आपल्या लक्षातही येत नाही......
आपल्या
दररोज पाहण्यातील झाडांची शरद ऋतूत पानगळ होऊन वसंतात नवी पालवी येऊन ती झाडे
पुन्हा बहरून जातात आपल्या लक्षातही येत नाही......
घराच्या
शेजारी एखाद्या झाडाच्या फांदीवर इवलीशी चिमणी अथक प्रयत्नाने छोटेसे इमले बांधून
त्यात छोटी अंडी देऊन पिलांना जन्मही देते. चिवचिवाटाने गजबजलेले ते घरटे कधी
रिकामे होते हे आपल्या लक्षातही येत नाही....
घराच्या
परसबागेत आपण प्रेमाने लावलेल्या फुलाच्या रोपाला नाजूक कळ्या लागून त्याची सुंदर
फुले उमलून कधी कोमेजून गेली हे आपल्या लक्षातही येत नाही....
लहानपणी
एखादा पदार्थ, एखादे फळ कधी बाजारात येते याची आतुरतेने वाट पाहणारे आपण आता ते फळ,
तो पदार्थ बाजारात येऊन गेला तरी आपल्या लक्षातही येत नाही....
होय या निसर्गचक्रातील बाबी आहेत कधी आपल्या
लक्षात येतात कधी नाही. कामाच्या व्यापात आणि मोठेपणाच्या ओझ्याखाली आपण गुरफटले
गेले आहोत त्यामुळे हे घडणारे बदल आपल्याला फारसे महत्वाचे वाटत नाहीत.
घडणारे
हे बदल आपल्या सभोवती घडत असतात त्याचा परिणाम आपल्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
होतच असतो याबरोबरच आणखी एका महत्वाच्या बाबीकडे आपण सध्या दुर्लक्ष करत आहोत ते
म्हणजे आपला जवळचा सोबती मोबाईल.......
मोबाईल, तुम्ही म्हणाल शक्यच नाही.
श्वासाप्रमाणे प्रत्येक क्षणाला मोबाईल सदैव आपल्या जवळच असतो व आहे. आई आपल्या
इवल्याशा तान्हुल्याच्या जेवढी जवळ असते तितकेच आपण मोबाईलच्या जवळ असतो, पण मुळातच
मुद्दा हा आहे की आपला मोबाईल आपल्या जवळ असतो पण त्यातील सर्वच गोष्टी आपण बारकाईने
बघत नाही.
होय, तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या याच
अनेक गोष्टी आपल्याकडून दुर्लक्षित झाल्या आहेत. विश्वास वाटत नसेल तर तपासून बघा........
आपल्या whatsapp च्या chat मधील आपल्याशी नेहमी
संपर्कात असणारा आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा इतर व्यक्ती कित्येक महिने
आपल्या संपर्कातच नाही, पण ही गोष्ट आपल्या लक्षातच आलेली नाही....
आपल्या जवळच्या कित्येक लोकांना आपण गेली कित्येक
महिने संपर्कच केलेला नाही. फोन, मेसेज, मेल अशा कोणत्याच माध्यमातून संपर्क
केलेला नाही.
facebook किंवा insta वर आपली
प्रत्येक पोस्ट like करणाऱ्या एखाद्याची profile तिकडून delete झाले आहे हे
आपल्याला समजलेच नाही.
सध्या तंत्रज्ञानाच्या संपर्कात
नसलेला व्यक्ती म्हणजे इतरांच्या दृष्टीने त्याचे अस्तित्व शून्य झाले आहे.
जगण्याच्या धावपळीत आपण इतक्या वेगाने
पळत आहोत की आपल्या सोबतचे कित्येक सोबती कधीच मागे पडले आहेत हे आपल्या ध्यानातच
आलेले नाही आणि आपण कशासाठी धावतोय हे तरी कुठे लक्षात येतय आपल्या....
तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपण त्यावर काळजीची
जबाबदारी सोपवून आपण बेजबाबदार झालो आहोत. त्यामुळे एखाद्या व्यक्ती, मित्र,
मैत्रिणी व इतरांविषयी वाटणारी आपुलकी, काळजी, आठवण या तंत्रज्ञानात कुठेतरी हरवली
आहे.
काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या
विळख्यात ती हरवण्याआधी ही निसटलेली कडी आणि हरवलेली नाती शोधायला हवीत.
संदिप कोळी