लक्ष्मणरेषा
रामायणात लक्ष्मणरेषा या शब्दाचा संदर्भ खूप चांगला आहे तो झाला धार्मिक संदर्भ पण पण आपल्या बाबतीत लक्ष्मणरेषा......
एक शर्यत असते.... शर्यतीला एक सुरुवात असते. त्याप्रमाणे आपणही सुरुवात करतो. शर्यत सुरु होते आणि आपण पूर्ण ताकतीने धावायला सुरुवातही करतो. पहिले काही अंतर आपण इतकं वेगानं व आक्रमकपणे पळतो कि पाहणाऱ्यांना व आपल्या बरोबरच्या स्पर्धकांना ही वाटतं कि तुम्हीचं जिंकणार ! पण जस-जशे अंतर वाढत जाते तस-तसे आपला ऊर भरून येतो. मग आपण आपल्या पाठीमागच्या व बरोबरच्या स्पर्धकांच्याकडे नजर फिरवल्यावर आपल्या लक्षात येते कि त्यांनी तर स्पर्धा कधीच सोडून दिली आहे ते तर आता प्रेक्षकांचा भाग झाले आहेत.
आपणही आता दमलेलो असतो पुढचा अंदाज घेतला तर अजूनही आपल्यापुढे बरेच जण धावत असतात. आपल्यालाही आता दम लागलेला असतो. आपण मग विसाव्याच्या नावाखाली थोडया वेळासाठी शर्यतीतून बाहेर जातो आणि नकळतपणे आपणही त्या प्रेक्षकांचा भाग बनून शर्यतच एन्जॉय करू लागतो. विसाव्याच्या नादात आपणही त्या प्रेक्षकांच्या गर्दीचा भाग कधी होऊन जातो ते आपल्या लक्षातही येत नाही.
नंतर विसाव्याची जाणीव संपल्यावर आपल्या लक्षात येते कि आपणही स्पर्धक आहोत. मग आपण स्पर्धेकडे पाहतो पण आता धावणारे बरेच लांब अंतर असतात. आणि मग आपल्याला नव्याने सुरुवात करणे अवघड वाटते. आपण थांबते ,थोडा वेळ विचार करतो आणि एक "लक्ष्मणरेषा" आपण आपल्या सभोवती ओढून घेतो. त्या रेषेचे संदर्भ आपणच द्यायला सुरु करतो. 'अरे माझी परिस्थिती नाही','अरे मला वेळच मिळत नाही', 'अरे घरची जबाबदारी आहे माझ्यावर', 'सगळ्या धावपळीत जमत नाही' अशी एक ना अनेक कारणे सांगून आपण अक्षरशः रडतो. आणि आपणच आपली समजूत काढतो आणि शर्यतीतून हळूच माघार घेतो.खरं बघायला गेले तर आपण हे सर्व ज्यांना सांगतो त्यांना त्यात फारसं घेणे नसते कारण ते प्रेक्षक असतात. जिंकणाऱ्याचा ते जयजयकार करणार असतात. हरणाऱ्याशी त्यांचा काही संबंध असत नाही.
मात्र त्या गर्दीत असे काही चेहरे असतात ते मात्र आपल्यासाठीच शर्यत बघत असतात आणि आपणच जिंकावे अशी अपेक्षा करत असतात. आपल्या अशा अचानक स्पर्धा सोडण्याने त्यांना खरा धक्का बसतो. आपण आपले सांत्वन करतो पण त्यांचे काय ?????
नंतर ज्यावेळी त्या शर्यतीचा निकाल लागतो व जिंकलेल्या स्पर्धकांची चर्चा सुरु होते त्यावेळी आपण आपली क्षमता, योग्यता सांगत बसतो आपण नव्हतो म्हणून ते जिंकले हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.
खरं तर आपल्याकडे क्षमता, योग्यता नसते असे नाही .आपणही जिंकलो असतो पहिला नाही पण नंबर तरी काढला असता पण आपण आपल्या क्षमता बंधिस्त करतो. आपण आपल्या भोवती मर्यादेचे एक कडे आखून घेतो आणि त्यातच स्वतःला सुरक्षित समजतो. ती "लक्ष्मणरेषा" आपण कधी पारच केली नाही म्हणून ती शर्यत आपण जिंकलीच नाही.....
"लेहंरो से डर कर नौका पार नही होती,
कोशीश कर ने वालो कीं हार नही होती।"
------------------------------------------------------------------
संदीप कोळी