Wednesday, 22 July 2020

सोशल दु:ख Social misery

सोशल दु:ख 
        नमस्कार.......
                          नमस्काराने सुरुवात केली कारण आज थोडा वेगळाच आणि जवळचा  विषय आहे. आपण सर्व-जण सध्या वेगवेगळी समाजमाध्यम आवडीने वापरतो, किंबहुना ती आपल्या सवयीचा भाग बनली आहेत.  या समाज माध्यमावर अनेक माहितीची देवाण-घेवाण सुरू असते.  दिवसभरामध्ये हजारो मेसेजच्या गराड्यात आपण गुरफटलेले असतो. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यु-ट्युब यासारख्या अनेक समाज माध्यमावर उपस्थित राहणे, तिथल्या अपडेट घेत राहणे व आपण सोशली ॲक्टिव आहोत हे दाखवण्यात अक्षरश: आपली दमछाक होते. त्यात या सर्व समाज माध्यमावर दररोज वेगवेगळे ट्रेंड असतात. ह्या दररोजच्या नवनवीन ट्रेंड प्रमाणे ॲक्टिव राहून आपले स्टेटस दाखवण्याची घाई अगदी धावपळीची आणि त्रासाची असते. तरीही हे सर्व त्रास सहन करून देखील आपण त्यात तरून राहतो हे आपले कौशल्य कौतुकास्पद आहे.
                       हे झाले नमनाला घडाभर तेल.........., पण खरा विषय वेगळाच आहे आणि तो आपल्याही लक्षात आला असेल. या विविध समाज माध्यमावर सोशली अॅक्टिव राहण्याच्या प्रयत्नात आपण आपले जवळचे लोक, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या खास बाबी मिस करतोय. तसे बघायला गेले तर आज प्रत्येक जण अशा खास बाबी समाजमाध्यम वर देखील शेअर करतात, पण आपण सर्व शोधण्याच्या गडबडीत त्या ही मिस करतोय किंवा काही वेळा उत्तर द्यायला कंटाळा करतोय, पण मेसेज पाठवणारा किंवा स्टेटस ठेवणारा मात्र हे आवर्जून लक्षात ठेवतो.
                        माझे  एक  स्पष्ट मत किंवा निरीक्षण आहे. जेव्हा अशा समाज माध्यमावर  फेरफटका मारत असताना आपण एखाद्याच्या  सुख-दुःख, यश-अपयश, वाढदिवस, महत्वाच्या बाबी यांची स्टेटस काळजीपूर्वक पहावी व त्याचा योग्य संदर्भ घेऊन प्रतिसाद द्यावा. जर आपल्याला हे शक्य नसेल तर आपण असे स्टेटस किंवा अशा पोस्ट टाळलेल्या बऱ्या निदान  मेसेज पाठवणाऱ्या किंवा स्टेटस ठेवणार्‍याला त्याचा विनाकारण त्रास होणार नाही.
                        आता खरा कळीचा मुद्दा......  तुम्ही म्हणाल यात गंभीर काय आहे? आम्ही बघतोय की... आम्हाला माहिती असते की.... पण खरी गंमत पुढे आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपला आनंद, दुःख, यश, अपयश, वाढदिवस, महत्वाच्या बाबी या निमित्ताने स्टेटस अथवा पोस्ट पाठवतो वेळी पाहणाऱ्याकडून अथवा ज्याला पाठववलेले, त्याच्याकडून योग्य प्रतिसादाची अपेक्षा करते. हे मानसशास्त्रीयदृष्ट्या सर्वांच्या बाबतीत घडत असते, पण समोरच्याकडून अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला तर त्यांच्या मनात नकारात्मकता निर्माण व्हायला सुरुवात होते. हे खरे सध्याचे सोशल दु:ख आहे. सध्या आपण या व्हरच्युअल जगाचा एक अविभाज्य भाग व हे व्हरच्युअल जग आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा बनले आहे.  तुम्ही किती नाही म्हणाला तरी आपल्याला अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला, तर हे प्रत्येकाच्या बाबतीत होतेच आणि मग हे साठत जाऊन त्याचा त्रास होतो. सध्या तर Lockdown च्या या काळात अशा नकारात्मकता व एकटेपणाची भावना अधिक गडद होते. याचे प्रमाण प्रत्येकाचे वेगवेगळे असेले तरी सतत याच विचारात राहण्याऱ्यासाठी हे गंभीर होऊ शकते.
                           आता मुद्दावर उतारा ....... अशा समाजमाध्यामावर सोशली ॲक्टिव राहत असताना आपण प्रतिसाद देण्याची ही काळजी जरूर घेतली तर आपले मित्र, जिवलगांची  व कधी-कधी आपल्यातील ही  नकारात्मक जरूर कमी व्हायला मदत होऊल. शेवटी जे मी नेहमी म्हणतो......सोशल मिडिया आपल्याला जेवढा सोसेल तेवढाच वापरावा म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
९७३०४१०१५४
sandip.koli35@gmail.com

अडचणी Problems (कविता)


अडचणी

अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला
उष:कालाला घरटे सोडणाऱ्या पाखराला
परतीची खात्री असतेच असे नाही
धरती रुजणाऱ्या बियाणाला
अंकुरण्याची संधी मिळतेच असे नाही

धो-धो कोसळणाऱ्या पावसाला
उमलणारी कळी दाद देत नाही
स्वच्छंदी बागडणारे फुलपाखरू
अथांग नभाला घाबरत नाही
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

पंख थकले गरुडाचे म्हणून
उड्डाणाची स्वप्न थकत नाहीत
सावज झाले शिकार म्हणून
जगण्याची इच्छा मरत नाही
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

एक कोंब खुडला म्हणून
झाड बहरायचे थांबत नाही
दोन वर्ष नदी आटली
म्हणून वाहायचे विसरत नाही
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

आयुष्याच्या या खेळात प्रत्येकजण
जीव तोडून लढत आहे
तूच मानवा फक्त आपल्या
अडचणी सांगून रडत आहेस
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

रडणं सोड आणि लढणं शिक
प्रयत्नांना यशाची जोड ठरलेली आहे
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निशदिप 
Sandip.koli35@gmail.com


वाट Path (कविता)




वाट
वाट अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.
संस्काराची शिदोरी कमी पडली असेल कदाचित,
पण मूल्यांची पुरचुंडी अजून घट्ट आहे
वाट अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

पडलो  असेन, धडपडलो असेन, वाट दाखवतो म्हणून अनेकांनी
वाट भुलवली असेल कदाचित असली तरी असु दे चुकली तरी चुकू दे
चुकलेल्या वाटेवर पुन्हा  मार्गावर येणार आहे
वाट अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

नाद करणारे भेटले, नाद लावणारे भेटले
नाद करायला लावणारे भेटले कदाचित
पण नादाला नाद लावून पुन्हा वाटेवर येणार आहे.
वाट अजून संपलेली नाही,  कारण मी अजून जिंकलेलो नाही

वरच्या रंगाला भुललो असेन ,काचेला सोने
समजून रक्तबंबाळ  झालो असेन कदाचित, पण
रक्ताळलेल्या पावलांनी पुन्हा वाटेवर येणार आहे.
वाट अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही

जवळची माणसे लांब गेली,लांबची माणसं अजून लांब गेली
असतील कदाचित, पण या माणसांच्या गर्दीत आपल्या
माणसांसोबत पुन्हा वाटेवर येणार आहे
वाट अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही

जुनी स्वप्न डत नाहीत अन नवीन स्वप्न पडत नाहीत कदाचित
पण उराशी बाळगलेले एका स्वप्नासह पुन्हा नवी झेप घेणार आहे
वाट अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही
---------------------------------------------------------------------------------------------------------------
निशदिप 
Sandip.koli35@gmail.com

करोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची Corona- a cataclysm or opportunity of innovation


करोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची
        
                      माणूस म्हणजे विज्ञानाचा होमो सेपियन सेपियन. जगातील सर्वात बुद्धिमान बुद्धिमान प्राणी. होय दोन वेळा बुद्धिमान कारण जगातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटकांचा आपल्या स्वतःसाठी उपयोग करून घेणारा एकमेव प्राणी. जीवसृष्टी अस्तित्वात आली त्यावेळी प्रत्येक सजीव प्राण्यांनी आपल्या विकासाची गती हळू ठेवली होतीपण मानवाची उत्क्रांती झाली आणि तो इतर प्राण्यांच्या तुलनेत उसेन बोल्ट बनला आणि सर्वांना कित्येक पटीने मागे टाकून विकासाचीप्रगतीची नवनवीन शिखरे त्याने सहज सर केली.
                      पृथ्वीवरची प्रत्येक शक्य गोष्ट मानवाने आपल्या फायद्यासाठी वापरली. इतर प्राण्यांना शक्य नव्हते अशा वातावरणातपरिस्थितीतही त्याने आपले कौशल्य पणाला लावून त्यावर मात केली. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर नव्हे तर अगदी ओरबाडून वापर केला. हे करत असताना मात्र मानवाने निसर्गाचापर्यावरणाचा व आपल्या इतर सजीवांचा कधी विचारच केला नाही. मदमस्त प्राण्याप्रमाणे त्याचा एकंदर वावर होतापण अचानक एक दिवस तो आजारी पडला आणि त्याला कळाले की त्याला covid-19 नावाचा आजार झाला. कारणांचा शोध घेतला त्या वेळी कळले की हा आजार करोना नावाच्या विषाणूमुळे झाला आहे. शिवाय संसर्गजन्य आहे. आता मात्र माणूस घाबरला. त्यांने उपाय शोधायला सुरुवात केलीपण जालीम उपाय सापडेना. सजीव व निर्जीव नसलेल्या या विषाणूने मानवाला चांगलेच अडचणीत आणले. माणसाने त्यावर उपाय शोधला तो म्हणजे लॉक डाऊन. स्वतःला इतरांपासून वेगळे करून आपण यातून बाहेर पडू शकतोपण यालाही आता खूप वेळ झाला आहे. जगभरात या विषाणूने कोट्यावधी लोकांना बाधित केले आहे व लाखो लोकांचा बळी घेतला आहे. हे आकडे अजूनही वाढतच आहे.
                    मानवाच्या चुकीमुळे आलेला हा विषाणू मानवाच्याच र्‍हासाला कारणीभूत ठरत आहे. याने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. मानव यातून बाहेर नक्कीच पडेलपण या करोनाच्या निमित्ताने काही गोष्टी नक्कीच अधोरेखित कराव्या  लागतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते “ The  earth has enough resources for our need but not for our greed. ”  सध्याची परिस्थिती काहीशी अशीच झाली आहेआपल्या अति हव्यासापायी आपणही महामारी ओढावून घेतली आहे.
                  सध्या देशात व जगात अनेक भागात लॉक डाऊन असल्यामुळे या परिस्थितीविषयी अनेक विचारअनेक मते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. करोना या प्रलयामुळे अनेक अडचणींना जगाला सामोरे जावे लागत आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था बुडाल्या आहेत. आर्थिक हानी झाली आहे. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. अनेक प्रगत देशांच्या वैद्यकीय सेवांची कमतरता समोर आली आहे. विकसनशील देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. अनेक देशात आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा अनेक अडचणी व आपत्ती करोनामुळे सर्व देशांच्या समोर उभ्या आहेत. याची चर्चा आपण टीव्हीइंटरनेट व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून सतत ऐकत आहोत. त्यामुळे या प्रलयाची हानीकारक बाजू आपल्यासमोर आहेचपण each coin has two sides त्याप्रमाणे या करोनाच्या प्रलयाला जशी विनाशाची किनार आहे,  त्याप्रमाणे यातून आशेचा किरण ही पाहायला मिळत आहे.
                 जगात गेली काही महिने व आपल्याकडील लॉक डाऊन अनेक सकारात्मक गोष्टी शिकवत आहे. याविषयी आपण विचार करायला हवा. करोना  व्हायरसमुळे आलेल्या या आरोग्याच्या जागतिक महायुद्धाने एक गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक शिकवली ती म्हणजे आपण कितीही प्रगत झाला तरी निसर्गाला मात  देऊ शकत नाही. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ या आपल्या मराठी म्हणीप्रमाणे निसर्गाने आपल्या चुका आपल्यावर उलटवल्या आहेत. यातून आपण वेळीच सावध व्हायला हवे. आपला हव्यास दूर करून निसर्ग व सर्व सजीवांची आपण मोठ्या भावाप्रमाणे काळजी घ्यायला हवी. ही नवी संधी यानिमित्ताने निसर्गाने आपल्याला धडा शिकून दिली आहे. या लॉक डाऊनच्या निमित्ताने आपल्या लक्षात आले असेल की आपल्याला ‘जगायला कमी आणि दाखवायला जास्त मिळवावे लागते.’ तसे बघायला गेले तर आपल्या जगण्याच्या गरजा मर्यादित आहेतपण त्याच्या इतर अनावश्यक वलयापाठीमागे आपण खूप धावत असतो. हे या काळात अधोरेखित झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण याच गरजांच्या गोष्टींना महत्त्व देण्याची नव्याने संधी आपल्याला मिळाली आहे. एका घरातील अनेक वाहनेसार्वजनिक वाहतूक याशिवाय इतर वाहने त्यामुळे वाढलेले प्रदूषण या काळात एकदम कमी होऊन हवा शुद्ध झाली आहे ही गोष्ट आपल्याला नवी संधी देते की आपण आता तरी शहाणे होऊ खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर करायला हवा व पर्यावरण जपायला हवे. या लॉक डाऊनच्या काळात अनेक नद्या शुद्ध झाल्या हे दाखवते कि पाण्याच्या प्रदूषणाला आपणच जबाबदार होतो व  आहेत ते कमी करण्याची नवी संधी निसर्गाने आपल्याला दिली आहे.
                या लॉक डाऊनमुळे आपल्याला आपल्या माणसांबरोबर वेळ घालवता येऊ लागला आहे. सध्या धावपळीत व स्मार्टफोनच्या जमान्यात दुरावलेली नाती यानिमित्ताने पुन्हा जवळ येऊन त्याची वीण पुन्हा घट्ट झाली असेल. आपल्याला हे नक्कीच समजले आहे की पैसाप्रतिष्ठावस्तू या आपल्या वापरासाठी आहेत व आपल्याला भावनिकमानसिक आधार देऊ शकत नाही. मात्र आपली माणसे हीच मोठी संपत्ती आहे. जी आपण दुरावत चाललो होतो. करोनाने पुन्हा नवी संधी दिली आहे आपली नाती दुरुस्त करण्यासाठीची.
                करोनाच्या या प्रलयात आपले बरेच नुकसान व तोटे झाले असले तरी निसर्गाने आपल्याला उदाहरणासह चांगला धडा शिकवून कमतरतेची जाणीव करून दिली आहे.
निसर्ग किमया दृष्टीसुख छान। अद्वैताचे भान मानवास।
वृक्षवल्ली तृण हिरवे कुरण। चरणास रान मुक्या जीवां।
परोपकार हा शिकवी निसर्ग।  धरत्रीचा स्वर्ग।जपुयात।
               या आरोग्य महामारीच्या संकटातून आपण लवकरच बाहेर पडून निसर्गाने दिले यांना या संधीचा आपण सकारात्मक उपयोग करून निसर्गाचा समतोल राखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. निसर्गातील इतर सजीव प्रमाणे आपण पृथ्वीच्या घटक असून मालक नाही याची पुन्हा एकदा आठवण करून देऊन आपल्याला मर्यादित राहण्याची ही नवी संधी निसर्गाने आपल्याला दिली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------- 
श्री. संदीप भिमराव कोळी
 9730410154
 sandip.koli35@gmail.com





पुस्तक परीक्षण- लपवलेल्या काचा डॉ.सलील कुलकर्णी Book Review- Lapvlelya Kacha By Dr. Salil Kulkarni



पुस्तक परीक्षण- लपवलेल्या काचा – डॉ.सलील कुलकर्णी



मनाप्रमाणे जगावयाचे
               किती किती छान बेत होते
    कुठेतरी मी उभा होतो.......
                      कुठेतरी दैव नेत होते.’
                  कविवर्य सुरेश भट यांच्या या सुंदर ओळी जगण्याचा आणि आयुष्याचा छान अर्थ सांगून जातात. आयुष्य जगत असताना बरे-वाईट अनुभव सर्वांनाच येत असतात.  चांगल्याची आठवण व वाईटाची शिदोरी घेऊन आयुष्य अखंड सुरु असते. जगण्यातला संघर्ष अगदी जन्मापासून सर्वांचा सुरू असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या अनुभवांना घेऊन आपण जगत असतो. कितीही प्रयत्न केला, पराकाष्टा केली तरी आयुष्यात काही-ना-काही पाठीमागे राहतेच, मग त्या आठवणी असो, प्रसंग असो, वा व्यक्ती असो. कर्तुत्वाने आणि अनुभवाने आपण कितीही मोठे व प्रगल्भ झालो तरी कधी निवांत क्षणी एकटे बसल्यावर विचारचक्र सुरू होते व नकळत भूतकाळातील आठवणींचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून सरकू लागतो. जगण्याच्या धावपळीत सुटलेले क्षण आणि राहिलेल्या आठवणी डोळ्यांच्या कडा ओलावून जातात, मग सहारा उरतो फक्त त्या आठवणींचा आणि त्या आठवणी शब्दरूपात मांडून वाट करून देण्याचा. ‘लपवलेल्या काचा’ हा डॉ. सलील कुलकर्णी यांचा ललितलेख संग्रह अशाच गोड आठवणी व विचारांचा ठेवा असलेले छानसे पुस्तक.  दमलेल्या बापाची कहाणी आपल्याला सांगत आयुष्यावर काही बोलायला लावणाऱ्या कवी, गायक, संगीतकार व लेखक डॉ. सलील कुलकर्णी यांचे हे पुस्तक.
                    पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने 23 एप्रिल 2011 रोजी प्रकाशित केलेला हा ललित लेखांचा संग्रह. मुळात हे पुस्तक म्हणजे डॉ. सलील यांनी लोकसत्ता दैनिकाच्या चतुरंग पुरवणी केलेल्या लेखनाचा संग्रह आहे. हे पुस्तक, याची रचना व आकार नेहमीच्या पुस्तकाच्या धाटणीपेक्षा खूप वेगळा आहे. आयुष्यात ज्यांनी लेखकाला घडवलं, शिकवलं, सावरलं अशा आई व हार्मोनियम या दोघींना हे पुस्तक समर्पित आहे. डॉ. सलील यांना वाटणाऱ्या 25 लेखांची मांडणी या पुस्तकात केलेली आहे.
                     प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला डॉ. सलील यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला मजकूर आपल्याला प्रत्येक लेखाची उत्सुकता जागृत करतो. या 25 लेखातील प्रत्येक लेख आपल्याला डॉ. सलील यांच्याबद्दलच्या वेगळ्या रूपाची, प्रतिभेची, हळव्या मनाची, दडपलेल्या भावनांची ओळख करून देतो. 
                      पुस्तकातील पहिलाच लेख ‘एकदाच खरं खरं’ आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवून जातो. “येणारा प्रत्येक क्षण प्रत्येकासाठी अटळ असतो. मग तो बाजूला ठेवून थोडं हसून मोकळा शास घेऊया’. ‘पुन्हा एकदा पहिल्यापासून..’ या लेखात मोजक्या शब्दात लहानपणापासूनच्या काही गोड आठवणी लिहिल्या आहेत. पु. ल. देशपांडे आणि छोटा सलील यांच्यातील सहीचा एक प्रसंग मनाला अत्यंत भावतो. सततचे दौरे, कार्यक्रम यातही लेखकाने मांडलेले हे छोटे प्रसंग त्यांच्यातील संवेदनशील मन उलगडून दाखवतात. “आयुष्यावर बोलू काही बघायचंय मला. पण तुमच्यात बसून!” या ओळी त्यांचा साधेपणा दर्शवतात. या ललित लेखांत लेखकाच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या त्यांच्या आई, कवयित्री शांताबाई शेळके, गुरू, सखा, बंधू, सुधीर मोघे, भावसंगीताचे पितामह दादासाहेबांचे आचरेकर यांची ओळख डॉ. सलील त्याच्या नजरेतून करून देतात. “लहानपणापासून ती गाढ झोपलीय आणि मी जागा असा प्रसंग मला आठवत नाही.” “भौतिकशास्त्राच्या कोणत्याही प्रमेयात न बसणारी ऊर्जा म्हणजे आई.” या वाक्यातून त्यांचे आईविषयीचे प्रेम लेखात व्यक्त होते. 70 वर्षाची मैत्रीण म्हणून शांताबाई शेळके यांचे ऋणानुबंध ‘एक होत्या शांताबाई’ या लेखातून, तर सुधीर मोघे म्हणजे चौसोपी वाडा हा त्यांचा अनुभव कथन करतात.
                        या पुस्तकातील काही प्रसंग किंवा कथा मनाला स्पर्शून हळव्या करून जातात. ‘तो आणि ती’, ‘राजा आणि बंडू’ आपल्याला भावनिक करतात. या पुस्तकात मध्यावरच ‘मनोरंजन मनोरंजन’ नावाची कविता गंभीर व भावनिक वातावरण हलके करायला मदत करते. “एक दिवस माझा मुलगा शुभंकरने हाताला ओढून नेले आणि सगळी खेळणी, पुस्तके दाखवून म्हणाला, खूप गमती आहेत माझ्याकडे, आता नको पैसे, तू घरी थांब. मी निरुत्तर” अशा स्वतःच्या प्रसंगातून ‘दमलेल्या बापाची कहाणी’ व त्यातून आलेले जिवंत अनुभव शब्दातून आपल्यातील बाप जागा करतात. कार्यक्रम, गाणे, प्रवास यातून जगायला शिकवलेले प्रसंग डॉ. सलील यांनी मोजक्या शब्दात मांडले आहेत.
                      पुस्तकाचे शीर्षक ‘लपवलेल्या काचा’ याची कहाणी उलगडते 15 व्या लेखात, मनाला भिडणाऱ्या प्रसंगाचे वर्णन या लेखात आपल्यालाही आपल्या लहानपणी घेऊन जाते. लेखक व त्यांची बहीण यांनी लहानपणी बागेत लपवलेल्या काचांचा हा भावनिक प्रसंग पुस्तकाचे शीर्षक सार्थ ठरवतो.
                     पुस्तक तुम्हाला नवीन काहीतरी मिळेल या विचाराने खिळवून ठेवते. पुस्तकात डॉ. सलील यांच्या हस्ताक्षरात बरोबर त्यांच्या विविध मुद्रेची रेखाटलेली रेखाचित्रे त्यांच्या भावमुद्रा दाखवतात. याशिवाय पुस्तकाची रचना, शब्द मांडणी अतिशय सुटसुटीत व बांधणी मजबूत आहे. त्यामुळे 207 पानाचे हे पुस्तक कंटाळवाणे वाटत नाही. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दस्तुरखुद्द लेखकाचा म्हणजे डॉ.  सलील कुलकर्णी यांचा शांत, संयमी फोटो आहे. तर मलपृष्ठावर महाराष्ट्राला पुन्हा कवितेच्या प्रेमात पडणाऱ्या संदीप खरे यांनी आपल्‍या मित्राबद्दल व पुस्तकाबद्दल लिहिलेला छोटा अर्थपूर्ण अभिप्राय आहे .
                     प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक लपवलेल्या काचा आहेत. 
                                              या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे............
                    कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ओळीप्रमाणे आयुष्यावर प्रेम करणाऱ्या  प्रत्येकाने कधीतरी या लपवलेल्या काचा शोधायला हव्यात. पुन्हा भेटू,कधीतरी! म्हणून डॉ.सलील आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील याच ‘लपवलेल्या काचा’ शोधण्यास या पुस्तकातून नक्की प्रवृत्त करतात.
धन्यवाद!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                
श्री. संदीप भिमराव कोळी
 9730410154
 sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...