Sunday, 30 July 2017

हेल्मेट चा विषय कट्

ते नव्हं ते हॅम्लेट सक्तीचं काय अनं नवीन झोमंट. ते खालच्या गल्लीचं 'गोट्या' चार दिस झालं रोज हॅम्लेट बगाला कोलापूरला जातंय अनं पसंत पडत नाय म्हणून परत येतंय.
      पण भावा या हॅम्लेट सक्तीला आपला अनं आपल्या मंडळाचा जाहीर इरोध हाय. मी म्हणतो गाडी कुणाची...आमची!, पेट्रोल कुणाचं...आमचं!, डोस्क कुणाचं... आमचं!,  जीव कुणाचा...आमचा! मग आमच्या जीवाची दुसऱ्यासनी कशाला पाहिजे काळजी. आमचं आम्ही बघू कि. जवा पासणं कळायला लागलं तवापासणं गाडी हाय आमच्या हातात अजून एकदा बी खिरकी उठली नाय गाडीला अनं अंगाला बी. आमचं वाईट व्हावं हये इरोधकास्नी वाटतंय पण आई अंबाबाईचा आशीर्वाद अनं राजांचा वरदहस्त हाय तव्हर आमची गाडी अशीच भुंगाट जाणार. बरं ते हॅम्लेट डोसक्यात अडकवल्यावर मावा कुटन थुकायचा अनं गॉगल कसा घालायचा हे हार्ड प्रश्न हायती. या हॅम्लेट च्या नादात  'पप्या' परवा गडबडीत हॅम्लेट मधेच पिचकारी मारलं. या परसंगला कोण जबाबदार.
            आम्ही घरातन बाहेर पडल्यापासनं चौकात येईपर्यंत पाच-पन्नास कार्यकर्त्यासनी हात करायला लागतुय. त्या हॅम्लेटातन कळतंय होय कोण हाय ते. त्यात ह्या बारीला सरपंच निवड डायरेकट् निवडायचा हाय.अशानं कार्यकर्त नाराज हुत्याल.
        अनं आमच्या आबांनी सांगितलंय डोसक्यावर कुणाला बी बसू द्यायचं नाय त्यामुळे हॅम्लेट चा विशय कट्. तस बी या निर्णयान मंडळाची पोर खुश नाहीत त्यामुळं अध्यक्ष म्हणून आमचा बी विरोधच.
         अनं ते सेप्टी घाला चुलखंडात आम्ही आमच्या घरच्याचं कवा ऐकलं नाय अन हे ऐकायला मोकळं हाय व्हय!

दंगल क्रिकेट अन कबड्डीची

"त्या आल्या, त्या खेळल्या, आणि त्यांनी जिकले" ज्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो आणि क्रिकेटर म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत अशा देशात महिला क्रिकेट बरीच वर्षे उपेक्षित राहिले हे मान्यच करावे लागेल. मिथाली राजच्या महिला ब्रिगेडने महिला वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये धडक मारली आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मधल्या पराभवामुळे दुखावलेला भारतीय फॅन "म्हारी छोरियाँ छोरो से कम हे के" म्हणत महिला क्रिकेटकडे वळाले.
              पोरींनी पण करून दाखवले. सुरुवातीच्या सामन्यापासूनच भारतीय टीमने 'दबंग'  कामगिरी करत वर्ल्डकप च्या फायनलमध्ये जागा मिळवली. आणि तमाम भारतीयांसाठी पुन्हा एकदा वर्ल्डकपची आशा दाखवली. पण पहाटे एखादे सुंदर स्वप्न पडावे आणि अचानक झोपमोड व्हावी असे काहीसे झाले. फायनल चा घास आपल्या तोंडातून हिरावून नेला आणि आपण फायनल गमावली. आपण फायनल हरलो असलो तरी महिला टीमच्या हिमतीला आणि मेहनतीला दिल से दाद दयायला पाहिजे. शेवटी क्रिकेट हा पण खेळच आहे. हार-जीत तो चलती रहेगी. पण कधी नव्हे ते भारतात महिला क्रिकेट सामने आठवणीने आणि आवर्जुन बघितले गेले. त्याच्यासाठीही प्रार्थना केल्या गेल्या शुभेच्छा दिल्या गेल्या आणि पुरुष संघ सोडून पहिल्याच वेळेला महिला क्रिकेटरची नावे लोकांना माहित झाली. या 11 रणरागिणींणी महिला क्रिकेट ला सिरिअसली घ्यायला आपल्याला भाग पाडले. या टीमने मॅच गवा दी हो पर दिलो को जीता है।
            क्रिकेट नंतर सबकी धडकन, आमचा अभिमान, आमचा प्राण, मातीतला खेळ म्हणजे कबड्डी आणि फक्त कबड्डी. 28 तारखेला प्रो-कबड्डीच्या या महायुद्धाला शानदार सुरुवात झाली आहे.138 सामन्याच्या या पाचव्या पर्वाच्या प्रो-कबड्डी मध्ये 12 संघ भिडणार आहेत. प्रत्येक संघाचे 15 सामने होतील आणि एकमेकांशी 3 वेळा भिडतील. या प्रो-कबड्डी मध्ये आपले हॉट-फेव्हरेट संघ असणार ते म्हणजे आपल्या अनुपकुमार ची 'यू-मुम्बा" आणि दीपक हुड्डाची "पुणेरी पलटण". यू-मुम्बा या आधी एक वेळा विजेती व दोन वेळा फायनल खेळली आहे त्यामुळे त्यांचा दबदबा आहे. पण पुणेरी पलटण ला हलक्यात घेऊन चालणार नाही त्यांनी ही गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आपला आणि आपल्या ग्रुपचा फुल्लसपोर्ट दोन्ही टीमसाठी असणार आहे. शिवाय आपल्या सांगलीचे हिरो शत्रूच्या पकडीवर मात देणारा चतुर 'नितीन मदने', हरणाची चाल आणि वाघाची दहाड असणारा 'काशिलिंग आडके' आणि सचिन शिंगाडे यांच्याही खेळावर लक्ष असणार आहे. काहीही झाले तरी प्रो-कबड्डी यंदा आपलेच राज्य असणार आहे.
            या तडक्याबरोबर या आठवड्यात बॉलिवूड चा किंग खान शाहरुख आणि आपल्या अनुष्का वहिनी यांचा "जब हॅरी मेट सेजल" हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा 4 तारखेला येतोय. त्याचे मिनी टिझर, मग ट्रेलर, गाणी यामुळे सध्या चर्चेत आहेच. यातील गाणी ही तोंडात रुळली आहेत. शिवाय शाहरुखचा सिनेमा म्हंटल्यावर चर्चा हि असणारच. इम्तियाज अलीच्या या आधीच्या 'जब वुई मेट', 'कॉकटेल', 'रॉकस्टार' यासारख्या सिनेमाला सर्वांनी पसंती दिली आहे. 'रब ने बना दी जोडी' आणि 'जब तक है जान' यानंतर अनुष्का-शाहरुख जोडी पुन्हा काय जलवा दाखवते ते आपण बघूया या शुक्रवारी.

बोलबाला टेनिस, क्रिकेट अन कबड्डीचा

गेल्या रविवारी दुपारपर्यंत "फेडरर संपला रे, त्याचा जमाना कधीच गेला रे" म्हणणारे 'विक्या' आणि 'परशा' रविवारी रात्री फेडरर जिंकल्यावर शुभेच्छा देण्यात सर्वात पुढे होते. कारण पण तसे खासच होते ना, तमाम टेनिस चाहत्याचा फेव्हरेट खेळाडू, ग्रास कोर्ट चा अनभिषिक्त सम्राट " रॉजर फेडरर" चा विक्रमी आठवा विम्बल्डन विजय. विम्बल्डन म्हणजे टेनिस विश्वाचा वर्ल्ड कप. हि स्पर्धा खेळणे आणि विम्बल्डन चा कप जिंकणे हे जगातल्या प्रत्येक टेनिस खेळाडूचे स्वप्न असते. अशाच स्वप्नासह स्विझरलँड चा एक खेळाडू टेनिस मध्ये आला.16 वर्षांपूर्वी त्याने त्या वेळच्या महान टेनिसपटू 'पीट सॅम्प्रसला ' पराभूत करून सर्वाना धक्का दिला व त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही व जागतिक टेनिस ला एक सुपरस्टार खेळाडू मिळाला तो म्हणजे "रॉजर फेडरर". गेल्या वर्षीच्या पराभवानंतर फेडरर ने आपला खेळ थांबवला. विश्रांती घेतली. सराव केला. खेळाची तंत्र नव्याने पक्की केली. आपले लाडके विम्बल्डन जेतेपद पटकवण्यासाठी फेडररने फ्रेंच ओपन मधूनही माघार घेतली आणि "सब्र का फल मिठा होता है।" या प्रमाणे हे गोड फळ त्याला विम्बल्डनच्या जेतेपदाच्या मुकुटासह रविवारी मिळाले. आपल्या करियर मधील सर्वोत्तम खेळ करत विम्बल्डन जिंकण्याचा   आठवा प्रताप करताना त्याने सर्वाना मागे सोडले आहे. यापूर्वी 2003, 04, 05, 06, 07, 09, 12 आणि या वर्षी अशा तब्बल आठ वेळा फेडररने विम्बल्डनचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवत विम्बल्डन चा बादशहा म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. या विजयाबरोबर आपली कारकीर्दीतले 29 ग्रँडस्लॅम जिंकले आहे. वयाच्या 35 व्या वर्षी असा उत्कृष्ट खेळ करून यश मिळवल्याबद्दल फेडरर भाऊंना 21 तोफांची सलामी.
             या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवागार निसर्ग नटला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
              असेच आनंदाचे वातावरण असण्याचे आणखी एक कारण म्हणजे "प्रो-कबड्डी लीग". महाराष्ट्राचा लोकप्रिय असणारा अस्सल मातीशी जोडणारा खेळ म्हणजे कबड्डी आणि प्रो-कबड्डी मुळे या आपल्या  खेळाला सुगीचे दिवस आले आहेत. अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या प्रो-कबड्डी चा यंदा पाचवा सिझन आहे. येत्या 28 जुलै पासून या पाचव्या पर्वाची धमाकेदार सुरुवात होत आहे. IPL च्या धर्तीवर फ्रेन्चयझी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या खेळात देशातील खेळाडूसह आंतराष्ट्रीय खेळाडूही सहभागी होत आहे. या लीगमुळे आपल्या गावामधील खेळाडूंनाही सोन्याचे भाव आले आहेत. या लीगमध्ये आपल्या सांगलीच्या खेळाडूचे योगदान ही मोलाचे आहे. यंदा 12 संघ आपसात भिडणार आहेत. 12 आठवडे हि जम्बो स्पर्धा चालणार आहे. आपल्यासाठी हि ट्रीट आहे.
              या खेळाच्या मोसमात कॉलेज  जीवनावर आधारित एक मराठी सिनेमा "बस स्टॉप " शुक्रवारी आला आहे. नावावरून वाटत नसला तरी पूर्ण पणे कॉलेज जीवनावर आधारित असणाऱ्या या सिनेमात भली मोठी मराठीतली स्टारकास्ट आहे. कॉलेज च्या फुल्ल धमाल मस्तीवर आधारित एंटरटेनमेंट सिनेमा.
         शेवटी जाता जाता, हेल्मेट घेतले ना, घेतले नसले तर घ्यायला लागतंय!.

Tuesday, 18 July 2017

माही, हेल्मेट आणि स्पायडी

गेल्या आठवड्यातील प्रसंग, गेल्या शुक्रवारी 'राहुल्या' चा सकाळी साडेसात च्या सुमारास फोन आला "संध्याकाळी बर्थडे पार्टी आहे. दुसरे काही नियोजन करू नको." फोन झाला. मी डोक्याला ताण दिला पण कोणाचा बर्थडे आहे हे लक्षात येईना. मग आपला "भरोसे का साथी" फेसबुक बघितले पण तिथेही कोणत्या जवळच्या मित्राचा बर्थडे दिसेना. मग दुसरा ऑप्शन म्हणून व्हाट्सअँप बघितले. त्यानंतर एकंदर प्रकार लक्षात आला. 7 जुलै म्हणजे "द महेंद्रसिंग धोनी" चा वाढदिवस. फॅन साठी "द माही डे". मग काय संध्याकाळी 'धोनी भाऊ ' च्या समर्थनात जोरात पार्टी झाली. केक वगैरे आणुन 'राहुल्या' आणि 'सच्या' दोघांनी नियोजन केले होते. आमच्या ग्रुप प्रमाणे तुमच्या हि ग्रुप मध्ये ही धोनी चे जबरा फॅन असणारे मित्र आहेतच. ही लोकप्रियता असण्यापाठीमागे धोनीच्या यशाचा चढता आलेख आहे. आपण जेव्हा पासून क्रिकेट समजून घेऊन बघायला सुरुवात केली तेव्हा पासून धोनी आपल्यासाठी एखाद्या हिरो सारखा राहिला. शांत, संयमी, टीमला पुढे नेणारा, हटके निर्णय घेणारा, मॅच ला शेवटच्या बॉल पर्यंत खेचून नेणारा, टीम स्पिरिट वाढवणारा, विकेट किपिंग करताना विविध जादूचे प्रयोग करणारा, क्रिकेटच्या सर्व प्रकारातला यशस्वी कॅप्टन, ICC चे सर्व कप आपल्यात आणणारा, 'कूल धोनी' म्हणजे आपल्यासाठी 'महेंद्र बाहुबलीच' आणि म्हणूनच धोनी भाऊंचा बर्थडे आपल्यासाठी व्हेरी व्हेरी स्पेशल असणारच की.
                या आठ्वड्यातला दुसरा हार्ड विषय म्हणजे 'हेल्मेट सक्ती' तसे आम्हाला बाईक कधी कधी तरच मिळते.आणि त्यात हेल्मेट सक्ती म्हणजे आता ती ही मिळणार नाही. तसे आमच्या गँग मध्ये रेग्युलर बाईक वापरणारे हेल्मेट वापरतात. आपल्या सुरक्षतेसाठी ते उत्तम आहे पण आमच्या सारख्या अनियमित आणि मागच्या सीट वर बसणाऱ्यासाठी हेल्मेट सक्ती म्हणजे जरा जास्तच होतंय. सध्या शहरात अट शिथिल केली आहे. पण आपण सुधारणेच्या बाजूने आहोत बघूया "आगे आगे होता है क्या?"
             दोस्तांनो आपल्या सर्वाचा लाडका, बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय सुपरहिरो 'स्पायडरमॅन' पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. लहान असताना कार्टून आणि नंतर सिनेमाच्या रूपाने आलेला सुपरहिरो जगभर लोकप्रिय आहे. आम्ही ही पहिला.  'स्पायडरमॅन: होमकमिंग' या तिसऱ्या भागामुळे स्पायडी चा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. पीटर पार्कर ची कथा या तिसऱ्या भागात वेगळ्या संकल्पनेतून मांडली आहे.  यात आयर्नमॅन- टोनी स्टार्क याची कथा एकमेकांत गुंफली आहे. या आधीच्या स्पायडी च्या चित्रपटात एका ठराविक शहरापूरता मर्यादित ठेवलेल्या स्पायडी ला आता कुंपणाबाहेरचे जग खुणावत आहे. येणाऱ्या काळात या स्पायडी चे पुढील भाग नक्की येतील.
            VIP-2 चा ट्रेलर पहिला का, अरे आपल्या धनुष चा नवा कोरा तेलगू सिनेमा. आणि हो याचे खास आकर्षण म्हणजे काजोल 20 वर्षानंतर पुन्हा तेलगू चित्रपटात दिसणार आहे. होय खरंच...आणि विश्वास बसत नसेल तर यूट्युब बघाच. ट्रेलर जोरात आहे.
          या सगळ्या नंतर आणखी एक न्युज आहे. ढिंचाक पूजा चे ऑफिशियल व्हिडीओ यूट्युब ने ऑफिशिअली काढून टाकले. आता ही गुडन्यूज कि बॅडन्यूज हे तुम्हीच ठरवा.

---------------------------------------------------------

संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

गुरुवंदना...

📝आदरणीय गुरूवर्य…..
      गुरू, कोणाला  म्हणणार आपण गुरू?...
आपलं जगणं घडवणारा ,
पावलांना बळ देणारा ,कठीण वाटेवर मुददाम नेऊन सोडणारा.
पण गुरू म्हणजे आधाराची कुबडी नव्हे.हात पसरून मदत मागत बसायची जागा नव्हे.
तो जगायला शिकवतो. तो लढायला शिकवतो.
त्यांनी पाठीवर हात ठेऊन नुसतं लढ म्हंटलं तरी अंगात दहा हत्तींच बळ येतं
आणि मनाच्या गाभा­यात चैतन्याचा संचार होतो अन प्रेरणांना उधाण येतं.
           गुरू कोठेे भेटाव..... आपल्याच माणसात अन आपल्याच सभोवती......
           आपणही माझ्या आयुष्यात असेच आलात.आपली भेटही अशाच एका वळणावर झाली. आपण मला वाट दाखवलीत..विचारांची पदधती शिकवलीत. चुकिच्या विचारांची पदधती बदलून पहायला शिकवलीत. आपण मला प्रश्नांच्या गर्दीत सोडलत. उत्तरे माहित असुनही ती मला शोधायला लावलीत. विचारांच्या विशाल जगात आपण मला स्व:ताची स्वतंत्र पायवाट शोधायला शिकावलीत. प्रसंगी आधार दिला व जबाबदारीही. ठेच लागुन पडलो तर आधार ही आपणच दिलात व उठून पुन्हा मार्ग चालण्याचे बळही आपणच दिले. वाटेत अडचणी आहेत धोके आहेत म्हणुन मागे न फिरता ध्येयापर्यंत चालायचं हे ही आपणचं शिकवलत.स्व:तचे निर्णय स्व:त घेऊन स्व:ताच्या मनासारख जगायला आपण शिकवलत. कष्ट करूनही आनंदात जगायला आपण शिकवलत.
              जग बदललं काळ बदलला तरी आपलं मोल कमी होणार नाही.कुठलच यश एकटयाचं नसतं.आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणा­याकडून काहीना काही चांगल घ्यावं हे आपण शिकवलत.
              म्हणूनच गुरूपौर्णिमेच्या या मंगल दिनी आपल्या ऋणात राहून आपल्याविषयी कॄतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न…..
गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.....💐💐

🖋संदीप.....

जलवा जग्गा आणि स्मृतीचा

"लंडकियो को मत समझो भार, यही है देश का आधार।" हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे फटाके शेवटी गेल्या रविवारी कमी आले. चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये झालेल्या वाईट पराभवाचा बदला शेवटी "भारतीय महिला क्रिकेट" संघाने घेतला आणि आपल्या जिव्हारी लागलेल्या पराभवाच्या जखमेवर मलम व फुंकर मारायचे काम फत्ते केले आहे. भारतात फक्त क्रिकेट आणि ते हि पुरुष प्रधान असताना आपल्या महिला टीम ने "विश्वचषक स्पर्धेत" चार साखळी सामने जिंकत आपल्या कामगिरी ची चमक दाखवत "हम किसी से कम नही" हे सिद्ध केले आहे. पाकिस्तान ला हरवले म्हंटल्यावर महिला टीम चा विषय खोल आहे हे नक्की. त्यामुळे सध्या भाजी आणण्यापासून पाकिस्तान ला हरवण्यापर्यंत सर्व काही कामे मुलींनाच करावी लागत आहेत. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे इंग्लंड मध्ये बॅटिंग मध्ये हवा करणारी 'स्मृती मंधाना' आपल्या सांगलीची आहे. शेवटी "भारतीय नारी सब पे भारी" हेच खरे. आता यामुळे आपल्या सर्वांच्या वॉलपेपर आणि स्क्रीन-सेव्हर ची जागा अभिनेत्री ऐवजी भारतीय महिला क्रिकेटर नी घेतली आहे. मिथाली राज च्या नेतृत्वाखाली टीम ची हि विजयी पताका अशीच फडकत राहो व लवकरच "महिला वर्ल्ड कप" पण आपल्याकडेच येवो हीच सदिच्छा!.
         1 तारखेला GST लागू झाला. आमच्या 'पव्या' च मॅथ्स जरा जास्तच चांगले आहे पण याचा अर्थ असा नव्हे की GST मधील सगळेच कळते. सारखा भेटेल त्यावेळी GST चे फायदे आणि तोटे यावरच सेमिनार सुरु असतो. आधीच न समजणाऱ्या किचकट गोष्टीमध्ये 'डकवर्थ लुईस' होते त्यात आता GST ची भर पडली आहे. GST मुळे मोबाईल व कॉल रेट वाढणार एवढीच वायर समजली. त्यामुळे मोबाईल तेवढा जपून वापरायला पाहिजे. कॉल रेट बाबतीत अंबानी तात्यांच्यामुळे टेन्शन नाही नाहीतर आम्ही रस्त्यावर आलो असतो.
           'यही उमर है कर ले गलती से मिस्टेक' ही रिंगटोन असेल ना मोबाईल ची. एव्हाना प्रत्येकाच्या तोंडात बसले असेल हे गाणे. लाखो दिलो की धडकन असलेल्या 'अरिजित सिंग' गायलेले गाणे. अरिजित चे गाणे म्हणजे युथ डोक्यावर घेणार हे 100 टक्के शिवाय गाणे हि जबरदस्त आहे. आपल्याला आवडतील अशा डान्स स्टेप्स आणि मनात घर करणारे म्युझिक. याच सिनेमातील "उल्लूका पठ्ठा", "फिर वही" हि हि गाणी सध्या एफएम रेडिओ, यूट्युब आणि मोबाईल सॉंग लिस्ट मध्ये वाजू लागली आहेत. "जग्गा जासुस" हा गमतीदार सिनेमा असल्याने तो आपल्याला आवडेल शिवाय रणबीर, कतरीना ची जोडी काय जलवा करेल हे कळेलच. तो पर्यंत धमाल गाणी एन्जॉय करूया.
               सिनेमाची उत्सुकता Teaser, मग ट्रेलर, गाणी यातून चांगलीच ताणली जाते. यातच नवी भर म्हणजे 'मिनी ट्रेलर' हि नवी कन्सेप्ट. "जब हॅरी मिट सेजल" या शाहरुख आणि अनुष्का च्या नव्या कोऱ्या सिनेमाचे चार मिनी ट्रेलर लॉन्च झाले आहेत. यालाही लाखो लोकांनी आपल्या विव्ह च्या माध्यमातून पसंती दाखवली आहे. त्याचबरोबर "मैं बनी तेरी राधा" हे गाणे हि रंगात आहे.
        येणार जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पावसाच्या धडाक्यात नव्या कोऱ्या सिनेमाची हि मेजवाणी मिळणार आहे.

----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com

Saturday, 1 July 2017

ढिंचाक सॉंग्स

"सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय? नाय काय?" ऐकलंय ना हे गाणं, असेलच आणि नसेल ऐकलं तर नक्की ऐका. व्हाट्सअप्प, फेसबुक, यूट्युब सगळीकडे आहे. तुम्ही जिथे जाल तिथे नक्की सापडेल शिवाय गल्लीतली चिल्लर, कट्टयावरची पोरं, मुलींचा गलका सगळ्यांच्या तोंडी गुणगुणलं जाणारे एक ढिंचाक सॉग. सध्या तुम्ही कोणतेही सोशल नेटवर्क वर असा तुम्हाला हे शब्द आणि हे गाणं भेटणारच. यूट्युब वर तर 10 लाख लोकांनी हे गाणं बघितले आहे. बच्चे कंपनी पासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वाना आवडणारे आणि तितक्याच सहजपणे ओठावर येणारे गाणे. सहज सोपे शब्द आणि तितकेच सहज सोपे संगीत त्यामुळेच सध्या सगळीकडे "सोनू" ची क्रेझ आहे. हि क्रेझ इतकी आहे की " सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?" हे वाक्य टॅगलाईन बनले आहे. अगदी या लाईन वर कित्येक जोकस् सध्या फिरत आहेत. ज्याच्या ग्रुपमध्ये "सोनू" हे नाव किंवा पेटनेम असणारा, असणारी Friend असेल तर त्याच्या नावावरून बोलायला नको इतकी गंमत सुरु आहे. ग्रुप मध्ये काहीही बोलत असताना असा काही प्रसंग आला की "सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?" हे वाक्य आपसूक येते.
             गेली काही वर्षात अशा वेगळ्या धाटणीची बरीच गाणी आली की जी आली आणि त्यांनी जिंकलं, अगदी मनावर अधिराज्य वगैरे केले. धनुष चे "कोलावरी डी" आठवत असेल की, सहज म्हटलेले पण लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर आलेले "ओपन गंगम स्टाईल" हे गाणे. हे गाणे आणि त्यांच्या डान्सची युनिक स्टेप अजूनही भारतीय रोड डान्स मध्ये हमखास दिसते. त्याच बरोबर "शांताबाई" अजूनही   सुरु झाले की डान्स चा ठेका धरतो. तसेच "कल्लूळाच पाणी" यासारखी गाणी ज्यांनी लोकांना अगदी वेड लावून सोडले. या गाण्याचा ठराविक असा प्रेक्षक वर्ग नव्हता हि गाणी सर्वांसाठी होती. सर्वाना आवडली.सर्वांनी एकदा तरी पुटपुटली. लहान मुले तर या गाण्यावर सहज ठेका धरतात. मोठ्यांच्या मुरवणुकी, वराती अजूनही याचं गाण्यांनी गाजतात.
        पण असे वेड लावणारे काय होते या गाण्यात. या सर्व गाण्याचे कॉमन वैशिष्ट्ये म्हणजे यांचा सहज सोपेपणा आणि वेड लावणारे संगीत, एकदा ऐकल्यावर सहज लक्षात राहणारी सोपी रचना,गाण्यामध्ये असणारी प्रचंड ऊर्जा या सगळ्यामुळे ही गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.
             असाच एक प्रकार हिंदीतही सुरु आहे "ढिंचाक पूजा" . एका साध्या पण स्टायलिश मुलींनी गायलेली हटके गाणी.  "सेल्फी मैने ले ली आज","दिलो का शूटर" यासारखी तिची गाणी ऐकली असतील. या ढिंचाक पूजा च्या गाण्याला आणि शब्दाला काहीही आकार-उकार नसताना हि गाणी यूट्युब वर लाखो लोकांनी बघितली आहेत.
           अशी बरीच व वेगळ्या प्रकारची गाणी भविष्यात येतील व सर्वाना आवडतील.हे सगळे प्रकार पहिले कि पूर्वी सारखी शांत, अर्थपूर्ण, सुरेख संगीत असणारीच गाणी आवडतील असे नाहीतर हि अशी साधी,सोपी, गद्य रूपातील, ढिंचाक संगीताची व डोक्यात थेट जाणारी गाणी सध्याच्या जनरेशन ची धडकन आहेत.

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...