छ.शाहू महाराज, प्रजाहित व दूरदृष्टीचा राजा
श्रावण महिन्यातील दिवस. शुक्रवारचा
दिवस असल्याने त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांची वर्दळ सुरू होती.
एक रथ टेकडीच्या दिशेने चालला होता. इतक्यात उलट्या बाजूने उतारामुळे एक बैलगाडी वाऱ्याच्या
वेगाने येत होती. ४ -५ वर्षाचा एक लहान मुलगा रस्ता पार करत होता. बैलगाडीच्या
गोंधळात पळण्याच्या प्रयत्नात तो पाय अडकून पडला. घाबरल्यामुळे त्याला उठता येईना.
त्याच्या ओरडण्यामुळे रथात असणाऱ्या महाराजांची नजर त्याच्यावर गेली. ती भरधाव बैलगाडी
त्या चिमुरड्याला चिरडणार हे लक्षात येताच महाराजांनी रथातून उडी मारली व त्याला
उचलून बाजूला घेतले, त्याचा जीव वाचवला. इतक्यात गर्दीतून येणारा आवाज तप्त शिशा
सारखा महाराजांच्या कानावर आदळला “महाराज ते महाराचे पोरगे हाय.” तोपर्यंत
सारी गर्दी महाराजांच्या सभोवती एकवटली होती. बैलगाडीवाला बैलगाडी कशीबशी थांबवून
थरथरत महाराजांपुढे उभा होता. महाराजांनी त्याला माफ केले, पण ते शब्द कानात घुमत
होते. महाराजांनी गर्दीला उद्देशून म्हणाले. “मृत्यूच्या तावडीत असताना कसला
जातीपातीचा विचार करता, तुम्ही माणसे आहात की हैवान?” असे म्हणून महाराज त्या मुलाला आपल्या रथातून घेऊन पुढे गेले.
ही घटना आहे कोल्हापूर संस्थांनची. महाराज
म्हणजे दस्तुरखुद्द छत्रपती शाहू महाराज. एक सामान्य मुलासाठी आपला थाट बाजूला
ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे लोकराजे.
सह्याद्रीच्या
कणखरतेचे, निर्भीडतेचे प्रतीक असणारा महाराष्ट्र, गोदा, कृष्णा, वारणेच्या शीतलतेने
संपन्न झालेला महाराष्ट्र, संतांच्या आचार व विचाराने संपन्न झालेला महाराष्ट्र.
याच मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रोवला, स्वराज्य वाढवले,
घडवले व जोपासले. रयत सुखी करण्यासाठी आयुष्यभर झटले. हेच स्वराज्य मोठे करण्याचे
शिवधनुष्य पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी पेलले. या सर्व स्वराज्य व सुराज्याचा
कळस झाले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज. आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रातच
नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात आपल्या कार्याचा व कार्यपद्धतीचा ठसा ठळकपणे
उमटवणारे लोकराजे म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज.........
राजा
म्हणजे प्रजा आणि सुखी प्रजा म्हणजे सुखी राजा ह्या सूत्रावर आयुष्यभर जगणारे व
त्याप्रमाणे वागणारे राजे म्हणजे शाहू महाराज.
अंगे झाडीन अंगण | त्याचे दासत्व करीन ||
त्याचा होईन किंकर | उभा ठाकेन जोडोनी कर ||
तुका म्हणे देव | त्याचे चरणी माझा भाव||
तुकाराम महाराजांच्या या सुंदर
ओळी जणू महाराजांच्या व्यक्तित्वाचे, गुणाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठीच लिहल्या
आहेत असे वाटते.
ज्या काळात तत्कालीन सर्व राजे चैनविलासात व
ऐशोआरामात जगून आपल्या वैभव व राजेशाही थाटाचे दर्शन सर्वांना करून देत होते,
त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे लाडके शाहू महाराज आपला राजपाट सांभाळून सर्व दिखावा,
वैभव बाजूला ठेवून आपल्या रयतेसाठी अहोरात्र झटत होते. रयत सुखी झाली पाहिजे याचा
सतत विचार महाराजांच्या डोक्यात सुरू असे. शाहू महाराज राजे झाल्यापासून सुरू
झालेला हा प्रवास त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.
महाराज
म्हणजे आदर्शाचा जिवंत झरा होते. साधेपणा, वक्तशीरपणा, नम्रता, दातृत्व, माया,
प्रजाहित, दूरदृष्टी, कौशल्य, कर्तृत्व, पराक्रम, शालीनता, बुद्धिमत्ता,
व्यवहारज्ञान, हजरजबाबी, न्यायप्रिय, सर्वसमानता, गुणपारखता अशा अनेक गुणांचा एकत्रित
कुंभ म्हणजे शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराज या वेळी गादीवर आले, तोपर्यंत
ब्रिटिशांनी सारा हिंदुस्तान पोखरून काढला होता. महाराज कोल्हापूरचे राजे झाल्यावर
लढाई करणे, स्वाऱ्या करणे असे काहीच नव्हते. त्यामुळे महाराजांनी आपली सर्व शक्ती
व कर्तृत्व आपल्या प्रजेसाठी एकवटली. राजा झाल्यापासून महाराजांच्या कार्य
पत्रिकेतील सर्वात वरचा विषय म्हणजे प्रजाहित. या प्रजाहितासमोर महाराजांना सर्व
गौण वाटत असे. त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक छोटे-मोठे प्रसंग घडले की ज्यांनी राजांचे
आपल्या रयतेवरील प्रेम दाखवले.
पहिल्या महायुद्धाच्या
वेळीचा प्रसंग. किर्लोस्करांचा लोखंडी नांगर तयार करण्याचा कारखाना होता. त्यासाठी
लागणारे लोखंड इंग्लंडवरून यायचे, पण युद्धामुळे १९१६ मध्ये हे लोखंडे येणे बंद झाले.
बरीच तडजोड करून त्यांनी काही दिवस कारखाना चालवला, पण नंतर तेही शक्य होईना.
कारखाना बंद पडला, तर मजूर बेकार होतील शिवाय शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले
असते, पण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी लक्ष्मणराव व शंकरराव किर्लोस्कर यांनी
खूप विचार केला. त्यांच्या असे लक्षात आले की कोल्हापूर संस्थानातील किल्ल्यावर
बऱ्याच जुन्या तोफा गंजत पडल्या आहेत. शंकररावांनी कोल्हापूर गाठले. महाराजासमोर नम्रपणे
आपला विषय मांडला. “युद्धामुळे लोखंड मिळत नाही म्हणून नांगर बनवण्यासाठी तोफा
हव्यात.” हे शब्द ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता महाराज म्हणाले, “शेतकऱ्यांच्या उपयोगी
जर त्या तोफा पडत असतील तर द्या त्यांना द्या. किर्लोस्कर शहाणा माणूस आहे.” हे शब्द ऐकून शंकररावांचे हृदय भरून आले. एक दमडीही
न घेता तोफा किर्लोस्करांना देण्यात आल्या. राजा म्हणून राजाचे जीवन न जगता शाहू महाराजांनी आपले राजेपण केवळ जनतेच्या हितकल्याण- सुखासाठी
वेचले.
शाहू महाराजांच्या डोक्यात सतत रयतेचा विषय सुरू
असे. शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज यांचा विवाह बडोद्याचे गायकवाड
यांच्या कन्येशी निश्चित झाला होता. देण्या-घेण्यासंबंधी बरीच खलबते झाली. वधुपक्ष
दागदागिने व इनामी गावे द्यायला तयार होते, पण शाहू महाराजांना ८ लाख रुपये हवे
होते. जे वधूपक्ष देत असलेल्या मालमत्तापेक्षा 3 लाखांनी कमी होते, पण शाहू महाराज
८ लाखावर ठाम होते. शेवटी न राहून महाराजांचे बंधू बापूसाहेब महाराज यांनी राजांना
८ लाख मागणी बद्दल विचारले. शाहू महाराज म्हणाले, “आमचं संस्थान छोटं, त्यामुळे
उत्पन्न कमी. शेतसारा वाढवून उत्पन्न वाढवले तर गरीब भरडणार म्हणून मी ८ लाख रुपये हुंडा मागतोय. दागदागिने व इनामी गावे
विकून पैसा करणे शोभेल का?” या उत्तराने महाराजांचे बंधू गहिवरले.
या प्रसंगावरून महाराजांचे प्रजेविषयीची प्रेम व
काळजी सतत दिसते. आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नात वरबाप होऊन थाटात मिरवण्यापेक्षा
तिथेही प्रजाहित कसे जपावे हे महाराजांनी दाखवून दिले.
दिपावलीचा गोड दिवस होता.
कोल्हापूर समईच्या मंद प्रकाशाने उजळून निघाले होते. महाराज सर्व आटपून
नेहमीप्रमाणे गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले तेव्हा, त्यांची नजर एका ९-१० वर्षाच्या
मुलावर खिळली. त्याची चौकशी केल्यावर कळले की तो रथाच्या मागे उभ्या असणाऱ्या
नोकराचा मुलगा रामू. वडिलांचा डबा द्यायला आला होता. महाराजांनी डबा बघितला दोन
भाकरी व झुणका पाहून महाराजांना वाईट वाटले. आख्खे शहर गोडात असताना माझ्या
सेवकाच्या घरात दारिद्र. मुलाचे कपडे पाहून राजांच्या हृदयाने अश्रूंचा किनारा
कधीच ओलांडला होता. पूज्य साने गुरुजी म्हणतात,
“इवलासा अश्रू , पर्वत बुडवी
जीवाला चढवी, मोक्षपदी
इवलासा अश्रू , परी वज्रा चूरी
पाषाणाचे करी, नवनीत”
अगदी असेच घडले महाराजांच्या
हृदयातील अश्रूंनी त्या रामूचे जीवन बदलले. महाराजांनी त्याला नवीन कपडे व घराला पुरेल
एवढा फराळ बांधून देऊन आपल्या रथातून घरी पोहचवले.
शाहू महाराज कधीही
मनोरंजनासाठी शिकार करत नव्हते. ज्या ठिकाणी जंगली जनावरे शेतीचे नुकसान करीत
किंवा हिंस्त्र श्वापदे लोकवस्तीत घुसत त्यावेळी महाराज आपल्या प्रजेच्या हितासाठी
शिकार करत होते.
दलित समाज अस्पृश्य त्यांना कोणी जवळ घेत नव्हते
अशा लोकांना महाराजांनी आपल्या राजवाड्यात तसेच न्यायालय, तलाठी म्हणून नोकऱ्या
दिल्या. फासेपारधी समाजावरील चोरीचा
शिक्का पुसावा म्हणून त्यांना आपल्या नोकरीत घेतले. राजांच्यादृष्टीने सर्व प्रजा
सारखीच होती. या घटना राजांचे प्रजाहित अधोरेखित करतात. राजाप्रमाणे प्रजाही
महाराजांवर तेवढेच प्रेम करत होती किंबहुना राजांना पुजत होती. पुढील ओळी हेच
प्रेम दाखवतात.....
श्री शाहूनृपाची सेवा अमुचा ठेवा 1
शाहूविण दुसऱ्या आम्ही न भजतो देवा 11
महाराज
करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत दूरदृष्टीकोन होता. महाराजांच्या दूरदृष्टीत प्रजेचे
कल्याण लपले होते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राधानगरी धरण. शिकारीसाठी
दाजीपूरच्या जंगलात भटकताना तेथील लोकांशी संवाद साधल्यावर राजांच्या असे लक्षात
आले की शेतीला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी भोगावती नदीवर धरण बांधले तर पाण्याचा
प्रश्न कायमचा मिटेल. १९०९ रोजी ३० लाख रुपये खर्च गृहीत धरून हे काम सुरू झाले.
महाराणी लक्ष्मीबाई तलावाचे बांधकाम दगड व चुना वापरून करण्यात आले. महाराजांनी
आपल्यासाठी एक मजबूत व स्थापत्यशास्त्राचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा ठेवून गेले आहेत.
आज १०० वर्षांनंतरही धरण त्याच मजबूत स्थितीत व पाण्याची गरज भागवत आहे ही बाब महाराजांचा
दूरदृष्टीपणा दर्शवते.
कोल्हापूरला वसतिगृहांची
सुवर्णभूमी ही ओळख महाराजांनामुळे मिळाली. शिकणाऱ्या मुलांची राहण्याची सोय व्हावी
या दूरदृष्टीतून महाराजांनी कोल्हापूरमध्ये वसतिगृह सुरू केली. १९०९ ला मराठा वसतिगृहाची
सुरुवात एका मोठ्या बदलाची नांदी होती. त्यानंतरही वसतिगृहाची साखळी अशीच सुरू
राहिली. जैन, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत, अस्पृश्य, दैवज्ञ, श्रीनामदेव, सारस्वत
ब्राह्मण, वैश्य समाज, इंदुमती राणीसाहेब अशा अनेक वसतिगृहाची स्थापना केली. तेव्हापासून
आजपर्यंत कोल्हापुरात किंबहुना महाराष्ट्रच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून
शिकण्यासाठी या वसतिगृहाची दारे कायम खुली आहेत. राजांच्या दूरदृष्टीने आज १००
वर्षानंतर ही तितकाच फायदा शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना होत आहे.
महाराजांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण म्हणजे
कोल्हापूरत १९१६ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले होते. माझा
बहुजन समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे या ऐका तळमळी पोटी जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना प्रतिमहा १ रुपये
दंड ठेवला होता. शाहू महाराज म्हणत.... “माझ्या संस्थानातील सर्वजण साक्षर झाले
तर मी हे संस्थान प्रजेच्या स्वाधीन करेन.”
महाराजांच्या दूरदृष्टीचे
जिवंत उदाहरण म्हणजे कोल्हापूर-मिरज रेल्वे. मिरज या त्या काळच्या महत्त्वाच्या
ठिकाणापर्यंत रेल्वे जोडण्याचे काम १८८८ मध्ये महाराजांच्या हस्ते सुरू झाले. महाराज
१९०२ मध्ये परदेशात गेले होते. त्यावेळी रोम शहरास भेट दिल्यावर तेथील प्राचीन आखाडे
पाहून त्या वेळी ठरवले होते की कोल्हापुरात आपण असाच आखाडा बांधू व त्याच
दूरदृष्टीतून ‘खासबागचा’ उदय झाला. आज संपूर्ण भारतात कुस्ती पंढरी म्हणून
कोल्हापूर व खासबागचा उल्लेख होतो तो फक्त महाराजांच्या दूरदृष्टीमुळे.
याशिवाय नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण, सहकारी
नियोजन कायदा, कोल्हापूर बंधारे, तलाठी पद्धत, बलुते पद्धत रद्द, गुन्हेगारी जमाती
हजेरी कायदा बंद, महार वतने बंद, शाहू मिल अशा अनेक गोष्टी शाहू महाराजांची दूरदृष्टी
दाखवतात.
कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू महाराज म्हणजे
बलदंड रूप व कोमल हृदयी होते. त्यांच्या हृदयात माणुसकीचा, प्रेमाचा व समभावाचा
अखंड झरा वाहत होता. महाराजांनी २८ वर्षे केलेल्या राज्यकारभारात आपली प्रजा व
कोल्हापूर संस्थानाच्या विकास याचा सातत्याने विचार केला. आपल्याकडे आलेल्या व
प्रसंगी भेटलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा
काढण्याचे काम केले. महाराजांची घडवलेल्या अनेक रत्नापैकी एक रत्न प्रतिभासंपन्न
कवी ‘सुमंत’ राजांचे वर्णन काव्यात करताना लिहतात...
“ती भव्य अशी होती मूर्ती तयांची |
भव्यचि तत्प्रकृतीही
साची |
बहु उग्र दिसे जरी तयाचे रूप |
तरी कोमल हृद्यअमूप |
वक्राला होई वक्र |
विष्णूचे सुदर्शन चक्र |
भूतात भूप जणू
शुक्र |
क्षणि दैवबळे गिळी नक्रसम काळ |
छत्रपती शाहू नृपला ||”
महाराजांनी आपल्या विचारांमुळे संस्थांनात
धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल केला केला व त्यामुळेच ते राजर्षी
बनले. प्रजाहित व दूरदृष्टी सदैव डोळ्यासमोर ठेवल्यामुळे लोकराजा छत्रपती राजर्षी
शाहू महाराज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात लोकप्रिय बनले. त्यांच्या
विचाराने व दूरदृष्टीने संपन्न कोल्हापूर आज देशातील अग्रगण्य आहे. या विचार
संपन्न छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरचा मी भाग आहे याचा मला दृढ अभिमान आहे.
संदीप कोळी.
9730410154