प्रेरणादायी पुस्तके, वक्त्यांची भाषणे किंवा अगदी घरात आपल्या मोठ्यांच्या कडून "गरुडभरारी" या शब्दाचा उल्लेख वारंवार होतो. पण आपण माणूस आहोत या पृथ्वीवरील सर्वात प्रगत आणि सर्वात बुद्धिमान प्राणी मग आपल्याला या इतर प्राणी किंवा पक्ष्यांच्या विशेषनाची गरज काय? खर आहे ना!.. असा प्रश्न कधीतरी पडला असेलच की आपल्याला. पण आपल्या प्रश्नातच आपले उत्तर दडलेले आहे. आपण प्रगत आणि बुद्धिमान आहोत म्हणून आपण सर्वांकडून ज्ञान मिळवतो
गरुड पक्षी आपल्या सरासरी वयाच्या साधारण निम्मे आयुष्य जगल्यावर त्याच्या आयुष्यात देखील एक बॅड पॅच येतो. ज्या पंखांच्या जोरावर निळाशार आकाशावर अधिराज्य करत असतो. आपल्या ज्या अणकुचीदार चोच आणि नख्याने भक्ष टिपत असतो .तेच अवयव त्यांची साथ सोडू लागतात. पंख जड होऊ लागतात. चोच वाकडी होऊ लागते. नख्या बोथट होऊ लागतात. आपल्या भरारीने जंगलावर राज्य करणाऱ्या या भारदस्त पक्षाची अवस्था केविलवाणी होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते.
पण हार मानेल तो गरुड कसला. त्याचं काळीजचं वेगळे... तो एकटाच डोंगरावर उंच ठिकाणी जातो. तिथल्या कठीण खडकावर चोच आपटून नको असलेला भाग काढून टाकतो. दगडावर चोच घासून अणकुचीदार करतो. मग त्या अणकुचीदार चोचीने अापली बोथट झालेली नखे उपसून टाकतो. प्रचंड वेदना सहन करून आपल्या नव्या नख्या येण्याचा मार्ग मोकळा करतो. नवीन चोचीच्या साहाय्याने तो आपली जुनी,जड पिसे ओढून काढतो. असा बिनपंखांचा गरूड वेदना सहन करत एकटाच राहतो. काळ लोटतो हळू-हळू नवीन पंख व नख्या येऊ लागतात तोपर्यंत चोचपण अजून बळकट होते. गरुडाचा रुबाबदारपणा पुन्हा दिसू लागतो हा जीवनसंघर्ष तब्बल १५० दिवस चालतो. पण हा संघर्ष पुढचे अर्ध आयुष्य त्याचा रुबाब टिकवून ठेवण्यास पुरेसा असतो. यानंतर गरुड आपल्या जगप्रसिद्ध गरुडभरारीसाठी पुन्हा सज्ज् होतो. पुन्हा त्याच ताकदीने, आत्मविश्वासाने व शौर्याने पुढील आयुष्य जगतो.
आपल्या जीवनातही असा बॅड पॅच येतो. एखाद्या अपयशाने आपली अवस्था केविलवाणी होते. प्रचंड निराशा आपल्या पदरी येते. सगळं असह्य होत. सगळे मार्ग बंद झालेत असे वाटते. त्यावेळी गरूड प्रमाणे आपल्या कामगिरीची वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण करायला हवे. आपले कुठे चुकले व कशामुळे अपयश आले याचा शोध घ्यायला पाहिजे. त्यानंतर गरुड ज्याप्रमाणे आपले नको असलेले भाग काढून टाकतो त्याप्रमाणे आपण आपल्या चुकीच्या सवयी बदलल्या पाहिजेत. अवगुण दूर केले पाहिजेत. आपल्यात असलेल्या गुणांचे, कौशल्यांचे आत्मपरीक्षण करायला हवे. याबरोबर गरुडाप्रमाणे आपल्या गुणांना व प्रयत्नांना पुन्हा एकदा नव्याने धार लावली पाहिजे. आपला आळस व नैराश्यामुळे आलेल्या नाकर्तेपणा झटकून नाविन्याची संजीवनी जागवायला हवी. नवीन परिवर्तनाला वेदना सहन करून हसतमुखाने सामोरे जायला हवे तरच उद्याची गरुडभरारी आपण घेऊ शकतो
एखाद्या योद्धाचं शौर्य आणि ऋषींचे तप अंगी बाळगणाऱ्या या राज पक्षाची ही भरारी जगभर गरूडभरारी म्हणून मानाने ओळखली जाते व गरुडाचा हा जीवनसंघर्ष आपल्या आयुष्याची नवी प्रेरणा बनू शकतो.
----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
sandipkoli35@blogspot.in
Wednesday, 20 December 2017
गरुडभरारी.....
Monday, 27 November 2017
लक्ष्मणरेषा
लक्ष्मणरेषा
रामायणात लक्ष्मणरेषा या शब्दाचा संदर्भ खूप चांगला आहे तो झाला धार्मिक संदर्भ पण पण आपल्या बाबतीत लक्ष्मणरेषा......
एक शर्यत असते.... शर्यतीला एक सुरुवात असते. त्याप्रमाणे आपणही सुरुवात करतो. शर्यत सुरु होते आणि आपण पूर्ण ताकतीने धावायला सुरुवातही करतो. पहिले काही अंतर आपण इतकं वेगानं व आक्रमकपणे पळतो कि पाहणाऱ्यांना व आपल्या बरोबरच्या स्पर्धकांना ही वाटतं कि तुम्हीचं जिंकणार ! पण जस-जशे अंतर वाढत जाते तस-तसे आपला ऊर भरून येतो. मग आपण आपल्या पाठीमागच्या व बरोबरच्या स्पर्धकांच्याकडे नजर फिरवल्यावर आपल्या लक्षात येते कि त्यांनी तर स्पर्धा कधीच सोडून दिली आहे ते तर आता प्रेक्षकांचा भाग झाले आहेत.
आपणही आता दमलेलो असतो पुढचा अंदाज घेतला तर अजूनही आपल्यापुढे बरेच जण धावत असतात. आपल्यालाही आता दम लागलेला असतो. आपण मग विसाव्याच्या नावाखाली थोडया वेळासाठी शर्यतीतून बाहेर जातो आणि नकळतपणे आपणही त्या प्रेक्षकांचा भाग बनून शर्यतच एन्जॉय करू लागतो. विसाव्याच्या नादात आपणही त्या प्रेक्षकांच्या गर्दीचा भाग कधी होऊन जातो ते आपल्या लक्षातही येत नाही.
नंतर विसाव्याची जाणीव संपल्यावर आपल्या लक्षात येते कि आपणही स्पर्धक आहोत. मग आपण स्पर्धेकडे पाहतो पण आता धावणारे बरेच लांब अंतर असतात. आणि मग आपल्याला नव्याने सुरुवात करणे अवघड वाटते. आपण थांबते ,थोडा वेळ विचार करतो आणि एक "लक्ष्मणरेषा" आपण आपल्या सभोवती ओढून घेतो. त्या रेषेचे संदर्भ आपणच द्यायला सुरु करतो. 'अरे माझी परिस्थिती नाही','अरे मला वेळच मिळत नाही', 'अरे घरची जबाबदारी आहे माझ्यावर', 'सगळ्या धावपळीत जमत नाही' अशी एक ना अनेक कारणे सांगून आपण अक्षरशः रडतो. आणि आपणच आपली समजूत काढतो आणि शर्यतीतून हळूच माघार घेतो.खरं बघायला गेले तर आपण हे सर्व ज्यांना सांगतो त्यांना त्यात फारसं घेणे नसते कारण ते प्रेक्षक असतात. जिंकणाऱ्याचा ते जयजयकार करणार असतात. हरणाऱ्याशी त्यांचा काही संबंध असत नाही.
मात्र त्या गर्दीत असे काही चेहरे असतात ते मात्र आपल्यासाठीच शर्यत बघत असतात आणि आपणच जिंकावे अशी अपेक्षा करत असतात. आपल्या अशा अचानक स्पर्धा सोडण्याने त्यांना खरा धक्का बसतो. आपण आपले सांत्वन करतो पण त्यांचे काय ?????
नंतर ज्यावेळी त्या शर्यतीचा निकाल लागतो व जिंकलेल्या स्पर्धकांची चर्चा सुरु होते त्यावेळी आपण आपली क्षमता, योग्यता सांगत बसतो आपण नव्हतो म्हणून ते जिंकले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.
खरं तर आपल्याकडे क्षमता, योग्यता नसते असे नाही .आपणही जिंकलो असतो पहिला नाही पण नंबर तरी काढला असता पण आपण आपल्या क्षमता बंधिस्त करतो. आपण आपल्या भोवती मर्यादेचे एक कडे आखून घेतो आणि त्यातच स्वतःला सुरक्षित समजतो. ती "लक्ष्मणरेषा" आपण कधी पारच केली नाही म्हणून ती शर्यत आपण जिंकलीच नाही.....
"लेहंरो से डर कर नौका पार नही होती,
कोशीश कर ने वालो कीं हार नही होती।"
------------------------------------------------------------------
संदीप कोळी
गोलमाल अगेंन
हुश्श, झाली एकदाची exam. खरे तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अशा exam वारंवार येत असल्या तरी प्रत्येक वेळी exam झाल्यावर एव्हरेस्ट सर केल्याचा फील नक्की येतो. शिवाय exam च्या आदल्या दिवशी रट्टा मारून अभ्यासाचा ताण प्रचंड असतो. हा ताण घालवण्यासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांसोबत एक सेलिब्रेशन ट्रीट तर बनतेच ना बॉस....
आणि परवा ह्याच ट्रीट साठी गॅंग कॅन्टीन मध्ये जमली, आता गॅंग जमली म्हणजे गप्पा-टप्पा आल्या. शिवाय exam मुळे सिरीयस वातावरणामुळे वायफळ गप्पाच झाल्या नव्हत्या त्या एकदम सुरु झाल्या. आता कॉलेज च्या पोरांच्या गप्पा म्हणजे फॅशन, बॉलीवूड आणि क्रिकेट. त्यातच परीक्षेचा कंटाळा घालवण्यासाठी पिक्चर ला जायचा विषय निघाला आणि गप्पांचा टॉपिक सिनेमावर आला. 'सच्याने ' सुरुवात केली "काही नाही रे सध्या पिक्चर मध्ये सगळीकडे वादच चालू आहे. 'विक्याने' पण सूर ओढत "होय रे दीपिका,शाहिद,रणवीर च्या पद्मावतीचा वाद जोरात सुरु आहे रे. तोपर्यंत राहुल्याने पण त्यात उडी घेतली " होय रे मराठीत पण चर्चा सुरु आहे. 'दशक्रिया' आणि रवी जाधव सरांचा 'न्यूडं' याही दोन चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीचे वातावरण तापवून टाकले आहे. यावर "ते सगळे काहीही असो आपण चित्रपट मनोरंजनासाठी बघतो ना, मग संपला विषय म्हणत "साक्षीने' कमी शब्दात आपलीही प्रतिक्रिया दिली.
अशीच चर्चा तुमच्याही ग्रुप, कट्ट्यावर सध्या ऐकू येत असतील. सिनेमा हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो मग तो नट-नटी यांच्यामुळे, सिनेमाच्या विषयामुळे, त्याच्या कमाईमुळे किंवा त्याच्या वादामुळे. सिनेमा आणि वाद हे काही नवीन नाही. याआधीही असा वाद आणि विरोध अनेक वेळा झाले आहेत. पण सध्या हा वाद बहुचर्चित पद्मावती आणि मराठीतील दशक्रिया व न्यूड या दोन सिनेमामुळे पुन्हा एकदा वर आला आहे. पूर्वी पासून आपल्याकडे सिनेमाचा एक ढाचा तयार झाला आहे. त्यात कॉमेडी, ट्रॅजिडी, गाणी , मसाला यांचा भरणा करून तो आपल्यापर्यंत सर्व केला जातो. बरेच डायरेक्टर यात फार बदल न करता सिनेमा बनवतात. पण अलीकडच्या काळात काही डायरेक्टर प्रयोगशील झाले आहेत. यातून वेगळ्या आशयाचे व धाटणीचे सिनेमे तयार करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. असे सिनेमे गाजतात व प्रेक्षकांना आवडतात ही. पण या प्रयोगशीलतेमुळे काही वेळा वादाचे प्रसंग येतात. सिनेमाचा आक्षेपार्ह विषय किंवा काही प्रसंगामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन त्या सिनेमाला विरोध होतो.
मूळतः सिनेमा हा समाजाचा आरसा असतो. आपल्या समाजात घडणाऱ्या घटना यांचा आरसा सिनेमा आपल्या समोर उभा करत असतो. सिनेमाचा आशय व त्याच्या सादरीकरणामुळे समाजातील विविध दुर्लक्षित व महत्वाचे विषय आपल्यासमोर येतो. पण अशा बोल्ड विषयामुळे सिनेमाविषयी नाराजी वाढते. पण सिनेमात असे वेगळे विषय व नवीन प्रयोग व्हायला हवेत. हॉलिवूड शी तुलना करता टिपिकल मसाला पटातून बाहेर पडून नवीन विषयाचे सिनेमे व्हायला हवेत. हा त्याविषयी कॉन्टरवसी कमी व्हायला हवी. आपण कशासाठी सिनेमा पाहतो व तो कोणत्या अँगल ने पाहतो हे महत्वाचे बाकी टीका आणि कौतुक हे दोन्ही होतच असते.
या गंभीर चर्चेचा गोलमाल अगेन आणि अगेन चालूच राहणार. कारण Any publicity is good for publicity. त्यामळे सिनेमा चर्चेत राहतो. आणि अपने को तो सिर्फ एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट चाहिये और सिनेमा एंटरटेनमेंट है........
-----------------------------------------------------------------
संदीप कोळी
बॅक टू कॉलेज
हाय फ्रेंड्स, संपली कि नाही सुट्टी, संपल्या असतील म्हणा, काही जणांचे तर रेग्युलर रुटीन चालूही झाले असेल. तुळशीची लग्न हि लावून झाली म्हणजे ऑफिसिअल दिवाळी सण हि संपल्याचे जाहीर झाले. घरातले लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा, संपला असेल. आता फक्त दिवाळी फराळाचे जोक तेवढे सोशल मीडिया वर फिरत आहेत. बाकी वर्षातला सर्वात मोठा व आनंदाचा सण आपण तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला आहे. या दिवाळीत आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या असतील शिवाय इतरांना आवडणाऱ्या गोष्टीही या सणांच्या निमित्ताने आपण नक्कीच केल्या असतील.
दीपावलीच्या या धामधुमीत इंटरटेन्मेण्टचा पण मोठा धमाका आपल्यासाठी होता. सर्व चार चाकी गाडयाचे ब्रँड अँबेसिटर रोहित शेट्टीचा गोलमाल चार हा धमाल कॉमेडी सिनेमा ऐन दिवाळीत आपल्यासाठी ट्रीट होता. सहकुटुंब-सहपरिवार व आपल्या मित्र-मैत्रिणीसह निव्वळ विनोद व मनोरंजनासाठी सणातील महत्वाचा भाग होता. भली मोठी स्टार-कास्ट असलेल्या या सिनेमाने आपले मनोरंजन नक्की केले असेल. या शिवाय या दिवाळीत आणखी एका सिनेमाची विशेष चर्चा झाली तो म्हणजे आपल्या मराठमोळ्या रितेश देशमुखचा "फा फे " "फास्टर फेणे". तशी भागवतांचा हा फास्टर फेणे अवांतर वाचनाच्या पुस्तकातून आपल्या भेटीला पूर्वीच आला आहे. तो आता सिनेमाच्या रूपाने मोठ्या पडदयावर अवतरला. रहस्यपट असलेला हा सिनेमा अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयाने अधिक खुलून जातो. साधा सोपा रहस्य पट आपल्याला सहज आवडून जातो. दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने हि मनोरंजनाची मोठी भेट होती याचा आस्वाद आपण नक्कीच घेतला असणार.
या शिवाय क्रिकेटची मेजवानी सुरु आहेच कि, भारत-न्यूझीलंड एक दिवसीय मालिकेतील भारताच्या मालिका विजयानंतर T-२० ची मालिका रोमांचक स्थितीत आली आहे. सुट्टीत याचाही आनंद आपण घेतला असेल व घेत आहोत. या सर्व मनोरंजनाच्या व्यस्त कार्यक्रमानंतर आपल्या मूळ कामाकडे प्रत्येक जण वळलेला आहे. मनावरचा व डोक्यावरचा थोडासा थकवा या सणाच्या निमित्ताने झटकून प्रत्येक जण बॅक इन ऍक्शन आला आहे.
या वर्षीची दिवाळी लवकर आल्याने आपल्या परीक्षा झालेल्या नव्हत्या त्यामुळे सध्या ओढ फक्त परीक्षेचीच लागलेली आहे. काही जनाची तर अवस्था " दर्द दिलो के कम हो जाते अगर हमारे पेपर दिवाळी के आधीच हो जाते" पण सध्या कॉलेज कॅम्पस परीक्षेच्या वातावरणाने फुलले आहे. नोट्स, पुस्तके, झेरॉक्स शोधून शोधून रट्टा मारायचे एकमेव लक्ष सध्या कॉलेज यंगस्टर च्या समोर आहे. त्यामुळे सध्या 'एकच ध्यास खुळ्यागत अभ्यास ' हे एकमेव ब्रीद वाक्य घेऊन तरुणाई अभ्यासाच्या मागे लागली आहे. बच्चे कंपनीही शाळेतल्या वातावरणात रमू लागले आहेत.
या सर्वात एक गमतीदार अनुभव म्हणजे शुक्रवारी व्हाट्सअप चक्क तासभरासाठी बंद होते. अनेक जणांना काही तरी चुकल्यागत नक्कीच जाणवले असेल. पण असो त्या एका तासाने आपण सोशल मीडिया वर किती अवलंबून आहोत याची जाणीव करून दिली.
सो फ्रेंड्स परीक्षा असणार्यांसाठी बेस्ट लक आणि बाकीच्यांसाठी बॅक टू वर्क
-------------------------------------------------------------------
संदीप कोळी
दिवाळीची सुट्टी फुल्ल ऑन मस्ती
दिवाळी तोंडावर आली, आली म्हणता अगदी संपली सुद्धा.एवढा मोठा वर्षाचा सण म्हणजे तयारी हि जोराची आलीच कीं. अगदी सर्वाच्या आधी सुरुवात करून हि सणात सुद्धा आपली खरेदी सुरु होती अशीच बऱ्याच जणांची अवस्था होती. त्यामुळे अजूनही हे राहिले, ते विसरले म्हणून बाजारपेठांच्या वाऱ्या शेवटी पर्यंत सुरूच होत्या. यावर्षी पावसाने थोडा गोंधळ घातलेला होता पण त्यानेही माघार घेत आपल्या आनंदाला मोकळीक दिली. आजी, आई ने केलेल्या रुचकर आणि स्वादिष्ट फराळावर कित्तेक हात मारून झाले आहेत. ताईने हि त्या फराळात नकळत का होईना थोडाफार हातभार लावला होता. बाकी आकाशकंदील, लाईटची सजावट यात आपण आपले कौशल्य दाखवून बाबांना इंप्रेस केले आहे. एकंदर काय सर्वत्र दिवाळीचा फिव्हर आणि धमाल सर्वांनी अनुभवली आहे.
फटाके मुक्त दिवाळी मुळे कही ख़ुशी, कही गम चा मौहोल होता पण असो सणवार असले कि वातावरणात एकदम पॉझिटिव्ह वेव्हज असतात. शाळा, कॉलेज ना सुट्टी सुरु आहे. काही ऑफिसना सुट्टी आहे काहींनी सुट्टी वाढवून घेतली आहे. बच्चे कंपनी किल्ला व त्याची देखभाल करण्यात व्यस्त होती. तीही आता फ्री झाली आहेत.
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज सगळे दिवस अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरे केले दिवाळीत येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या सणाबरोबर महत्वाची असते ती "दिवाळीची सुट्टी". उन्हाळ्याच्या नंतर मध्यावर येणारी मोठी सुट्टी. त्यामुळे सणांबरोबर सुट्टीचेही नियोजन महत्त्वाचे असते. सुट्टी असल्यामुळे घरातले सगळे एकत्र येतात हि सर्वात आनंदाची गोष्ट असते. याबरोबर आपण मित्र, नातेवाईक यांच्याकडे जातो-येतो हि एक महत्वाची बाब असते. लहानांसारखे मामांच्या, मावशीच्या गावाला जाण्यात आजही तितकाच उत्साह असतो आणि तो या सुट्टीमुळे पूर्ण करता येतो. आपल्या जवळच्या माणसांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. याबरोबर फॅमिली व मित्र मंडळी याच्या बरोबर ट्रिप चे नियोजन सुरु असेल किंवा झालेही असेल. निसर्गसौदर्याने नटलेला कोकण, महाबळेश्वर,ताडोबा यासारखी ठिकाणेही फायनल झाली असतील. काही मित्रमंडळींच्या डोक्यात गोवा हि घोळत असेल. एस. टी च्या संपामुळे थोडा गोंधळ झाला होता पण तोही आता मिटला आहे.
याशिवाय सुट्टीत काही जणांचे काही हटके प्लॅनस् असतील आवडीची पुस्तके वाचणे, आईला मदत करणे, समाजकार्यात भाग घेणे, एखादा कौश्यल्याचा भाग पूर्ण करणे, काही छोटे क्लास करणे, काही महत्वाची राहिलेली कामे पूर्ण करणे याही गोष्टी काही जणांच्या सुट्टीचा भाग असतील.
प्रत्येकाला असणारी सुट्टी कमी जास्त असली तरी असेल त्या सुट्टीत काय करायचे या विचाराचे चक्र मात्र प्रत्येकाच्या डोक्यात सुरु असेल दीपावलीच्या या सुट्टीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपला शक्य तेवढा वेळ आपल्या माणसाच्या बरोबर व चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी नक्की धडपडतोय व आपण तो चांगल्या प्रकारे साजरा हि करूया.
------------------------------------------------------------------
संदीप कोळी
इट्स टाइम फॉर सेलेब्रशन
हाय फ्रेंड्स , सध्या एकदम मज्जा आहे आपली, भारतीय क्रिकेट टीम आणि पाऊस दोघेही दमदार परफॉर्मन्स देत आहेत. कॉलेज, लेक्चर, सबमिशन आणि कधी कधी अभ्यास याही गोष्टी घडत आहेतच.
पण या सगळ्या गडबडीत दिवाळी आठ दिवसावर आली भावांनो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना मारो गोली इटस टाईम फॉर सेलिब्रेशन. दीपावली म्हणजे सणांचा राजा. दिवाळीची चाहूल लागते ती बाजारपेठा फुलायला लागल्यावर. तसं बघितले तर हल्ली आपली खरेदी वर्षभर सुरूच असते. त्यासाठी कोणत्या सणांचे निमित्त लागत नाही. हे खरे असले तरी दिवाळीची खरेदी मात्र चुकत नाही हे निश्चित. वर्षभर कितीही शॉपिंग केले तरी दिवाळीच्या मौहोल मध्ये केलेल्या खरेदीची बातच न्यारी असते. हे आपण सर्वच मान्य करतो.
आपल्या सर्वांच्या कॉलेज कट्ट्यावर सध्या खरेदीच्या चर्चेचा जोर वाढतो आहे. ऑनलाइन शॉपिंगची संकल्पना आता आपल्याला नवीन राहिली नाही. आपल्या स्मार्ट फोन मुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, जबॉन्ग, मिन्त्रा सारखी ऑनलाइन दुकाने आपल्या खिशात आली आहेत. आमचा 'राहुल्या' आणि 'सच्या' दोघेही त्यावरच असतात. सतत नवीन ऑफर वर लक्ष ठेऊन असतात. लेटेस्ट फॅशन चे कपडे, बूट, मोबाईल , इलेक्ट्रॉनिक वस्तू, यावर आमच्या टीमचे विशेष लक्ष असते. ऑफर आली रे आली कि लगेच खरेदी आणि हो सध्या या सर्व ऑनलाइन शॉपिंग साईट वर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंट चालू आहे. याचा भरपूर फायदा आमच्या बरोबर तुम्हीही उठवला असेलच.
खरेदी म्हणजे मुलींसाठी एक स्वतंत्र सणच असतो. त्यामुळे या खरेदीत मुली मुलांच्यापेक्षा चार पावले पुढेच आहेत. ड्रेस, इलेक्ट्रॉनिक वस्तूबरोबरच दागिने व गिफ्ट यावर त्याचा भर दिसून येतो. यासाठी ऑनलाइन शॉपिंग करतातच पण त्याच बरोबर मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात जाऊन दरात कमी-जास्त करून खरेदी करण्यावरही मोठा भर आहे. प्रत्येक वस्तू बघून, पारखून, हाताळून घेण्याची संधी ऑनलाइन मध्ये मिळत नाही म्हणून प्रत्येक्ष मार्केटचा पर्याय निवडला जातो.
कपडे, बूट, मोबईल, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गिफ्ट आर्टिकलस या वस्तुंना या दिवसात प्रचंड मागणी असते. पण याबरोबर बाकीच्या किरकोळ खरेदीला दिवाळीत महत्व असते. पणत्या, रांगोळी, साबण, सुगंधी तेल, उटणे या हि वस्तूची गणना महत्वाच्या खरेदीमध्ये करावी लागते. आई किंवा ताई बरोबर जाऊन आपल्याला याही वस्तू खरेदी कराव्या लागतात. भारत-चीन ताणलेले संबंध आणि सोशल मीडिया यावरील विविध मेसेजमुळे अनेकांनी यावेळी चायना वस्तुंना जाणीवपूर्वक टाळून मातीच्या पणत्या व आपल्याकडे तयार केलेल्या वस्तू यांची खरेदी केली आहे.
प्रत्येक जण आपापल्या परीने व आपापल्या स्टाईल ने खरेदी केली आहे व करत आहे. ऑनलाइन शॉपिंगचा टक्का वाढला असला तरी रस्ते व मार्केटमधील दुकाने गर्दीने तुडुंब भरली आहेत. गर्दीच्या आधी खरेदी करूया म्हणत प्रत्येकाने आत्ताच गर्दी केलेली आहे.
दिवाळी हा सणच मोठा आहे. त्यामुळे या सणाचा आनंद प्रत्येकजण मोठाच घेतो. आपणही घेऊया आणि हि दिवाळी आनंददायी बनवूया.
-------------------------------------------------------------------
संदीप कोळी.
जागर स्त्री-शक्तीचा
📝 जागर स्त्री-शक्तीचा...
सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा.....
👆पण वरचे चित्र बघितल्यावर मात्र अस्वस्थ व्हायला होते. शुभेच्छा आणि वास्तव यामध्ये भावनिक हेळसांड होताना दिसते. समाजात वावरताना माणूस दोन स्वतंत्र चेहरे आणि विचार घेऊन बिनधास्त वावरत असतो आणि आपल्या दोन्ही भूमिका तो जगत असतो.
आपला देशात सणांचे महत्व खूप आहे आणि आपल्या प्रत्येक सण-समारंभात स्त्रियांचे महत्व आणि त्यांचा सहभाग जास्त असतो. आपली पुरुष प्रधान संस्कृती असूनही आपण स्त्रियांना देवीचा दर्जा दिलेला आहे. पण हे फक्त सण-समारंभासाठी इतर वेळी मात्र आपल्यातला राक्षस बाहेर येतो आणि या देवीला आपण कशाची किंमत देतो हे सर्वांना परिचित आहे. आणि हे का होते.... जी व्यक्ती आपल्या आईला सर्वोच्च स्थान दिते तिच व्यक्ती आपल्या पत्नीला मारहाण करताना अजिबात विचार करत नाही. जो भाऊ आपल्या बहिणीबाबत एकही वाईट शब्द ऐकून घेत नाही तो इतरांच्या बहिणीच्या बाबतीत कोणत्याही शब्दात वर्णन करतो. आपल्या मुलीवर जो वडील जीवापाड प्रेम करतो तोच तिच्या जन्माच्या वेळी मात्र तितका आनंदी नसतो. कामाच्या ठिकाणी स्त्री कर्मचाऱ्याला दिली जाणारी वागणूक आपल्याला विचार करायला लावते. याशिवाय समाजाचे स्त्री बद्दलचे मत गंभीर्याचा विषय आहे. खरे तर निसर्गातील सजीवाच्या निर्मितीत स्त्री-पुरुष ही सामान्य निर्मिती पण त्यांच्या रचनेत बरेच बदल आहेत.
स्त्री ही अजिंक्य, अभेद्य, कनवाळू, पालनहरी, विरता, साहस, सुंदरता, धैर्य, रौर्द्र या नऊ गुणांनी संपन्न असते. या नवरात्रीमध्ये स्त्रीच्या नऊ गुणांची पूजा आपण करतो. पण हे फक्त नऊ दिवसापुरते न राहता कायम राहायला पाहिजे.
स्त्री बाबतची आदराची भूमिका ही दाखवण्याची गोष्ट नसून ती आत्मसाद करण्याची गोष्ट आहे व हे ज्या वेळी शक्य होईल त्यादिवशी स्त्रीला खरा सन्मान मिळेल. त्यावेळी हा सन्मान नवरात्री किंवा काही दिवस दाखवण्यापूरता न राहता तो 365 दिवस राहिल.
स्त्री ही हक्क गाजवण्यासाठी नसून हक्काने सोबत घेऊन जाण्यासाठी असायला हवी.
पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
✒ संदीप....
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...