जगतगुरू संत
तुकाराम महाराज
जे का रंजले गांजले
त्यासि म्हणे जो
आपुले !
तोची साधू ओळखावा
देव तेथीची
जाणावा !!
संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले ( मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकारामांचे
वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ
होता. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घरात पंढरीची वारी
करण्याची परंपरा होती. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती.
तुकोबांना त्यांच्या
प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी
लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले,
भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा
त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले,
संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी
श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना
चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.
तुकारामांचा
सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व
कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे
इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची
रचना स्फुरू लागली. त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे
अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
पंढरपूरचा विठ्ठल
हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. जगतगुरू तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची एक
अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.
सतराव्या शतकामध्ये
सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे
सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज
वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये
प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण
झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम
आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपारिक
मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित
झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच'
एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची
भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. त्यांचे अभंग
खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले.
महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत
परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांच्या
काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम
महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.
महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून
जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून
लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे
समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला
उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते.
१९ मार्च १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव,
विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. हा
दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो.
जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे
मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले.. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या
दृष्टीने मौलिक ठरले.
संदिप कोळी
No comments:
Post a Comment