सदा आनंदी ठेव सर्वाना💐
हिच प्रार्थना पांडुरंगाला॥💐
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
calligraphy
sketch
संदीप...
Sunday, 22 July 2018
बोलावा विठ्ठल
Monday, 9 July 2018
माझा रेल्वेतील मित्र
२००६ ची घटना. मी १२ वी होऊन घरच्यांच्या सुरक्षित वातावरणातून पहिल्यांदाच जगाच्या मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झालो होतो. कोल्हापूरला ऍडमिशन घेतल्यापासून नवीन शहर, नवीन वातावरण आणि दररोजचा नवीन प्रवास.
हातकणंगले पासून कोल्हापूरला जाण्याचा सर्वात लोकप्रिय व खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास. त्यामुळे हातकणंगले- कोल्हापूर व पुन्हा कोल्हापूर- हातकणंगले असा दिनक्रम बनला होता. दररोज ९.१५ च्या पॅसेंजर ने जाणे व सायंकाळी ५ किंवा ६.३० च्या पॅसेंजर ने घरी परतत असे. कधी कॉलेज लवकर सुटले तर लवकर घरी येत असे.
कॉलेज सुरु होऊन दोन महिने होऊन गेले होते. त्या दिवशी कॉलेज मधून दुपारी सुट्टी मिळाली. धावत-पळत स्टेशन गाठले. दुपारचे ३ वाजले असतील. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र एक्सप्रेस २ नंबरच्या प्लँटफॉर्म उभी असते म्हणून मी हि रेल्वेचे नाव न पाहता बसलो. रेल्वेच्या डब्यात नेहमी पेक्षा गर्दी कमी होती पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. बसल्यावर पाच एक मिनिटात रेल्वे धावू लागली. ३.३० ची रेल्वे इतक्या लवकर कशी जाईल. पुन्हा वाटले कदाचित प्लॅटफॉर्म बदलून लावत असतील. रेल्वेने स्टेशन सोडले व गती वाढली. मग मात्र माझी शंका भीती मध्ये बदलली. मी चुकीच्या रेल्वेत बसलो होतो. ती राणी चन्नम्मा एक्सप्रेस होती जी तिच्या वेळेपेक्षा एक तास उशिरा धावत होती. पण याही पेक्षा माझी मोठी अडचण होती ती म्हणजे हातकणंगले रेल्वे स्टेशन वर ती थांबत नव्हती. शिवाय माझ्याकडे रेल्वेचा कोल्हापूर-हातकणंगले पास होता. खिशात मोजकेच पैसे. समजा टी. सी ने पकडले व दंड केला तर काय करायचे? हि रेल्वे थांबणार कुठे? असे अनेक प्रश्नांनी मनात भीती निर्माण केली होती. मी न बघता रेल्वेत बसलो या माझ्या मूर्खपणाचा रागही येत होता. इतक्यात हनुमानाची वेशभूषा केलेला ११-१२ वर्षाचा मुलगा आला. तो रेल्वेत आपली कला दाखवून पैसे जमा करत असे. मी त्याला नेहमी बघायचो. ओळख नव्हती. पण नेहमी पाहण्यात होता म्हणून तो जवळ आल्यावर मी त्याला माझी अडचण सांगितली. तो दुनियादारी शिकलेला होता दररोज अशा प्रसंगांना तोंड देणारा होता. मला म्हणाला, "काळजी करू नको, दुसऱ्या रेल्वेचे क्रॉसिंग असेल तर ही रेल्वे हातकणंगलेत थांबते आणि नाही थांबली तरी ही रेल्वे मिरज मध्ये गेली की कोल्हापूर ला येण्यासाठी मिरज मधून दुसरी रेल्वे आहे. त्यातून यायचे. मी त्यानेच परत येणार आहे. सोपं आहे." त्यांच्या या शब्दांनी मला थोडं हायसे वाटले. पण टी. सी आला तर? या माझ्या दुसऱ्या शंकेचे त्याने उत्तर दिले कि," या रेल्वेत मिरज पर्यंत चेकिंग होत नाही आणि झालेच तर आपण खरं कारण सांगू तुझ्याकडे पास आहेच की."
मग मात्र माझी हुरहूर कमी झाली. रेल्वे गतीने पुढे धावत होतो १५ मिनीटातच रेल्वे हातकणंगले रेल्वे स्टेशन जवळ आली पण पहिला पर्याय मागे पडला कारण रेल्वे तशीच वेगाने स्टेशन सोडून पुढे गेली. मी थोडा निराश झालो होतो. त्याने दुसऱ्या पर्यायाची पुन्हा आठवण करून दिली. तो हि मिरज रेल्वे जंक्शन येईपर्यंत माझ्याजवळ बसला होता. मिरज आले. मला म्हणाला, "लगेच उतरून माझ्या मागून पळत यायचे." मी मान डोलावून त्याच्या मागून पळत कोल्हापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेत बसलो.
मी निवांत झालो असलो तरी माझ्याकडे अजूनही प्रवासाचे तिकीट नव्हते. तो हनुमान माझ्याजवळच उभा होता. त्याच्या असण्याने मला आधार वाटत होता. रेल्वे धावू लागली. जयसिंगपूर स्टेशन गेले व हातकणंगले स्टेशन आले. या प्रवासात माझा झालेला नव्या मित्रचा निरोप घेऊन मी उतरलो.
त्यानंतर रेल्वेच्या प्रवासात तो मला दररोज दिसायचा, भेटायचा. आम्ही त्याला हनुमान म्हणूनच बोलवायचो. भेटल्यानंतर बोलायचो. ३-४ महिन्यांन्यानंतर तो रेल्वेत दिसायचाही बंद झाला. कोठे गेला माहिती नाही. त्यानंतर परत तो कधी दिसलाच नाही. त्या तासाभराच्या प्रवासाने मला तो बहुरूपी मित्र भेटला होता पण नंतर तो जगण्याच्या प्रवासात हरवला. साध्य तो फक्त आठवण म्हणून आठवणीत कायम आहे.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
हातकणंगले.
Sunday, 24 June 2018
प्लास्टिक बंदी
च्यामारी अलीकडं आनं पलीकडं बी बंदी म्हणलं की अंगावर सारकण काटाच येतुया. त्यात भर म्हनून आता ही पॅस्टिक बंदी. तसं पॅस्टिक बंदीला आपला इरोध नाय हाय पण पॅस्टिक बंद झाल्यामुळं लय गोची हुतीय बगा. गेल्याचं आठवड्यात आमचं बंड्या दुकानात जाऊन लाज काडून आलंय. गोडं तेल आणायला हात हालवत मोकळच गेलंय. १५ मिंट झालं तरी दुकानदार ध्यानं दिना म्हणून तेला कावालत. दुकानदार शांत पण म्हणलं पॅस्टिक पिशवी बंद हाय वंजळीत भरून नेतूस. तोंडात मारल्यावाणी पोरगं परतं. तवा पसन नाराज हाय. बंड्या म्हणतंय पॅस्टिक बंद हुतयच कसं. कारण तेनं कवाच घरातन पिशवी नेली नाय आनं अचानक असं म्हणजी? तेचं बी खरं हाय म्हणा पॅस्टिक म्हंजी घरातल्याचं माणसासारखा हाय. कुठ्ल्याबी कामात गरज पडतीयाच की. आमच्या आय नं तर घरात चांगल्या चांगल्या पिशव्या घडी घालून ठेवल्या हुत्या आमी मागितलं तरी बी चांगली पिशवी कवा देत नाय. येवढा जीव हुता तिचा पॅस्टिक पिशवीवर.
काल लईच वाईट वेळ आली आमच्यावर, ते खालच्या गल्लीच 'विक्या', तेचा हॅप्पी बडडे हुता. मग काय पार्टी, आमी बी फुकटच जेवायला भाया माग सारून हजर. जेवायला बसल्यावर पंचायत झाली राव पॅस्टिक बंदीमूळ पॅस्टिकच्या ताट, वाट्या, गलास बंद त्यामुळं पत्रावळीवर वाढलं. रस्सा भातात वतला की दुसऱ्या बाजूनं डायरेकट्ट मातीत. तवा आता कुणाच्यात जेवायला आपली ताट-वाटी घिऊन जावा नाहीतर उपाशीच बसायला लागलं. 'परशा' न तर पॅस्टिक बंदीची हापकीच खाल्लीय. ते हाय ढापन तेचा चस्मा हाय पॅस्टिकचा. बंदीमुळं ते चस्मा बी घालनां तेला वाटतंय सापडलं तर दंड व्हायचा.
पॅस्टिक बंदीच्या नादात 'पम्या' न घरात मार खाल्ला. तोंडात कायम चघळायची पुडी खिशात राहिली आनं पॅस्टिकची पिशवी नसल्यानं खिशावर डाग. मग काय काकून धू-धू धुतला बिचाऱ्याला.गल्लीतली पोरं म्हजी दुसरी SBI. पॅस्टिकच्या पिशवीच्या रंगावरण कुणाच्या घरात काय आणलं ते वळकत्यात पण आता ते बी कळना कारण सगळ्याला एकच पिशवी वापरत्यात आता. तरी बरं दुधाची पिशवी चालत्या म्हणून नायतर पावसाळ्यात मोबाईल ठेवायचा कुठं ही पंचायत झाली असती. सगळा पावसाळा कुंबडी सारखा घरातच गेला असता. आमची तेवढी तरी सोय बघितल्याबद्दल मंडळातर्फे जाहीर आभार.
या बंदीचा फायदा घेत कोपऱ्यावरच्या दुकानदारानं कापडाच्या पिशव्या २० रु ला एक देतंय. आता २० रु ची पिशवी घ्यायला आमी काय खुळ हाय व्हय. तेच्या पेक्षा आमच्या जुन्या बनियान, शर्टाची पिशवी शिवल आय आमची.
मराठी शाळ पुढंन येताना ऐकलं, गुरुजी पॅस्टिक बंदी का महत्वाची हाय ते सांगत हुतं. पर्यावरणाची कि काय ती हानी हुतीय म्हणं. अपल्यासनी तरास हुतुय म्हणं या पॅस्टिकनं. आम्हास्नी कवा कळलं नाय. पण गुरुजी सांगत्यात म्हंजी १०० आण खरं. हे सगळं खरं असलं तरी २ प्रश्न हायती पॅस्टिक बंदीमुळं मटण, चिकण आणायला डबा चाललं पण मासे आणायला केवढा डबा न्यायचा हे कळतंच नाय.आनि गावाला जाताना वल्ली कापडं कशातन न्यायची. बघा तुमाला उत्तर सापडलं तर सांगा आमास्नी बी.
बाकी पॅस्टिक बंदी झालीच पाहिजे. तुमी बी पॅस्टिक वापरत नाय ना, वापरायलाच नाय पाहिजे. तवा आता बाहेर जाताना आपली कापडाची पिशवी न्या. "पॅस्टिकच्या धोका, अणुयुद्धापरास मोठा."
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
Sunday, 3 June 2018
भारतात 5G येणार
हाय फ्रेंड्स..बघता बघता उन्हाळा संपत आला. परीक्षा, आयपीएल चा सिझन संपलासुद्धा आणि आंब्याचा सिझन जवळपास संपत आला. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे वातावरणात ऋतू बदलाचे वारे वाहू लागले आहे.
वातावरणातील सौम्यतेमुळे गप्पाचे अड्डे पुन्हा रंगू लागले आहेत. सगळेच फ्री असल्यामुळे वेळेची कमतरता जाणवतच नाही. गप्पा रंगल्या कि कधी-कधी त्याचा पतंगच होतो. अशाच गप्पा रंगल्या होत्या. 'सच्या' एक वायर घेऊन आला " भावांनो भारतात 5G येणार". गप्पांचा विषयच पालटला. मोबाईल आणि इंटरनेट हे तर 'जवा दिलो की धडकन' म्हणजे अगदी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाबरोबर मोबाईल आणि इंटरनेट हि लागतेच इतका जिव्हाळ्याचा विषय. जीवनातील आवश्यक गोष्टीतील Compulsory वस्तू म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट शिवाय मोबाईल 'किस काम का'. 'सच्या' ने छेडलेल्या विषयात 'परश्या' उतरला, "होय रे मी पण ऐकलंय". तेवढ्यात अभ्यासातला किडा 'राहुल्या' नेहमीच्या नारीजीच्या स्वरात म्हणाला " मग त्यानं काय फरक पडणार आहे. आताही इंटरनेट आहेच की, 4G मुळे स्पीड पण आहे". यावर मात्र आमचा इंटरनेट तज्ञ 'विक्या' चिडला, "तुला काय कळतंय त्यातलं, 5G आलंच पाहिजे. इंटरनेट चे स्पीड भयानक वाढेल. आता आपल्याला 3 तासाचा पिक्चर डाउनलोड करायला अर्धा-एक तास लागतो पण 5G आल्यावर तो 3 तसाचा HD पिक्चर 1 सेकंदात डाउनलोड होईल. जग आणखी जवळ येईल कळलं का? म्हणे काय फायदा?" 'विक्या' आवेशात 5G ची वकिली करत होता जस काय टेलिकॉम कंपन्या 5G चा ब्रँड एम्बेसडर करणार आहेत. फायद्या-तोट्याच्या जुगलबंदीत 5G ची चर्चा रंगतदार झाली.
भारतात 2019 पर्यंत 5G येण्याची शक्यता आहे. पण याची सुरुवात 1G पासून झाली होती हे आपल्याला माहीतच नाही. त्याचा वापर फक्त कॉलिंग साठी होत होता. त्यानंतर 2G आले त्यात sms व इतर सुविधा आल्या. 3G आले व इंटरनेट युगात क्रांती झाली. ब्राउजिंग, ईमेल, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअरिंग आले. माणसाबरोबर फोनही स्मार्ट झाला. त्यानंतर 4G आले व स्मार्ट फोन चा वापर आणखी स्मार्ट झाला. स्पीड वाढले दररोजच्या 1 ते 1.5 gb डाटाने आपल्याला खिळवून ठेवले. 4G चा सरासरी वेग 12mbps इतका आहे. आता मात्र या सर्वांच्या पुढची जनरेशन म्हणजे 5G येत आहे. याचे स्पीड साधारण 20gbps इतके भयानक असणार आहे. 2019 च्या शेवटीपर्यंत 5G भारतात येईल. याचा अर्थ असा की 4G सर्वत्र पोहचयच्या आधी 5G भारतात येईल. 4G पेक्षा 20 पट वेग वाढल्यामुळे कोणतीही माहिती पाठवण्यासाठी 1 मिलीसेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. 5G मुळे देशातील बहुतेक सुविधा इंटरनेट च्या माध्यमातून पुरवल्या जातील. सेल्फ ड्राइविंग कार, रिमोट कंट्रोल सर्जरी, आर्थिक व्यवहार जास्त सोपे होतील.
5G च्या बातमीमुळे पोरं मात्र जाम खुश आहेत. येणाऱ्या स्पीड ची कल्पना करून 5G ची आतुरतेने वाट बघत आहेत कारण आपल्याला 'थोडा और' पाहिजच असते. आत्ताच कामाच्या व्यापात पोरांना 1.5Gb डाटा पुरत नाही. बघू 5G आल्यावर काय होते ते पण या 3G, 4G,5G च्या नादात जीवनातील 'जी' मात्र हरवता काम नये.
-----------------------------------------------------------
संदीप.....
sandip.koli35@gmail.com
Friday, 1 June 2018
पालक आणि पालकत्व Parent and Parenthood
फोन ठेव आणि पुस्तक घे.... बास कर आता ते गेम खेळणे....! बंद कर ते युट्युब....! फोन ला हात लावू नकोस....! फोन बाजूला ठेवा आणि जेव आता....! तुमच्या आमच्या घरात मुलांशी संवाद हल्ली याच त्रासिक वाक्याने सुरू होतात व त्याचे पर्यावसन रागात व आदळ-आपटीे होते. पण प्रश्न काही सुटत नाही.
मोबाईल चे व्यसन हे आजच्या कुटुंबापुढचा यक्ष प्रश्न बनला आहे. आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते शाळा-कॉलेजच्या पाल्यापर्यंत हे व्यसन तितकेच गंभीर बनले आहे.यात लहान मुलांच्यामध्ये प्रचंड आकर्षण आहे. मग ते गेम खेळण्याविषय असो, फोटो पाहण्याविषयी असो, गाणी, व्हिडिओ पाहण्याविषयी असो, वा काही मनोरंजनात्मक अँपविषयी असो.... आपल्या घरातल्या चिमुरड्यांना उठल्यापासून झोपेपर्यंत हा स्मार्टफोन लागतोच. झोपेतून उठल्यावर मुड ठीक करण्यासाठी, जेवण करताना, दुपारी गेम खेळायला, काही खाताना मोबाईल शेजारी हवा असतो. शेवटी झोप यावी म्हणून ही मोबाईल उशाशी हवाच असतो.
मुले लहान असताना त्यावेळी पालक म्हणून आई-वडिलांना त्यांचे फार कौतुक वाटते. इतक्या लहान वयात आपलं बाळ किती सहजपणे मोबाईल हाताळते याविषयी कुतूहल वाटते. बाळाचं फोन वापरणे, फोटो पाहणे, गाणी, व्हिडिओ चालू करणे. पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक सहज लक्षात ठेवून काढणे ही आपल्या पाल्याची बुद्धिमत्ता प्रत्येक आई-वडिलांसाठी काही काळ अभिमानाची गोष्ट ठरते. पण जस-जसे आपल्या मुलांना मोबाईलची सवय पडून त्याचे व्यसन लागते तशी तशी पालक म्हणून अभिमानाची वाटणारी बाब आता डोकेदुखी ठरू लागते. व काळजीचा विषय बनते. आपल्यातील सुज्ञ पालक जागा होतो मोबाईल चे दुष्परिणाम दिसू लागतात. मग पालक म्हणून आपण बैचेन होतो. मोबाईल चे प्रमाण कमी करायला हवे याचा विचार करतो. एकमेकांना दोष देतो. तुझ्या लाडामुळे झाले म्हणून एकमेकांकडे बोट दाखवतो.आपण झटक्यात मोबाइल बंद करतो. पण ते तितके सोपे राहत नाही. मुले हट्ट करतात, चिडचिड करतात, रडतात, आदळा-आपट करतात, रुसतात, जेवत नाहीत, मग आपण पुन्हा वात्सल्यापोटी माघार घेतो. कमी-जास्त प्रमाणात हर घर की यही कहाणी है।
आपल्या घरातील ही चिमुरडी हल्ली या फोन समोरून उठतच नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्टीत फोन हवा असतो. अगदी घरातील खेळण्यांना ही मुले हात लावत नाहीत. मोबाईल हे एक खेळणे हातात असते व बाकीच्या खेळण्यांना अडगळीची जागा दाखवलेली असते. १०-१५ वर्षांपूर्वी लहान मुलं इतकी खेळायची की आई-वडिलांना त्यांना घरात ओढून घेऊन जावे लागत होते. पण आता मुले बाहेरच पडत नाही. ही मोबाईल ची ओढ असली तरीही यात पालकाची भूमिका महत्त्वाचीं आहे.
२१ व्या शतकात आपल्याबरोबर फोन पण स्मार्ट झाला व बोलण्याबरोबर फोनचे अनेक उपयोग समोर आले. त्यामुळे आपल्याला त्याचा मोह झाला व गरजही बनली. घरात ही पालक म्हणून आपला फोनचा वापर खूप वाढला आहे. आपल्या पाल्यांच्या समोर आपण मोबाईल, सोशल मीडिया यासाठी आपण बऱ्याच वेळ देतो. नकळत आपल्या पाल्यांनाही त्याचे आकर्षण वाढते. व मोबाईल ची सवय होते. पालकांच्या बरोबर घरातील इतर ही व्यक्ती मोबाईल ला अधिक महत्त्व देतात. शिवाय मोबाईल चे स्वतःचे खिळवून ठेवणारे गुण आहेतच. त्यामुळे मुले सहज आकर्षित होतात.
याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे संशोधन सांगते. पालक म्हणून आपण काही बंधने पाळणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा मुले फार त्रास देतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. कधी घरात फोनची संख्या जास्त असेल तर मुलांना फोन उपलब्ध होतात. घरात असताना आपल्या फोनची इंटरनेट बंद ठेवायला हवे. मुलांना घडवणे ही फक्त आईची जबाबदारी नसून दोघांची आहे हे पाळणे तितकेच गरजेचे आहे. मुलांना वेळ द्यायला हवा. गोष्टी, छोटे खेळ, नवीन ठिकाणे यांची माहिती द्यायला हवी. त्यांच्याशी बोलायला हवे. त्यामुळे मुले वेगळ्या गोष्टीत गुंतून राहतात. व यातून बाहेर पडायला मदत होईल.
आपले पाल्य आपला अंश असतात. वस्तू खरेदी करताना शंभर वेळा चौकशी करणारे आपण पाल्याच्या बाबतीत तितकेच चौकस असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण आपल्या पाल्याला द्यायची असेल तर ती आहे 'वेळ' आणि फक्त 'वेळ'.
Monday, 21 May 2018
पत्र
प्रिय पत्र......
एक पत्र अलीकडच्या काही वर्षांत न लिहलेल्या किंवा कमी लिहल्या जाणाऱ्या पत्रासाठी. खरंतर मी किंवा माझ्या सारखे अनेक जण खूप भाग्यवान आहेत असे मी समजतो कारण आम्हाला तुझा सहवास लाभला. तुझ्या रूपाने वाहणारा मायेचा, भावनेचा, आपुलकीचा व प्रेमाचा झरा मी व माझ्यासारख्या कित्येक जणांनी याची देही याची डोळा अनुभवला.....
प्राचीन काळापासून इतिहासाच्या प्रत्येक पानावर तुझी नोंद आहे. जेव्हापासून मानवाने आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली होती तेव्हापासून तुझा नि माणसांचा संबंध आला आहे. पण कदाचित त्यावेळी तुझे बारसे घालून तुला 'नाव' देण्यात आले नसावे. त्या काळात गरजेनुसार तुझ्या नावात, प्रकारात फरक होता. काळ बदलत गेला. पिढ्या बदलल्या मानवाच्या भावनांचे स्वरूप बदलत केले व त्यांच्या कक्षा रुंदावत गेल्या. अशावेळी तुझी सोबत होतीच. संदेश देवाण-घेवाणीचा तू अविभाज्य भाग होतास. तुला पत्र हे अधिकृत नाव कधी मिळाले हे मला निश्चित माहित नाही पण हे मात्र नक्की कि नावापेक्षा तुझे काम काळाच्या प्रत्येक पिढ्यात वरचढ होते व आहे. प्राचीन काळापासून ते अगदी इंग्रज भारतात येऊन स्थिरस्थावर होईपर्यंत तुझे स्वरूप अनौपचारिक होते. कधी दूतामार्फत, कधी कबुतर मार्फत, कधी घोडेस्वार, कधी सांडणीस्वार, तर कधी इतर पक्षामार्फत या व अशा अनेक प्रकारांनी तुझे काम चालू होते. पण गोरे साहेब आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपले हातपाय पसरले. 1857 मध्ये त्यांच्या फायद्यासाठी म्हणा किंवा आपल्या सोयीसाठी म्हणा अधिकृत 'पोस्टाची' रचना झाली व तुझा अनौपचारिक प्रवास व नाव अधिकृतपणे सुरू झाले. भारतात टपाल सेवा सुरू झाली आणि तू बाळसं धरायला सुरुवात झाली. गरिबांपासून-श्रीमंतांपर्यंत, लहानापासून-मोठय़ापर्यंत, सुशिक्षितपासून -अडाणीलोकांपर्यंत सर्वांना तुझी ओढ व कुतूहल वाटू लागले. आपल्या भावना जिवंतपणे समोरच्या आपल्या व्यक्तींपर्यंत पोचवणारा तू साक्षीदार होतास. जस-जशे तुझे महत्त्व व गरज लोकांच्या लक्षात यायला लागली तसे लोक तुझ्या अधिकच प्रेमात पडू लागले. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा तू विषय झालास. आपल्या भावना, मत प्रत्यक्ष न जाता तुझा तर्फे पोहोचवण्यासाठी प्रत्येक जण पत्र लिहू लागला.
शिक्षण, नोकरीनिमित्त बाहेर गावी व विदेशी असणाऱ्यांसाठी तू शब्दरुपी मायेची उब निर्माण करून दिलीस.व सीमेवर देशासाठी आपल्या रक्ताचे पाणी करणाऱ्या जवानांना तुझ्या येण्याने दहा हत्तीचे बळ येत होते. तू घेऊन आलेला संदेश वाचताना घरच्या आपल्या माणसाच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नव्हते. सासुरवाशीण मुलीला आपल्या माहेरच्या माणसांची लागलेली ओढ तुझा रूपाने पूर्ण व्हायची. तू घेऊन आलेला प्रत्येक शब्द तिला आपल्या माणसांची आठवण करून द्यायचा. एखाद्या गुरुचा तुझा रुपाने आलेला संदेश शिष्याला व विद्यार्थ्याला नवसंजीवनी देऊन जायचा. एखाद्या विद्यार्थ्याने गुरूला पाठवलेल्या शब्दांमध्ये गुरुदक्षिणा घेऊन तू यायचास. आई, वडील, मुलगा मुलगी, मामा-भाचे, भाऊ-बहीण, मावशी,काका अशा प्रत्येक नात्याची वीण घट्ट बांधण्याचे काम तू शब्दरूपाने केलेस. तुझ्या बरोबर आलेल्या त्या 100-200 शब्दांमध्ये सर्व भावना, माया, प्रेम, आपुलकी, संस्कार, आत्मियता असे नाना रस तू घेऊन येत होतास.
दररोज येणारे पोस्टमन काका कधी येतात आणि आपल्यासाठी पत्र घेऊन येतात याची वाट पाहण्यात बराच वेळ जात होता. पण आपले पत्र आहे हे समजल्यावर होणारा आनंद, ते पत्र कोणाचे, त्यातील व्यक्ती व मजकुर वाचण्याचा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. तो फक्त अनुभवण्याचा भाग होता.
मी स्वतः पत्र दिले ते इयत्ता दुसरीच्या वर्गात असताना. आमच्या गुरुजींनी तुझ्या पिवळ्या रंगाच्या कार्डावर पत्र लिहायला शिकवले. त्यानंतर ही आवड कायमच राहिली अगदी आठवी-नववीपर्यंत म्हणजे 2000- 2001 पर्यंत मी नियमित पत्र लिहित होतो . त्यानंतर मात्र आधुनिक साधनांचा जमाना आला. पत्र ते फोन या संक्रमणाच्या काळाचे आम्ही साक्षीदार आहोत पण येणाऱ्या पिढीचे किंवा आत्ताच्या पिढीचे काय? कदाचित हा तुझा भावनिक अनुभव आम्ही किंवा आपण शब्दात नाही मांडू शकणार.
घरात नवीन गोष्ट आल्यावर पहिल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते ना अगदी तसंच तुझ्या बाबतीत झाला आणि हे दुर्लक्ष इतके वाढत गेले की कालांतराने तू कालबाह्य व्हायची वेळ आली.
आताच्या पिढीची सुरुवातच मोबाइलसारख्या प्रभावी साधनाने झाली आहे. पण त्याला तुझी सर येणार नाही. पूर्वी तू येत होतास आपुलकी, प्रेम, जिव्हाळा घेऊन. पण आता फोन येतो काम घेऊन. तू सुरुवात करत होतास आपुलकीच्या चौकशीने, आशीर्वादाने आता फोनची सुरुवात होते कुठे आहे? या प्रश्नाने. तंत्रज्ञानाने फक्त आम्हाला जवळ आणला आहे पण आपलेपणा, प्रेम आम्ही तुझ्याजवळच विसरून आलोय आणि आता तो परत आणणेही कठीण झाले आहे.
तू आलास की तुला पाठवणारा माणूस समोर आहे असे वाटायचे पण ती सर आता फोनवर येत नाही. कदाचित या किंवा येणाऱ्या पिढीला हे पटणार नाही. व्हिडिओ कॉल च्या जमान्यात तुझा विषय हा चेष्टेचा भाग वाटेल पण मी तुझे आणि स्मार्टफोन या दोन्ही साधनाचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन्हींचा अनुभव घेतला आहे. कदाचित तुझ्याबद्दल हे मत मी माझ्या मुलाला किंवा या पिढीला पटवून देऊ शकणार नाही. ते स्पष्टही करून सांगू शकणार नाही कारण त्यांनी नाण्याची एकच बाजू बघितलेली आहे.
असो पण तुझ्याबद्दलचा माझा भावनिक जिव्हाळा कायम राहील म्हणून तुझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे तुला लिहलेले पत्र....फक्त तुझ्यासाठी.... की ज्यामुळे मी लिहायला शिकलो...
संदीप....
Wednesday, 16 May 2018
चेहरा / face
खुद के असली चेहरे के साथ
मगर शाम होते होते हररोज
दो-चार चेहरे बदल लेता हूँ।"
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची हीच स्टोरी आहे. कमी-जास्त प्रमाणात आपण ही हेच आयुष्य जगतो. कधी स्वतःसाठी, कधी समोरच्यासाठी, कधी तिसऱ्याच कोणासाठी, तर कधी माहित नसलेल्यासाठीही. असे प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे चेहरे घेऊन वावरत असतो व जगत असतो हे कधी आपण आपल्या इच्छेने करतो तर कधी आपल्या इच्छेविरुद्ध.....
लहान असताना आपण आपल्या चेहऱ्याशी व वागण्यात प्रामाणिक होतो पण जस-जसे वय वाढत जाईल तसे आपण नवीन चेहरे घेऊन जगायला शिकलो. त्यामुळे आपल्या मनात एक, डोक्यात दुसरे व चेहऱ्यावर तिसरेच हावभाव असतात. समोरच्याला खुश ठेवण्यासाठी व त्याला आवडेल तसे वागण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या मूळच्या स्वभावाचा गळा दाबलेला असतो. मग फक्त समोरच्याला बरे वाटावे म्हणून आपण मनात नसतानाही मुखवटे घेऊन वावरतो. या वागण्यात आपण आपल्या खऱ्या चेहऱ्याला कधी सर्वांसमोर आणतच नाही. बरं समोरची व्यक्तीही आपण त्याला बरे वाटावे असे वागतो तोपर्यंत आपल्याबद्दल चांगले मत करते. आपण एकदा जरी त्याच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध वागलो की आपण त्याच्या दृष्टीने स्वार्थी ठरतो. तसेही आयुष्यात आपण आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही. मग आपण हा खोटा अट्टाहास कशासाठी करतोय. आपण कितीही चेहरे घेऊन वावरलो तरी 'कही खुशी आणि काही नाराजी' राहणारच. मग आपल्या स्व ला मारून जगासाठी हे बेगडी चेहरे का वापरायचे? त्यापेक्षा कमी लोक खुश राहिले तरी चालतील पण आपला स्वतःचा मूळचा चेहरा वापरायला काय हरकत आहे.
ज्यावेळी आपण आपल्या आयुष्यात मागे वळून पाहतो त्यावेळी आपण वापरलेल्या चेहऱ्यामुळे आपण सर्वांना तर आनंदी ठेवूच शकलो नाही पण आपण स्वतःचा ही आनंद गमावून बसलो आहे
आपल्या प्रत्येकाच्या आत आपले ओरिजनल वर्जन असते. विनाकारण आपण ते अपडेट करण्याच्या नादात आपली ओरीजण्यालिटी गमावतो. त्यामूळे समोरचा खुश होईल पण आपण आपल्या आनंदावर मात्र विरजन घालतो. म्हणून 'दुनिया को मारो गोली' आपल्याला वाटते ते जगूया व आपल्या 'स्व' ला जपुया.
🎭मुखवटे...
नवरात्री व दसऱ्याच्या निमित्ताने सर्व परिसर गलबलून गेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या सणाच्या निमित्ताने आपल्या भक्तीचा ठसा देवाच्या मा...
-
गुरुपौर्णिमा आदरणीय गुरुवर्य ..... . गुरु , कोणाला म्हणणार आपण गुरु ? आपलं जगणं घडवणारा.....पावलांना बळ देणार...
-
नवरात्री व दसऱ्याच्या निमित्ताने सर्व परिसर गलबलून गेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या सणाच्या निमित्ताने आपल्या भक्तीचा ठसा देवाच्या मा...
-
फ्रेंडशिप डे.... " रफ्तार कुछ जिंदगी की यू बनाये रखी हैहमने..कि दुश्मन भले आगे निकल जाए पर दोस्त कोई पिछे ना छुटेगा...