Wednesday, 3 March 2021

Inspiring female form : प्रेरणादायी स्त्री रूप

 

प्रेरणादायी स्त्री रूप......

 

                   तू चंचला, खळखळत्या रूपातून संथ वाहत्या रुपात होणारी...... तू निरागस, सर्व काही आहे तसे न तक्रार करता स्वीकारणारी..... तू धाडसी, संकटावर मात करून इतिहास घडवणारी..... तू सुजला, जीवनात दोन्ही तीरांना जीवन देणारी.... तू दयाळू, सर्वांच्या सर्व चुका आपल्यात सामावून घेणारी..... तू संजीवनी, सर्वाना आपल्या असण्याने नवसंजीवनी देणारी..... तू अर्पिता, स्वतःच अस्तित्व विसरून इतरात स्वतःला पाहणारी..... तू देविका, घराघराला, मनामनाला एकसंघ बांधणारी..... तू त्यागी, दुसऱ्यासाठी आपले सुख बाजूला ठेवणारी.....  तू स्त्री, अखंड विश्वाची जननी..........

                  स्त्री आपल्या समाजाचा अविभाज्य भाग. प्राचीन काळापासून पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात स्त्रियांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. अडचणीच्या, संकटाच्या काळात याच स्त्रीरुपाने मानवी जातीचे रक्षण व संवर्धन केले आहे. पण तरीही मानणे व प्रत्येक्ष असणे यात फरक आहे. समाजातील व कुटुंबातील स्त्रियांचे स्थान व त्यांना घालण्यात आलेली बंधने आपल्याला ज्ञात आहेत.

                  काळ बदलला, काळाबरोबर स्त्री ही बदलली. चूल आणि मूल या भूमिकेबरोबर इतरही जबाबदाऱ्या ती सक्षमपणे पार पाडून तिने आपले समाजातील महत्व व अस्तित्व दोन्ही सिद्ध केले आहे. आज विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य, संगीत, अभिनय, राजकारण, अर्थकारण, अवकाश संशोधन, कुटुंब, समाज अशा सर्वच  ठिकाणी स्त्रियांची कामगिरी सरस आहे.

                राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या कर्तबगार स्त्रियांनी राज्यकारभार व प्रशासन यातील स्त्रियांचे महत्व अधोरेखित केले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या रूपाने ज्ञानाची कवाडे समस्त स्त्रीवर्गाला खुली करून ज्ञानाची अखंड ज्योत तेवत ठेवली आहे. मदर तेरेसांच्या रूपाने सेवा व वात्सल्य याचे दर्शन आपल्याला घडते. स्वर्गीय आवाजाची जादू गानसम्राज्ञनी लता मंगेशकरांच्या आवाजातून आपल्याला अनुभवायला मिळते. कल्पना चावला, सुनिता विल्यम यांनी स्वप्नाला मर्यादा नसतात हे सिद्ध केले आहे. याशिवाय इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज्य, किरण बेदी, सुधा मूर्ती, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, हिमा दास, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, श्रेया घोषाल यासारख्या अनेक महिलांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने यशाचे झेंडे रोवून आपली व समाजाची मान उंचावली आहे.

               या सर्व कर्तबगार महिलांच्या कर्तुत्वाबरोबर  आपल्या आईचे, आजीचे, मावशीचे, बहिणीचे, पत्नीचे, मैत्रिणीचे, मुलगीचे कार्य तितकेच अजोड व महत्वपूर्ण आहे. किंबहुना आपल्या घरातील प्रत्येक स्त्री ही कर्तुत्वान व विशेष आहे. आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्याच्या ओझ्याखाली असूनही तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे व करत आहे.

              स्त्री ही अजिंक्य, अभेद्य, कनवाळू, पालनहारी, विरता, साहस, सुंदरता, धैर्य, रौर्द्र या नऊ गुणांनी संपन्न असते.  स्त्री बाबतची आदराची भूमिका ही दाखवण्याची गोष्ट नसून ती आत्मसाद करण्याची गोष्ट आहे. घरी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांचा सन्मान व आदर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांचा दृष्टीकोन बदलणे महत्वाचे आहे व हे ज्या वेळी शक्य होईल त्यावेळी स्त्रीला खरा न्याय व सन्मान मिळेल. त्यावेळी वर्षातील एक दिवसापुरता महिला दिन न राहता सर्व दिवस महिला दिन होतील.

              जन्मापासून आई, आजी, काकी, आत्या, मावशी, मामी, शिक्षिका, बहीण, मैत्रीण, प्रेमिका, बायको आणि मुलगी या प्रत्येक रुपात स्वतःच अस्तित्व बाजूला ठेऊन त्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारी- स्त्री.....

             महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या असण्याला व कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम व खूप साऱ्या शुभेच्छा........

"हे नारी तू घे भरारी

व्यापून टाक क्षितिजे सारी"

 

 

संदीप कोळी....

Sandip.koli35@gmail.com

 

 


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...