Monday, 24 December 2018

होय मी स्पेशल आहे

I am Special....
          हो आपण स्पेशल आहोत. आपण म्हणजे "मी" आपल्या प्रत्येकातील "मी".
           आपण स्पेशल आहोत कारण पृथ्वीवरील लाखो सजीवांच्यामध्ये आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत. या पृथ्वीवरील प्रत्येकापेक्षा वेगळे आणि युनिक आहोत. आपण जगतोय आपल्या शैलीत, आपल्याकडे काही गुण आहेत आणि बरेच दोषही आहेत पण ते इतर कोणातही सापडणार नाहीत. इतरांच्याकडे काय आहे आणि काय नाही याची तुलना आपण करायची नाही. आणि त्यात आयुष्यातला  लाखमोलाचा वेळ वाया घालवायचा नाही. कारण आपले आयुष्य हा आपला प्रवास आहे, इतरांशी लावलेली शर्यत नाही.
           आपण प्रयत्न करणार आहोत. यशाबरोबर अपयशही बऱ्याच वेळा वाट्याला येईल. पण अनुभवाचा साठा नक्कीच वाढेल.  आलेल्या अपयशाने खचायचं नाही, स्वतःवर चिडायचं नाही, आणि आलाच राग स्वतःचा तर सांगायचं कायम स्वतःला मी स्पेशल आहे.
          दुसऱ्याच्या फुटपट्टीवर आपण स्वतःला मोजणार नाही. आंब्याची तुलना फणसाशी होऊ शकणार नाही. दोन्हीही फळ असली त्यांची आपापली वैशिष्ट्ये वेगळी आणि महत्त्वाची आहेत. तसे आपण ही आहोत आपल्यासाठी महत्त्वाचे.....
       दररोजचा दिवस आपला आहे. काहीतरी शिकवणारा, उगवणारा सूर्य आपल्यासाठी नवीन आशा घेऊन येणार आहे, तर मावळणारा सूर्य आपल्याला काहीतरी देऊन जाणारा. आपल्याला कोणाची सहानुभूती नको आहे. आपण बिचारे वगैरे तर अजिबात नाही. आपण जसे आहेत तसे आपल्याला स्वीकारले आहे आणि यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज असनार नाही.
           स्वामी विवेकानंद म्हणतात "आपण दररोज स्वतःशी बोलत नसाल तर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीशी भेटण्याची संधी गमवाल." त्याप्रमाणे आपण स्वतःशीच बोलायचं. मनाला योग्य वाटेल ते करायच. रस्ता जरी चुकला तरी पुन्हा वळणावर येऊन थांबून विचार करायचा. आनंदी राहण्याचा रास्त प्रयत्न करायचा. नवीन नवीन वाटा शोधायच्या. नवीन नाती जोडायची. स्वतःला स्वतःमध्येच गुंतवायला शिकायच. स्वतःचं कौतुक करायचं आणि वेळप्रसंगी स्वतःचा कानही ओढायचा. आरशासमोर उभे राहून सांगायचं स्वतःला होय मी आहे स्पेशल.....
        हे जमेल आपल्या प्रत्येकाला आणि जमणार आहे आपल्याला  कारण आपण स्पेशल आहोत. येणाऱ्या प्रत्येक क्षणात सांगा स्वतःला, आपल्यातील "मी" ला मी स्पेशल आहे. I am Special.....

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी
9730410154

Sandip.koli35@gmail.com



Wednesday, 19 September 2018

करके देखो - इको-फ्रेन्डली गणपती

कळायला लागल्या पासून दिवाळी नंतर चा सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'. तसही गणपती हे समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे आपल्या घरातील गणपती ही मोठा, आकर्षक व इतरांच्या पेक्षा उठून दिसावा ही सर्वप्रमाणे माझीही अपेक्षा. आमच्या घरीही गणपती व गणपती ची सजावट याकडे विशेष लक्ष दिले जायचे. घरात तशी परंपरा होती. हळू-हळू वय वाढेल तसे व विज्ञानाच्या प्रभावामुळे मोठ्या गणपतीचे आकर्षण कमी झाले व पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा अशी इच्छा वाढू लागली. पण त्यावेळी त्यासाठी काय करावे याचे पुरेसे ज्ञान उपलब्ध नसल्यामुळे जरवर्षी मागची प्रथा पुढे चालू या क्रमाने सुरु होते. असे सालाबादप्रमाणे जरवर्षी सुरु होते. पण मनातील इच्छा गप्प बसू देत नव्हती.काळाबरोबर विचार व निर्णयाचे स्वातंत्र व अधिकार स्वतःकडे आले व वाटू लागले की आपण हि गणपतीची मूर्ती घरीच करूया पण या वाटण्याला ' वाटाण्याच्या अक्षता लावून' वेळ नाही, कधी करायचे, कसे करायचे, होईल की नाही, घरातले विरोध करतील, लोक काय म्हणतील अशी अनेक कारणे जोडून तो विषय बस्त्यात गुंडाळत नेहमीचा रिवाज पार पडला जायचा. याला पर्याय म्हणून दोन वर्षी इको- फ्रेंडली गणेश मूर्ती आणून उत्सव साजरा करत होतो.
        शेवटी गेल्या 3 वर्षापासून हे वाटने प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले. पण माहिती अपुरी होती. शाळेतील मातीच्या वस्तू करायचा तोडका अनुभव व घराजवळ उपलब्ध माती यांच्या जोरावर प्रयत्न करून मूर्ती बनवली. साध्या रंगानी रंगवली. पहिल्याच प्रयत्नात इच्छेसारखी मूर्ती घडली होती. घरातल्या सर्वाना आवडली त्याच आनंदाने मूर्तीची प्रतिष्ठापणा करून घरीच विसर्जित केली होती.
       मागचा अनुभव व आनंद या दोन्ही भांडवलाच्या जोरावर या वर्षी ही मूर्ती आपणच बनवायची हे आता ठरलेच होते.पण या वर्षी सतत चा पाऊस या मुळे आसपास मिळणारी माती उपलब्ध होईना. मग नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला. शाडू माती विषयी चौकशी केली. पण पुरेशी माहिती मिळाली नाही. शेवटी शाडू मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्याला गाठले. माहिती मिळाली. माती मिळाली काम सुरु झाले. कोणताही साचा न वापरता हातानेच काम सुरु झाले. मूर्ती तयार झाली. 'चुकातून शिका'  या सूत्राने मागीलवर्षी राहिलेल्या गोष्टी या वर्षी आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण पणे आकर्षक नैसर्गिक रंगात रंगवून तयार झाली आहे.  मनाला भावेल अशी सुंदर मूर्ती तयार झाली.
         पण यासगळ्या प्रक्रियेमध्ये मिळणारा आनंद मोठा होता. आपल्याकडे आता इको-फ्रेंडली मूर्ती उपलब्ध होतात. गोष्ट पैशाची नसते वा असणार ही नाही. ही सर्व प्रक्रिया घडण्यापर्यंतची भावना व स्वनिर्मितीतून मिळणार आंनद हे शब्दात नाही मांडता येत. ते फक्त अनुभवता येते. म्हणून तुम्ही ही प्रयत्न करा.. 'करके देखो अच्छा लगता है....'
-----------------------------------------------------------

🖊संदीप.....

Sunday, 9 September 2018

पोरांची धावपळ तयारी गणपतीची

अरे वर्गणी गोळा झाली की नाही, त्या पलिकडच्या गल्लीतल्या काकांना या वर्षी तरी 101 रूपयाची पावती करा म्हणा. जर वर्षी 11 रूपयाची पावती करत्यात राव.आता तर पेट्रोल पण 100 च्या जवळ पोहचल म्हणाव. ते मंडपच्या कामात पोरांना यायला निरोप दया. ती ढोलची प्रैक्टिस पूर्ण झाली की नाही अजुन जोरात वाजला पाहिजे या वर्षी.... मूर्तीवाल्याकड़े जाऊन मूर्तिची सजावट पूर्ण झाली का ते बघून या रे..... त्या झांझ ग्रुप ला फ़ोन करून सुपारी फाइनल करा..... .
          ही आणि याच संदर्भातली चर्चा सध्या सर्व मंडळात, गल्लीत आणि कॉलेजमध्ये सुरू आहे आपल्याकडे दिवाळीनंतर  सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'. तसही आपल्याला मिरवायल मिळणारा एकमेव सण. त्यामुळे लहानांपासून-मोठ्यांपर्यंत, गरिबांपासून-श्रीमंतापर्यंत अशा प्रत्येकाला या सणाचे आकर्षण व उत्सुकता दोन्ही असते. आपल्या घरातला व मंडळातलाही गणपती इतराच्या पेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा यासाठी आपण प्रत्येकजण झटत असतो.
        गणपती उत्सव दोन दिवसावर आला आहे. आपल्या प्रत्येकाची तयारीची गड़बड़ सुरु असेल. बाजारपेठा गणपतीचीच्या स्वागतसाठी फुल्ल भरल्या आहेत.घरातली मूर्ती ठरवणे, सजावटीचे साहित्य आणणे. सजावट ची थीम यावर विचार सुरु असेल. यंदा थर्माकोल वर बंदी असल्यामुळे इतर पर्यायाचा विचार करावा लागत आहे. काही जणांचे इको- फ्रेंडली गणपतीसाठी हटके सजावटी चे नियोजन सुरु असेल त्यासाठी वेळ आणि साहित्य यांची जुळवाजुळव सुरु असेल. घरातला प्रत्येक जण लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे.
        पण आपल काम इथे थांबत नाही. आपण कार्यकर्त्यांच्या वर मंडळाची मोठी जबाबदारी असते.  मंडळाची मूर्ती ठरवणे, वर्गणी गोळा करणे, मंडळाचा परिसर स्वच्छ करणे, मंडप घालने, गणपती आणण्यासाठी ट्रॉली सजवणे. मंडळाच्या नावाचे टी शर्ट छापणे, नेत्याची स्पॉन्सरशिप मिळवणे, इतरांच्या मंडळापेक्षा वेगळा आणि भारी महाप्रसादाचे नियोजन करणे. त्यासाठी अन्नदाते यांची भेट घेणे. जोरात लायटिंग ची सजावट करणे. डॉल्बीला बंदी असल्यामुळे झांझ, लेझिम, ढोल, बैंजो यासारख्या पारंपरिक वाद्यांना ठरवण्यासाठीची धावपळ या गोष्टी आपले काम व कॉलेज सांभाळून प्राधान्यक्रमाने सुरु आहेत.
           एकूणच आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपल्या सर्वसह निसर्ग ही सज्ज झाला आहे. चला या वर्षी आपल्या बाप्पाचे स्वागत आनंदात, उत्साहात, शांतातेत, सर्वाच्या सहकार्यने व सुरक्षिततेने करूया.
गणपती बाप्पा मोरया....

-------------------------------------------------------------------
संदीप
sandip.koli35@gmail.com

Sunday, 26 August 2018

सोशल ट्रेन्डिंग

गेल्या रविवारची घटना, सुट्टीचा दिवस तसही सुट्टी असली काय नसली काय आम्ही निवांतच, तेवढ्यात 'राहुल्या' व 'सच्या' दोघे कोणाचीतरी फोर व्हीलर घेऊन दारात हॉर्न चा टाहो फोडत होते. बाहेर येऊन बघेपर्यंत त्यांनी मला गाडीत घेतलेही. कुठे चाललोय, कशाला चाललोय काही माहित नव्हते. गाडी बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीचा वेग कमी झाला. तसं पुढच्या सीट वर बसलेला 'राहुल्या' गाडीतून उतरून नाचायला लागला. 'सच्या' एका हाताने स्टेरिंग सांभाळत दुसऱ्या हाताने मोबाईल वर राहुल्याच्या डान्सचे शुटिंग करत होता. मला पहिल्यादा काही समजले नाही. नंतर लक्षात आले हे 'किकी चॅलेंज' आहे आणि कॉलेज मध्ये राहुल्याला कोणीतरी ते दिले आहे म्हणून हा अठ्ठाहास. मी एवढा विचार करे पर्यंत नाचणारा राहुल्या रस्त्यावरच्या खड्यात पडला. चॅलेंज गंडल, गाडी थांबली. आम्ही उतरलो राहुल्याचा गुडघा फुटला होता, कपाळावर टन्नु आणि कपड्यावर चिखलाची रांगोळी उठलेली होती. तशा अवस्थेत आम्ही त्याला घरी आणून धुतला. राहुल्याचा चेहरा उतरला होता त्यातच तोच म्हणाला "जोरात लागले रे, हे चैलेंज काही खरं नाही". आम्ही आमचे हसू लपवत त्याची समजूत काढली.
           सध्या फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सर्व सोशल साइट वर हे 'किकी चैलेंज' चे व्हिडिओ ट्रेंडिंग ला आहेत. पण या खुळया चैलेंज चा नाद अनेक जणांच्या जीवावर पण बेतत आहे. कॅनेडियन रॅप गायक ड्रेकच्या ‘इन माय फिलिंग्ज’ या व्हिडिओतील ‘किकी डु यू लव मी’ या गाण्याने तरुणाईला बेभान करून टाक ले असले तरी या  गाण्याच्या माध्यमातून समाजमाध्यमावर फिरणारे ‘किकी चॅलेंज’ मात्र दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. या चॅलेंजच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या स्टंटबाजीमुळे अनेक अपघात घडत आहेत. या चॅलेंजमध्ये चालत्या मोटारीतून बाहेर उडी मारून त्याच्या बाजूला उभे राहून इन माय फिलिंग या गाण्यावर नृत्य केले जाते. आपल्यातही अनेकांनी वेगवेगळ्या गाण्यावर असा डान्स करून व्हिडीओ शेअर केले आहेत.आपण फक्त त्याचा आनंद घेऊया ते प्रत्यक्ष करण्याच्या नादात न पडलेलेच बरे.
           हा राहुल्याचा प्रताप कॉलेज मध्ये लपवता लपवता नाकी नऊ आले होते. त्यातच 'परश्या' तोंड पाडून बसला होता. कोणालाच काही कारण माहीत नव्हतं मग शेवटी वडापाव ची पार्टी देऊन त्याला विचारलं तेव्हा म्हणाला "मी लहान असताना हिरोईन त्याच्यापेक्षा मोठ्या असणार्‍या व्यक्तीशी लग्न करायच्या आता मी मोठा झालोय तर हिरोईन त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्याशी लग्न करतायत." मग आमच्या लक्षात आलं साहेबांचा मूड  प्रियंका-निकच्या साखरपुड्यामुळे उडालेला आहे. खड्ड्यात जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केले.
       या सगळ्या दर्द भऱ्या किस्स्यात आपल्याला अभिमान वाटावी अशी गोष्ट म्हणजे आशियाई स्पर्धा. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात आपल्या पोरांनी मेडल्स मिळवली आहेत.सौरभ चौधरी ने तर वयाच्या 16 व्या वर्षीच भारताला गोल्ड आणून दिले. आम्ही या वयात घरच्यांना फक्त दुकानातून किराणा आणून देत होतो. गंमतीचा भाग सोडला तर आपले खेळाडू आपल्याला नक्कीच प्राऊड फील करत आहे.
      सो फ्रेंड्स आपण ही सोसलं तेवढाच सोशल मीडिया वापरूया आणि एन्जॉय करूया....

©संदीप
sandip.koli35@gmail.com

Sunday, 5 August 2018

दोस्त आपला विषय संपला

"शुक्रिया दोस्तो मेरी जिंदगी मे आने के लिए,
हर लम्हे को कितना खूबसूरत बनाने के लिए,
आप है तो हर खुशी पर मेरा नाम लिखा है,
शुक्रिया मुझे इतना खुशनसीब बनाने के लिये।"
          कस! काय? भावांनो आणि मैत्रिणींनो...... आज एकदम शायरीने सुरुवात केली आहे म्हणजे मौहोल तुमच्या लक्षात आलाच असेल..... यस 'फ्रेंडशिप डे' आपल्या हक्काचा दिवस दोस्ती के नाम. तसं बघायला गेलं तर ऑगस्ट महिना सुरू झाला की मैत्रीचे वारे अगदी वादळाच्या रूपात धडकू लागतं.  आपणही यात मागे नाही आणि असणार पण नाही कारण 'दोस्त आपला आपला विषय संपला'
          जन्माला आल्यापासून आपण अनेक नात्यांनी वेढलेले असतो. पण ही सर्व सर्व नाती आपल्याला जन्माबरोबर मिळालेली असतात. पण मैत्री हे असे एकच नातं कि जे निवडायचा अधिकार फक्त आणि फक्त आपला स्वतःचा असतो. जस्ट इमॅजिन मित्र किंवा दोस्ती असे शब्द जरी उच्चारले तरी मनाच्या सागरात आनंदाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. डोळ्यासमोर उभी राहतात शाळा कॉलेजमधले कट्टे, आपले खास अड्डे, सबमिशन साठी मारलेल्या नाइट्स, एक प्लेट मिसळ पाच जणांनी वरपल्याच्या खास आठवणी, कटींग चहा सोबत थापांचे उडवलेले पतंग, उडवलेल्या गाड्या, तुड़वलेले रस्ते, तासन-तास मारलेल्या गप्पा, उसनवारीवर घेतलेले पैसे, वडापावच्या पैजा, कॉलेज ला दांडी मारुन पाहिलेले सिनेमे, अंगलट आलेल्या कुरापती, घरी मारलेल्या थापा, रात्र-रात्र भर केलेला कल्ला, खुळचट गैरसमज, नकोसे अबोले, डोकं  भडकून केलेली भांडण,  मग लावलेला किलो-किलो मस्का, होलसेल मध्ये खाल्लेला भाव, मित्र-मैत्रिणीच्या नसत्या भानगडीत खुपसलेले नाक, ग्रुप मधल्या लैला-मजनूच्या प्रेमाची केलेली राखण, आपल्यामुळे झालेली ब्रेकअप्स आणि आपण मध्यस्थी करून केलेली पैचअपस्....
            मैत्रीच मोल कसं लावणार. यशाच्या पायऱ्या चढताना आणि अपयशाचे घाव सोसतानाही आपला मित्र-मैत्रीण सोबत आहे. जगाने पाठ फिरवली तरी आपले मित्र आपल्याबरोबर असतील. आपल्यावर विश्वास ठेवतील ही भावना मोठ-मोठ्या संकटातून सहज बाहेर नेते. आपला छोट्यातला छोटा आनंद मित्र मैत्रिणीबरोबर वाटला की तो कित्येक पटीने मोठा होतो. मैत्रीची सर जगातल्या कोणत्याही नात्याला येणार नाही. मैत्री हे नात्याचं नाव असलं तरी त्याच्या छटा प्रत्येकाबरोबर बदलत जातात त्यामुळे मैत्रीला नात्यात कधी बसवता येत नाही ती असते फक्त एक भावना.....
           लई पाश्चर हा शास्त्रज्ञ.... त्याच्या मित्राचा मृत्यू पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावण्यामुळे झाला. आपल्या मित्राच्या मृत्यूचे प्रचंड दुःख त्याला झाले. आपल्या मित्राच्या वाट्याला जो मृत्यू आला तो कोणाच्याही वाट्याला येऊ नये यासाठी त्यांने काम सुरू केले. आसपासच्या कुत्र्यांना पकडून त्यांचा अभ्यासास सुरुवात केली. कुत्रे  पकडून त्याच्या रेबीज पसरवणाऱ्या अवयवांच्या अभ्यासाचे काम सुरू केले. अशा वागण्यामुळे परिसरातील लोकांनी त्याची गणना वेडयात करायला सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात त्याच्या प्रियसीच्या वडिलांनी अशा वेड्या माणसाशी लग्न लावून देण्यास ठाम नकार दिला होता. भागात कुत्रे पिसाळले की लोक त्याच्याकडे आणून सोडत. लुई मात्र काम आनंदाने करत होता. ३ वर्षे सतत काम केल्यानंतर त्याच्या असे लक्षात आलं की कुत्र्याच्या लाळेतील घटकांमुळे  रेबीज नावाचा रोग होऊन मृत्यू ओढवतो. संशोधन सुरू झाले लाळेमधील विषाणू शोधून त्याने रेबीज वर लस  शोधली. आपली मैत्री सिद्ध केली. आपल्या मैत्रीखातर त्याने जगाच्या कल्याणाचा एक महान शोध लावला. अशी असते मैत्री अशक्य ते शक्य करायला लावणारी.
             मैत्रीला ना नात्याची मर्यादा बांधते, ना वयाचे बंधन, मैत्री कोणाची, कोणाशी, कधी व्हावी याचे काही नियम नाहीत. मैत्रीत ना कसल्या अटी असतात, ना कसल्या शर्ती, ना कसली अपेक्षा. ना कसले हट्ट. अटींचा हात धरून अपेक्षांच्या  पायऱ्या चढते ती मैत्री असू शकत नाही. तो व्यवहार असतो. मैत्री असते नितळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी, स्वच्छंद बागडणाऱ्या फुलपाखरासारखी. मोठा मित्र परिवार त्यांची सतत साथ, पाठिंबा आणि त्यांच असणे ही आपल्या आयुष्याची खरी पुंजी असते. 'Great Friendship is not when the perfect people come together. It is when two imperfect people learn to enjoy each other's differences'
         एकीकडे  माणसाच्या नात्यावर अविश्वासाच्या सावल्या गडद होत असताना, नाती तुटत असताना मैत्रीच्या नात्याने मात्र माणसाचा नवीन परिवार तयार केला आहे. साऱ्या भेदाच्या पलीकडे जाऊन मैत्री माणसातला स्नेह व्यापून उरते. आजच्या 'फ्रेंडशिप डे 'च्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने हे नाते जगूया.
Happy Friendships Day

-----------------------------------------------------------
#संदीप
sandip.koli35@gmail.com

Sunday, 22 July 2018

बोलावा विठ्ठल

सदा आनंदी ठेव सर्वाना💐
हिच प्रार्थना पांडुरंगाला॥💐
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!💐
calligraphy
sketch
संदीप...

Monday, 9 July 2018

माझा रेल्वेतील मित्र

२००६ ची घटना. मी १२ वी होऊन घरच्यांच्या सुरक्षित वातावरणातून पहिल्यांदाच जगाच्या मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज झालो होतो. कोल्हापूरला ऍडमिशन घेतल्यापासून नवीन शहर, नवीन वातावरण आणि दररोजचा नवीन प्रवास.
         हातकणंगले पासून कोल्हापूरला जाण्याचा सर्वात लोकप्रिय व खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास. त्यामुळे हातकणंगले- कोल्हापूर व पुन्हा कोल्हापूर- हातकणंगले असा दिनक्रम बनला होता. दररोज ९.१५ च्या पॅसेंजर ने जाणे व सायंकाळी ५ किंवा ६.३० च्या पॅसेंजर ने घरी परतत असे. कधी कॉलेज लवकर सुटले तर लवकर घरी येत असे.
         कॉलेज सुरु होऊन दोन महिने होऊन गेले होते. त्या दिवशी कॉलेज मधून दुपारी सुट्टी मिळाली. धावत-पळत स्टेशन गाठले. दुपारचे ३ वाजले असतील. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्र एक्सप्रेस २ नंबरच्या प्लँटफॉर्म उभी असते म्हणून मी हि रेल्वेचे नाव न पाहता बसलो. रेल्वेच्या डब्यात नेहमी पेक्षा गर्दी कमी होती पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. बसल्यावर पाच एक मिनिटात रेल्वे धावू लागली. ३.३० ची रेल्वे इतक्या लवकर कशी जाईल. पुन्हा वाटले कदाचित प्लॅटफॉर्म बदलून लावत असतील. रेल्वेने स्टेशन सोडले व गती वाढली. मग मात्र माझी शंका भीती मध्ये बदलली. मी चुकीच्या रेल्वेत बसलो होतो. ती राणी चन्नम्मा एक्सप्रेस होती जी तिच्या वेळेपेक्षा एक तास उशिरा धावत होती. पण याही पेक्षा माझी मोठी अडचण होती ती म्हणजे हातकणंगले रेल्वे स्टेशन वर ती थांबत नव्हती. शिवाय माझ्याकडे रेल्वेचा कोल्हापूर-हातकणंगले  पास होता. खिशात मोजकेच पैसे. समजा टी. सी ने पकडले व दंड केला तर काय करायचे? हि रेल्वे थांबणार कुठे? असे अनेक प्रश्नांनी मनात भीती निर्माण केली होती. मी न बघता रेल्वेत बसलो या माझ्या मूर्खपणाचा रागही येत होता. इतक्यात हनुमानाची वेशभूषा केलेला ११-१२ वर्षाचा मुलगा आला. तो रेल्वेत आपली कला दाखवून पैसे जमा करत असे. मी त्याला नेहमी बघायचो. ओळख नव्हती. पण नेहमी पाहण्यात होता म्हणून तो जवळ आल्यावर मी त्याला माझी अडचण सांगितली. तो दुनियादारी शिकलेला होता दररोज अशा प्रसंगांना तोंड देणारा होता. मला म्हणाला, "काळजी करू नको, दुसऱ्या रेल्वेचे क्रॉसिंग असेल तर ही रेल्वे  हातकणंगलेत थांबते आणि नाही थांबली तरी ही रेल्वे मिरज मध्ये गेली की कोल्हापूर ला येण्यासाठी मिरज मधून दुसरी रेल्वे आहे. त्यातून यायचे. मी त्यानेच परत येणार आहे. सोपं आहे." त्यांच्या या शब्दांनी मला थोडं हायसे वाटले. पण टी. सी आला तर? या माझ्या दुसऱ्या शंकेचे त्याने उत्तर दिले कि," या रेल्वेत मिरज पर्यंत चेकिंग होत नाही आणि झालेच तर आपण खरं कारण सांगू तुझ्याकडे पास आहेच की."
मग मात्र माझी हुरहूर कमी झाली. रेल्वे गतीने पुढे धावत होतो १५ मिनीटातच रेल्वे हातकणंगले रेल्वे स्टेशन जवळ आली पण पहिला पर्याय मागे पडला कारण रेल्वे तशीच वेगाने स्टेशन सोडून पुढे गेली. मी थोडा निराश झालो होतो. त्याने दुसऱ्या पर्यायाची पुन्हा आठवण करून दिली. तो हि मिरज रेल्वे जंक्शन येईपर्यंत माझ्याजवळ बसला होता. मिरज आले. मला म्हणाला, "लगेच उतरून माझ्या मागून पळत यायचे." मी मान डोलावून त्याच्या मागून पळत कोल्हापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेत बसलो.
        मी निवांत झालो असलो तरी माझ्याकडे अजूनही प्रवासाचे तिकीट नव्हते. तो हनुमान माझ्याजवळच उभा होता. त्याच्या असण्याने मला आधार वाटत होता. रेल्वे धावू लागली. जयसिंगपूर स्टेशन गेले व हातकणंगले स्टेशन आले. या प्रवासात माझा झालेला नव्या मित्रचा निरोप घेऊन मी उतरलो.
         त्यानंतर रेल्वेच्या प्रवासात तो मला दररोज दिसायचा, भेटायचा. आम्ही त्याला हनुमान म्हणूनच बोलवायचो. भेटल्यानंतर बोलायचो. ३-४ महिन्यांन्यानंतर तो रेल्वेत दिसायचाही बंद झाला. कोठे गेला माहिती नाही. त्यानंतर परत तो कधी दिसलाच नाही. त्या तासाभराच्या प्रवासाने मला तो बहुरूपी मित्र भेटला होता पण नंतर तो जगण्याच्या प्रवासात हरवला. साध्य तो फक्त आठवण म्हणून आठवणीत कायम आहे.

-----------------------------------------------------------
संदीप कोळी
हातकणंगले.

Sunday, 24 June 2018

प्लास्टिक बंदी

च्यामारी अलीकडं आनं पलीकडं बी बंदी म्हणलं की अंगावर सारकण काटाच येतुया. त्यात भर म्हनून आता ही पॅस्टिक बंदी. तसं पॅस्टिक बंदीला आपला इरोध नाय हाय पण पॅस्टिक बंद झाल्यामुळं लय गोची हुतीय बगा. गेल्याचं आठवड्यात आमचं बंड्या दुकानात जाऊन लाज काडून आलंय. गोडं तेल आणायला हात हालवत मोकळच गेलंय. १५ मिंट झालं तरी दुकानदार ध्यानं दिना म्हणून तेला कावालत. दुकानदार शांत पण म्हणलं पॅस्टिक पिशवी बंद हाय वंजळीत भरून नेतूस. तोंडात मारल्यावाणी पोरगं परतं. तवा पसन नाराज हाय. बंड्या म्हणतंय पॅस्टिक बंद हुतयच कसं. कारण तेनं कवाच घरातन पिशवी नेली नाय आनं अचानक असं म्हणजी? तेचं बी खरं हाय म्हणा पॅस्टिक म्हंजी घरातल्याचं माणसासारखा हाय. कुठ्ल्याबी कामात गरज पडतीयाच की. आमच्या आय नं तर घरात चांगल्या चांगल्या पिशव्या घडी घालून ठेवल्या हुत्या आमी मागितलं तरी बी चांगली पिशवी कवा देत नाय. येवढा जीव हुता तिचा पॅस्टिक पिशवीवर.
        काल लईच वाईट वेळ आली आमच्यावर, ते खालच्या गल्लीच 'विक्या', तेचा हॅप्पी बडडे हुता. मग काय पार्टी, आमी बी फुकटच जेवायला भाया माग सारून हजर. जेवायला बसल्यावर पंचायत झाली राव पॅस्टिक बंदीमूळ पॅस्टिकच्या ताट, वाट्या, गलास बंद त्यामुळं पत्रावळीवर वाढलं. रस्सा भातात वतला की दुसऱ्या बाजूनं डायरेकट्ट मातीत. तवा आता कुणाच्यात जेवायला आपली ताट-वाटी घिऊन जावा नाहीतर उपाशीच बसायला लागलं. 'परशा' न तर पॅस्टिक बंदीची हापकीच खाल्लीय. ते हाय ढापन तेचा चस्मा हाय पॅस्टिकचा. बंदीमुळं ते चस्मा बी घालनां तेला वाटतंय सापडलं तर दंड व्हायचा.
पॅस्टिक बंदीच्या नादात 'पम्या' न घरात मार खाल्ला. तोंडात कायम चघळायची पुडी खिशात राहिली आनं पॅस्टिकची पिशवी नसल्यानं खिशावर डाग. मग काय काकून धू-धू धुतला बिचाऱ्याला.गल्लीतली पोरं म्हजी दुसरी SBI. पॅस्टिकच्या पिशवीच्या रंगावरण कुणाच्या घरात काय आणलं ते वळकत्यात पण आता ते बी कळना कारण सगळ्याला एकच पिशवी वापरत्यात आता. तरी बरं दुधाची पिशवी चालत्या म्हणून नायतर पावसाळ्यात मोबाईल ठेवायचा कुठं ही पंचायत झाली असती. सगळा पावसाळा कुंबडी सारखा घरातच गेला असता. आमची तेवढी तरी सोय बघितल्याबद्दल मंडळातर्फे जाहीर आभार.
          या बंदीचा फायदा घेत कोपऱ्यावरच्या दुकानदारानं कापडाच्या पिशव्या २० रु ला एक देतंय. आता २० रु ची पिशवी घ्यायला आमी काय खुळ हाय व्हय. तेच्या पेक्षा आमच्या जुन्या बनियान, शर्टाची पिशवी शिवल आय आमची.
       मराठी शाळ पुढंन येताना ऐकलं, गुरुजी  पॅस्टिक बंदी का महत्वाची हाय ते सांगत हुतं. पर्यावरणाची कि काय ती हानी हुतीय म्हणं. अपल्यासनी तरास हुतुय म्हणं या पॅस्टिकनं. आम्हास्नी कवा कळलं नाय. पण गुरुजी सांगत्यात म्हंजी १०० आण खरं. हे सगळं खरं असलं तरी २ प्रश्न हायती पॅस्टिक बंदीमुळं मटण, चिकण आणायला डबा चाललं पण मासे आणायला केवढा डबा न्यायचा हे कळतंच नाय.आनि गावाला जाताना वल्ली कापडं कशातन न्यायची. बघा तुमाला उत्तर सापडलं तर सांगा आमास्नी बी.
    बाकी पॅस्टिक बंदी झालीच पाहिजे. तुमी बी पॅस्टिक वापरत नाय ना, वापरायलाच नाय पाहिजे. तवा आता बाहेर जाताना आपली कापडाची पिशवी न्या. "पॅस्टिकच्या धोका, अणुयुद्धापरास मोठा."
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

Sunday, 3 June 2018

भारतात 5G येणार

हाय फ्रेंड्स..बघता बघता उन्हाळा संपत आला. परीक्षा, आयपीएल चा सिझन संपलासुद्धा आणि आंब्याचा सिझन जवळपास संपत आला. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे वातावरणात ऋतू बदलाचे वारे वाहू लागले आहे.
         वातावरणातील सौम्यतेमुळे गप्पाचे अड्डे पुन्हा रंगू लागले आहेत. सगळेच फ्री असल्यामुळे वेळेची कमतरता जाणवतच नाही. गप्पा रंगल्या कि कधी-कधी त्याचा पतंगच होतो. अशाच गप्पा रंगल्या होत्या. 'सच्या' एक वायर घेऊन आला " भावांनो भारतात 5G येणार". गप्पांचा विषयच पालटला. मोबाईल आणि इंटरनेट हे तर 'जवा दिलो की धडकन' म्हणजे अगदी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाबरोबर मोबाईल आणि इंटरनेट हि लागतेच इतका जिव्हाळ्याचा विषय. जीवनातील आवश्यक गोष्टीतील  Compulsory वस्तू म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट शिवाय मोबाईल 'किस काम का'. 'सच्या' ने छेडलेल्या विषयात 'परश्या' उतरला, "होय रे मी पण ऐकलंय".  तेवढ्यात अभ्यासातला किडा 'राहुल्या' नेहमीच्या नारीजीच्या स्वरात म्हणाला " मग त्यानं काय फरक पडणार आहे. आताही इंटरनेट आहेच की, 4G मुळे स्पीड पण आहे". यावर मात्र आमचा इंटरनेट तज्ञ 'विक्या' चिडला, "तुला काय कळतंय त्यातलं, 5G आलंच पाहिजे. इंटरनेट चे स्पीड भयानक वाढेल. आता आपल्याला 3 तासाचा पिक्चर डाउनलोड करायला अर्धा-एक तास लागतो पण 5G आल्यावर तो 3 तसाचा HD पिक्चर 1 सेकंदात डाउनलोड होईल. जग आणखी जवळ येईल कळलं का? म्हणे काय फायदा?" 'विक्या' आवेशात 5G ची वकिली करत होता जस काय टेलिकॉम कंपन्या 5G चा ब्रँड एम्बेसडर करणार आहेत. फायद्या-तोट्याच्या जुगलबंदीत 5G ची चर्चा रंगतदार झाली.
           भारतात 2019 पर्यंत 5G येण्याची शक्यता आहे. पण याची सुरुवात 1G पासून झाली होती हे आपल्याला माहीतच नाही. त्याचा वापर फक्त कॉलिंग साठी होत होता. त्यानंतर 2G आले त्यात sms व इतर सुविधा आल्या. 3G आले व इंटरनेट युगात क्रांती झाली. ब्राउजिंग, ईमेल, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअरिंग आले. माणसाबरोबर फोनही स्मार्ट झाला. त्यानंतर 4G आले व स्मार्ट फोन चा वापर आणखी स्मार्ट झाला. स्पीड वाढले दररोजच्या 1 ते 1.5 gb डाटाने आपल्याला खिळवून ठेवले. 4G चा सरासरी वेग 12mbps इतका आहे. आता मात्र या सर्वांच्या पुढची जनरेशन म्हणजे 5G येत आहे. याचे स्पीड साधारण 20gbps इतके भयानक असणार आहे. 2019 च्या शेवटीपर्यंत 5G भारतात येईल. याचा अर्थ असा की 4G सर्वत्र पोहचयच्या आधी 5G भारतात येईल. 4G पेक्षा 20 पट वेग वाढल्यामुळे कोणतीही माहिती पाठवण्यासाठी 1 मिलीसेकंदापेक्षा कमी वेळ लागेल. 5G मुळे देशातील बहुतेक सुविधा इंटरनेट च्या माध्यमातून पुरवल्या जातील. सेल्फ ड्राइविंग कार, रिमोट कंट्रोल सर्जरी, आर्थिक व्यवहार जास्त सोपे होतील.
      5G च्या बातमीमुळे पोरं मात्र जाम खुश आहेत. येणाऱ्या स्पीड ची कल्पना करून 5G ची आतुरतेने वाट बघत आहेत कारण आपल्याला 'थोडा और' पाहिजच असते. आत्ताच कामाच्या व्यापात पोरांना 1.5Gb डाटा पुरत नाही. बघू 5G आल्यावर काय होते ते पण या 3G, 4G,5G च्या नादात जीवनातील 'जी' मात्र हरवता काम नये.
-----------------------------------------------------------
संदीप.....
sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...