Wednesday, 3 March 2021

Women's Day : जागतिक महिला दिन

 

जागतिक महिला दिन 

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे

गगन हे ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

अवघे विश्व हे वसावे

                    ८ मार्च हा दिवस सर्व जगात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. विसाव्या शतकात अमेरिकेसह, युरोपातील अनेक देशात महिलांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. त्याचबरोबर महिलांच्या अनेक अधिकारावर नियंत्रण ठेवले जात होते. या अन्यायाविरुद्ध ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनेक स्त्री-कामगार व महिलांनी लढा दिला व आपला हक्क मिळवला.

                       स्त्रियांच्या हक्काच्या लढ्याच्या सन्मानार्थ ८ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने १९७५ हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून साजरे केले होते. भारतात ८ मार्च हा महिला दिवस प्रथम मुंबईत १९४३ रोजी साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक वर्षी ८ मार्च हा दिवस आपल्या भारतातही ‘महिला दिवस’ म्हणून साजरा केला जातो. .

                 भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या सन्मानाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून स्त्रियांना देवीचा, मातेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक सण-समारंभामध्ये  स्त्रियांचे महत्वाचे स्थान आहे. पण प्रत्येक्षात समाजात परिस्थिती वेगळी आहे. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान देण्यात आले आहे.

                स्त्रिया या समाजरचनेचा अविभाज्य अंग आहेत. मानवी समाजात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबर आहेत पण अनेक ठिकाणी स्त्रियांचा हा समानतेचा हक्क नाकारण्यात येतो. त्यावेळी स्त्रियांना आपल्या हक्कासाठी लढावे लागते. तिला आपली गरज व योग्यता दोन्ही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात.

                     काळाबरोबर स्त्रियांच्यामध्ये अनेक बदल झाले. प्राचीन काळापासून चूल आणि मूल इतक्यातच मर्यादित असणारी स्त्री आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर किंबहुना काही ठिकाणी पुरुषांच्या पुढे आहे. आज विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, संगीत, अभिनय, राजकारण, अर्थकारण, अवकाश संशोधन, कुटुंब, समज अशा सर्वच  ठिकाणी स्त्रियांची कामगिरी सरस आहे.

                जगभरात अनेक स्त्रियांनी आपले  कर्तुत्व गाजवले आहे. यात आपल्या भारतीय स्त्रिया कमी नाहीत. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, कल्पना चावला, किरण बेदी, प्रतिभाताई पाटील, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, हिमा दास, ऐश्वर्या राय यासारख्या अनेक भारतीय महिलांनी आपल्या कर्तुत्वाने यशाचे झेंडे रोवले आहेत.

              महिला दिनाच्या निमित्ताने देशात, राज्यात विविध ठिकाणी, कार्यालयात, शाळा व महाविद्यालयात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कर्तुत्वान व यशस्वी महिलांचा गौरव केला जातो. अनेक संस्था स्त्रियांना विविध पुरस्काराने सन्मानित करतात. अनेक ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. महिलांना शुभेच्छा दिल्या जातत. 

                       स्त्री ही अजिंक्य, अभेद्य, कनवाळू, पालनहारी, विरता, साहस, सुंदरता, धैर्य, रौर्द्र या नऊ गुणांनी संपन्न असते.  स्त्री बाबतची आदराची भूमिका ही दाखवण्याची गोष्ट नसून ती आत्मसाद करण्याची गोष्ट आहे व हे ज्या वेळी शक्य होईल त्यादिवशी स्त्रीला खरा सन्मान मिळेल. त्यावेळी हा महिला दिन एक दिवस दाखवण्यापूरता न राहता तो 365 दिवस राहिल.

         जन्मापासून आई, आजी, काकी, आत्या, मावशी, मामी, शाळेतल्या बाई, बहीण, मैत्रीण, प्रेमिका, बायको आणि मुलगी या प्रत्येक रुपात स्वतःच अस्तित्व बाजूला ठेऊन त्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारी- स्त्री.....

"हे नारी तू घे भरारी

व्यापून टाक क्षितिजे सारी"

              आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या असण्याला व कर्तुत्वाला कोटी  प्रणाम....

धन्यवाद.....


संदीप कोळी....

Sandip.koli35@gmail.com

 

 

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...