Monday, 19 October 2020

दसरा (विजयादशमी)

 दसरा (विजयादशमी)

धर्माचा अधर्मावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय,

चांगल्या विचारांचा वाईट विचारांवर विजय,

म्हणजेच विजयादशमी

                      भारत हा संस्कृती प्रिय देश आहे. आपण भाषा, जाती, प्रांत यामुळे वेगवेगळे असलो तरी सण समारंभ व संस्कृती यामुळे एकाच धाग्याने जोडलेले आहोत. हेच अखंड भारताचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.

                      भारतात आपण अनेक सण-उत्सव आवडीने व आनंदाने साजरे करतो. आपण साजरे करत असलेल्या विविध सणापैकी दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. दसरा या सणाला विजयादशमी किंवा अश्विन शुद्ध दशमी असे म्हटले जाते. प्रत्येक वर्षी दसरा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

                     दसरा हा सण साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात येतो. भारतीय पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्र साजरी केली जाते व त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजे दसरा हा सण होय. दसरा हा दहा दिवसांचा सण मानला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते व दहाव्या दिवशी दसरा साजरा करतात.

                    दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय संपादन केला होता. तसेच याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून दसरा या सणाला आपल्याकडे विशेष महत्त्व आहे.

                  भारताच्या विविध राज्यात दसरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याच्या सणाला आपट्याची पाने एकमेकांना देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा केली जाते. संध्याकाळी आपट्याच्या झाडाची पूजा करून सोने लुटले जाते. दसरा या सणाच्या दिवशी झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे.            

               उत्तरेकडील पंजाब, उत्तर प्रदेश या सारख्या राज्यात दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करून वाईट विचारावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून दसरा साजरा करतात. दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात ही दसरा हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणी नऊ दिवस देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन दिवस सरस्वती व शेवटचे तीन दिवस दुर्गामातेची पूजा केली जाते. न, धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची उपासना केली जाते. मैसूर ची दसरा दसरा मिरवणूक जगप्रसिद्ध आहे.

                दसरा हा सण भारतीय संस्कृतीतील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे म्हणून या सणाच्या निमित्ताने नवीन वास्तू, गाडी, वस्तू, दागिने, जागा खरेदी केली जाते. याशिवाय नवीन करार, नवीन योजना यांचाही प्रारंभ केला जातो.

                दसऱ्याचे दुसरे नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा हे दसरा हा सण आपल्याला शिकवतो. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश, किर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची व लुटवायचा  हा दसऱ्याच्या शुभ दिवस असतो.

              सण समारंभाच्या निमित्ताने इतिहासातील पैलू बरोबर संस्कृतीची जोपासना हा उद्देश घेऊन चला दसरा साजरा करूया.

                                          “दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा

-----------------------------------------------------------------------------------------------------

 संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

कोविड योद्धयांचे योगदान

 

कोविड योद्ध्यांचे योगदान

 

             उत्क्रांतीच्या ओघात मानवाची प्रगती झाली आणि निसर्गाच्या चक्रातील मानव हा सर्वात बुद्धिमान व प्रगत सजीव ठरला. उत्क्रांती पासून अनेक अडचणींना मानवाने खंबीरपणे तोंड दिले. अनेक अडचणी या स्वतः मानवाने निर्माण केल्या होत्या तर काही निसर्गाने लादल्या होत्या. मानवाने प्रत्येक वेळी यातून धैर्य, संयम, सामर्थ्य व बुद्धीच्या जोरावर मार्ग काढला.

           इतरवेळेपेक्षा यावेळी युद्ध वेगळे होते. आपल्या चुकीमुळे म्हणा किंवा मानवाच्या खोडसाळ वृत्तीमुळे असेल अचानक एका विषाणूने आपल्यावर हल्ला केला. संपूर्ण जगाचे चक्र थांबले. नक्की काय करायचे? हे कोणाला समजेना. ‘कोरोना’ नावाच्या विषाणूमुळे जगभर थैमान घालायला सुरुवात केली आणि संपूर्ण मानव जातच अडचणीत आली.

             प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. प्रत्येक अडचणीतून पर्याय निघतो त्याप्रमाणे कोविड -19 चा प्रादुर्भावात गरज होती ती संयम, धैर्य, मदत आणि बुद्धीची..... या सर्व कसोटीवर पूर्णपणे खरे उतरून या जागतिक आरोग्य संकटात संयमाने सामना केला व आजही खंबीरपणे करत आहेत ते म्हणजे आपले कोरोना योद्धा......

           कोविड -19 च्या या महामारी मध्ये डॉक्टर व त्यांच्या सर्व वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेले कार्य व दिलेले योगदान म्हणजे समस्त मानव जातीवर केलेले खूप मोठे उपकार आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर  राहून जनसेवा करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, सर्व वैद्यकीय कर्मचारी, आशा म्हणजे या कोरोना महामारी मध्ये प्रत्यक्ष देवदूतच ठरले आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना त्यांना मरणाच्या दाढेतून परत आणणारे वैद्यकीय कर्मचारी हे देवा पेक्षा कमी नाहीत.

              कोविड -19  च्या या संकटात आणखी एक कोरोना योध्यांचा यांचा गट प्रभावीपणे आपले योगदान देत आहेत ते म्हणजे आपली पोलीस बांधव  होय. कठीण कालखंडात 24 तास ड्युटी करून आपल्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन समाजातील घटकांसाठी लढणारे पोलीस बांधव हे खरे कोरोना योद्धा होत.

                कोरोनाच्या या आरोग्य विपत्तीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले व अनुभवले आहे. स्वच्छता ठेवणारे आपले सर्व स्वच्छता कर्मचारी हे कोरोना योद्धा आपल्यासाठी धावून आले. कोरोना च्या काळात स्वच्छता ठेवण्यात यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

               सरकारी यंत्रणाही या संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावली. प्रशासनातील सर्व घटक, सर्व सरकारी कर्मचारी या संकटात खंबीरपणे उभे राहून त्यांनी आपले योगदान दिले आहे. या सर्वांच्या बरोबर शिक्षकांची ही कोरोना योद्धा म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली. ऑनलाइन शिक्षण, कुटुंब सर्वेक्षण, चेक पोस्ट ड्युटी यासारख्या कामातून शिक्षकांनी कोरोना काळात प्रभावी योगदान दिले आहे.

            कोरोनाच्या या अनपेक्षित आरोग्य संकटात डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, सरकारी यंत्रणा, शिक्षक व इतर घटक यांचे कोरोना योद्धा म्हणून असलेले योगदान आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. त्याबद्दल आपण या सर्व कोरोना  योद्ध्यांच्या आजन्म ऋणात राहू या 

भीती घालवू, काळजी घेऊ

कोरोना संकटाला, धीराने तोंड देऊ

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com


डॉ. अब्दुल कलाम Dr. Abdul Kalam

 

डॉ. अब्दुल कलाम

 

स्वप्न ते नव्हे, जे झोपल्यानंतर पडतात, तर खरे स्वप्न ते असतात,

जी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपू देत नाही.”

                         या तत्वाने आयुष्यभर जगणारे व भारताला जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवणारे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ..पी.जे अब्दुल कलाम होय.

                      ब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम होय. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या छोट्या गावात एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरुंना नेण्याआणण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या आईचे नाव अशियम्मा होते.

                       डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे मिळवून घराला आर्थिक मदत करीत असत. त्यांचे बालपण कष्टात गेले. शालेय जीवनात त्यांना गणित या विषयात अधिक आवड वाटू लागली. शालेय शिक्षणानंतर सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून त्यांनी बी.स्सी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रवेश घेऊन एरोनॉटिक्स चा डिप्लोमा पूर्ण केला. या प्रसंगी त्यांना आर्थिक  अडचणीना तोंड द्यावे लागले.

                        शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेत महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.  1958 ते 1963 या काळात डॉ. कलाम यांचा संबंध संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) बरोबर आला. 1963 मध्ये ते भारतीय संशोधन संस्था अर्थात इस्रो च्या क्षेपणास्त्र विकासातील संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताच्या क्षेपणास्त्र विकास एकात्मिक कार्यक्रमाच्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओ मध्ये आले.

                      इस्रो मध्ये डॉ.कलाम सॅटलाईट लोन्चिंग व्हेईकल-3  या प्रकल्पाचे प्रमुख होते. भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी यशस्वीपणे सांभाळली. अवकाश संशोधनात डॉ. कलाम यांनी भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

                    वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर होता. आपल्या सहकाऱ्यातील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.  पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार व संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

                   भारत सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सतत देशाचा विज्ञानाचा विषय डोक्यात असणारे डॉ. कलाम अत्यंत साधे व संवेदनशील होते. डॉ.कलाम यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांना शिकवण्याचा व त्यांच्याशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम आयुष्यभर अविवाहित राहिले. अग्निपंख हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध व प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतातील युवकांच्या भारताच्या महासत्तेचे बीज रोवले.

                   25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पद भूषवले. या काळात आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने व साधेपणामुळे ते लोकप्रिय राष्ट्रपती झाले. वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत आपले शिक्षण पूर्ण करून देशाच्या अवकाश संशोधनात गरुड झेप घेणारे अब्दुल कलाम आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत होते. 27 जुलै 2015 रोजी डॉ. कलाम यांचे व्याख्यान देत असताना निधन झाले.

                 भारताला अवकाश संशोधनात मोठे यश मिळवून देणारे व युवकांसाठी सदैव प्रेरणा देणाऱ्या डॉ. .पी.जे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com



हिंदी दिवस Hindi Day

 

हिंदी दिवस

 

भारत माता के माथे की बिंदि है  ये हिंदी

न-जन  की वंदनीय और मा सम है ये  हिंदी

 

                   भारत हा एक विशाल देश आहे. भारतात अनेक धर्म, संस्कृती व भाषा यांचा सुरेख संगम आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात व प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलीभाषा बोलल्या जातात. इंग्रजांच्या जाचातून भारत 1947 रोजी स्वतंत्र झाला. अखंड भारतासाठी एक नवीन सुरुवात झाली. भारतासारख्या एवढ्या वैविध्यपूर्ण देशात सर्व गोष्टी एकसंघ ठेवणे हे खूप महत्त्वाचे व जबाबदारीचे काम होते. याला  भारतीय संविधानाने प्रत्येक्ष रूप दिले.

                   प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या आपल्या देशाची एक अधिकृत भाषा असावी असा विचार पुढे आला. यावर खूप विचारमंथन झाले. भारतात सर्वात जास्त बोलली व समजली जाणारी भाषा म्हणून हिंदी या भाषेला  14 सप्टेंबर 1949 रोजी संविधानाने भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली.  तेव्हापासून 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रभाषा हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

                  हिंदी ही भाषा देवनागरी लिपीमध्ये आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा मध्ये हिंदी भाषा सर्वाधिक बोलली जाते. भारतातील जवळपास 80 टक्के लोकांना हिंदी भाषा समजते. त्याबरोबर हिंदीतून आपले विचार व्यक्त करू शकतात.  हिंदी एक सहज व सोपी भाषा आहे.  हिंदी भाषेला संस्कृत या भाषेची बहीण मानले जाते. हिंदी भाषे अनेक प्रादेशिक भाषेतील शब्दांचा समावेश आहे. त्यामुळे ती प्रत्येक भारतीयाला आपली भाषा वाटते.  पंजाबी, उर्दू, गुजराती, मराठी, उडिया, राजस्थानी यासारख्या अनेक भाषेतील शब्द आपल्याला हिंदी भाषेत मिळतात.

                   जगात बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या भाषांमध्ये एक प्रमुख भाषा म्हणून हिंदी ची ओळख आहे. जगातील एक प्राचीन, समृद्ध व सोपी भाषा म्हणून हिंदी भाषा परिचित आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की, राष्ट्रभाषा शिवाय कोणताही देश मुका आहे.” प्रत्येक देशाची आपली एक राष्ट्रभाषा असते. राष्ट्रभाषेमुळे राष्ट्रीय एकता, समता आणि बंधुभाव वाढण्यास मदत होते. विचारांचे आदान-प्रदान होते.

                    हिंदी ही व्याकरणदृष्ट्या व साहित्यदृष्ट्या जगातील एक समृद्ध भाषा आहे. हिंदीमध्ये विविध कथा, कविता, कादंबरी, लेख, चरित्र, आत्मचरित्र यासारख्या साहित्यांचे विपुल भांडार उपलब्ध आहे. अनेक प्रतिभावान हिंदी लेखकांनी ते खूप समृद्ध केले आहे व करत आहेत. विविध नाटिका, सिनेमा, मालिका, जाहिराती या माध्यमातून पूर्ण देशाला हिंदी भाषेची व संस्कृतीची ओळख होत असते.

                     14 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात हिंदी भाषा दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कॉलेज व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, वाद-विवाद, कथाकथन, कविता वाचन या सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हिंदी दिवस सप्ताह, हिंदी दिवस पंधरवडा ही काही ठिकाणी साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यालयात अनेक कार्यक्रमांनी हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांना विविध पुरस्कारांनी यानिमित्त सन्मानित करण्यात येते. राज्य व देशपातळीवर सरकार मार्फत ही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

                          भाषा हे आचार व विचार देवाणघेवाणीचे प्रभावी माध्यम आहे. राष्ट्रभाषा म्हणजे तर पूर्ण देशाला एका विचारात व भाषेत बांधणारी भाषा होय. हिंदी या आपल्या राष्ट्रभाषेचे आपल्या व्यवहारात, बोलण्यात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात संवादासाठी आपल्याला राष्ट्रभाषा हिंदी महत्त्वाची आहे. अखंड भारताचे नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रभाषा हिंदीचा सन्मान करणे व तिचा जास्तीत जास्त वापर करणे हा आपला राष्ट्रधर्म आहे.

                            प्रत्येक वर्षी हिंदी दिवस साजरा करत असताना आपण आपली खरी ओळख साजरी करतो. भारतात खूप विविधता असून त्यात एकता कशी आहे हे आपण यातून जगाला दाखवून देतो. फक्त हिंदी दिवसाचे महत्त्व 14 सप्टेंबर या दिवसा पुरते मर्यादित न राहता ते वर्षाचे 365 दिवस अबाधित राहिले पाहिजे. शक्य तितका हिंदीचा वापर करून आपण हिंदी या राष्ट्रभाषेचे महत्त्व कायम ठेवू शकतो. हिंदी दिवसाच्या निमित्ताने आपण हिंदी या राष्ट्रभाषेचे महत्त्व अबाधित ठेवून हिंदीचा गौरव वाढवायला हवा.

हिंदी भाषा नही  भावो की अभिव्यक्ती है

यह मातृभूमि पर मर मिटने की भक्ति है

-----------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com



आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...