होळी ( वसंतोत्सव )
निसर्गात
बदलाची चाहूल लागते. झाडांची पानगळ होऊन नवीन सोनेरी पालवी झाडावर दिसू लागते अशा
वेळी वसंत ऋतूत हिंदू धर्म परंपरेने साजरा केला जाणारा ‘होळी’ हा एक महत्वाचा व
मोठा सण आहे. या सणाला "होळी
पौर्णिमा" असेही संबोधले जाते. वसंत
ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे वातावरण
खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते.
होळी
हा सर्व भारतभर साजरा केला जाणारा उत्सव असून उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर
साजरा केला जातो. फाल्गुनी
पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
ह्या उत्सवाला ‘होलिकादहन’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’,’दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशा वेगवेगळ्या
संज्ञा आहेत. कोकणात शिमगो किंवा शिमगा म्हणतात.
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे.
पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या
निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या
पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. त्याबरोबर होलिका देवीचा वध श्रीविष्णू यांनी केला होता व
होलीकाचे दहन केले होते अशी आख्यायिका
प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रात होळीचा हा सण होळी, धुळवड
व रंगपंचमी अशा प्रकारे साजरा करतात. होळीच्या
दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात,
आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून
नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ
आहे. . होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला'
धुळवड' असेही म्हणतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो एकमेकांना रंग लावून
रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
भारतात उत्तर भागात, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, राजस्थान, गुजरात या भागात
वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो.
होळीचा
हा उत्सव आपल्याला अनेक गोष्टीची शिकवण देतो. होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना
होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन
निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळी आपल्याला शिकवते की अंधाऱ्या
समयी टिकून राहायचे असते आणि सकाळच्या सूर्य किरणांची वाट पाहायची असते. रंगपंचमी चे
रंग वसंत ऋतू मध्ये खुलणारे रंग दर्शवतात. आपल्याला या सुंदर सणा मागची शिकवण,
संदेश समजून घ्यायला हवा.
संदिप कोळी
No comments:
Post a Comment