी एका महत्वाच्या बाबीकडे आपण सध्या दुर्लक्ष करत आहोत ते म्हणजे आपला जवळचा सोबती मोबाईल.......

              मोबाईल, तुम्ही म्हणाल शक्यच नाही. श्वासाप्रमाणे प्रत्येक क्षणाला मोबाईल सदैव आपल्या जवळच असतो व आहे. आई आपल्या इवल्याशा तान्हुल्याच्या जेवढी जवळ असते तितकेच आपण मोबाईलच्या जवळ असतो, पण मुळातच मुद्दा हा आहे की आपला मोबाईल आपल्या जवळ असतो पण त्यातील सर्वच गोष्टी आपण बारकाईने बघत नाही.

               होय, तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या याच अनेक गोष्टी आपल्याकडून दुर्लक्षित झाल्या आहेत. विश्वास वाटत नसेल तर तपासून बघा........

              आपल्या whatsapp च्या chat मधील आपल्याशी नेहमी संपर्कात असणारा आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा इतर व्यक्ती कित्येक महिने आपल्या संपर्कातच नाही, पण ही गोष्ट आपल्या लक्षातच आलेली नाही....

           आपल्या जवळच्या कित्येक लोकांना आपण गेली कित्येक महिने संपर्कच केलेला नाही. फोन, मेसेज, मेल अशा कोणत्याच माध्यमातून संपर्क केलेला नाही.

           facebook किंवा insta वर आपली प्रत्येक पोस्ट like करणाऱ्या एखाद्याची profile तिकडून delete झाले आहे हे आपल्याला समजलेच नाही.

           सध्या तंत्रज्ञानाच्या संपर्कात नसलेला व्यक्ती म्हणजे इतरांच्या दृष्टीने त्याचे अस्तित्व शून्य झाले आहे.  

           जगण्याच्या धावपळीत आपण इतक्या वेगाने पळत आहोत की आपल्या सोबतचे कित्येक सोबती कधीच मागे पडले आहेत हे आपल्या ध्यानातच आलेले नाही आणि आपण कशासाठी धावतोय हे तरी कुठे लक्षात येतय आपल्या....

            तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपण त्यावर काळजीची जबाबदारी सोपवून आपण बेजबाबदार झालो आहोत. त्यामुळे एखाद्या व्यक्ती, मित्र, मैत्रिणी व इतरांविषयी वाटणारी आपुलकी, काळजी, आठवण या तंत्रज्ञानात कुठेतरी हरवली आहे.

             काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या विळख्यात ती हरवण्याआधी ही निसटलेली कडी आणि हरवलेली नाती शोधायला हवीत.  

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

Friday, 26 March 2021

Jagatguru Saint Tukaram Maharaj : जगतगुरू संत तुकाराम महाराज

 

जगतगुरू संत तुकाराम महाराज 

जे का रंजले गांजले

त्यासि म्हणे जो आपुले !

तोची साधू ओळखावा

देव तेथीची जाणावा  !!

                            संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले ( मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती.

                       तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठलत्यांना भेटला असे मानले जाते.

                     तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.

                 पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. जगतगुरू  तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.

                      सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची  मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.

                    तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपारिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

 

                  भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

 

                  महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते.

                       १९ मार्च  १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.

                  जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

 

 

 

Tuesday, 23 March 2021

Holi(Spring Festival) : होळी ( वसंतोत्सव )

 

होळी ( वसंतोत्सव )

             निसर्गात बदलाची चाहूल लागते. झाडांची पानगळ होऊन नवीन सोनेरी पालवी झाडावर दिसू लागते अशा वेळी वसंत ऋतूत हिंदू धर्म परंपरेने साजरा केला जाणारा ‘होळी’ हा एक महत्वाचा व मोठा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते.  वसंत ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे वातावरण खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते.

              होळी हा सर्व भारतभर साजरा केला जाणारा उत्सव असून उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवाला होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव,दोलायात्रा’, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो किंवा शिमगा म्हणतात.

               भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. त्याबरोबर होलिका देवीचा वध श्रीविष्णू यांनी केला होता व होलीकाचे दहन केले होते अशी  आख्यायिका प्रसिद्ध आहे.

          महाराष्ट्रात होळीचा हा सण होळी, धुळवड व रंगपंचमी अशा प्रकारे साजरा करतात. होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे. . होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो एकमेकांना रंग लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

               भारतात उत्तर भागात, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, राजस्थान, गुजरात या भागात वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो.

 

                 होळीचा हा उत्सव आपल्याला अनेक गोष्टीची शिकवण देतो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळी आपल्याला शिकवते की अंधाऱ्या समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्य किरणांची वाट पाहायची असते. रंगपंचमी चे रंग वसंत ऋतू मध्ये खुलणारे रंग दर्शवतात. आपल्याला या सुंदर सणा मागची शिकवण, संदेश समजून घ्यायला हवा.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...