Sunday, 31 May 2020

जागतिक पालक दिन World Parents Day

जागतिक पालक दिन

   आज 1 जून जागतिक पालक दिन यानिमित्त हा थोडासा शब्दरूपी संवाद...........

                मूल होण्यापूर्वी आपण स्त्री-पुरुष असतो. नवरा-बायकोच्या नवीन नात्याची ओळख होईपर्यंत आणखी एक वेगळ्या भूमिकेची जबाबदारी आपल्यावर येते. मूल हे नवरा-बायकोला आई-बाबा होण्याची संधी देते. बाळ होणे व ते मोठे होऊ लागणे यातूनच आपले पालकत्व घडू लागते. हा अनुभव खूप हळुवार आणि तरल असतो. हे निसर्गातही घडत असते. प्रत्येक आई-वडिलांना होणाऱ्या बाळा मुळे नवनिर्माणाच्या आनंदाबरोबर पालकत्वाची मोठी जबाबदारी येते.

               पालकत्व, सजग पालकत्व, सुजाण पालकत्व, मुलांवरील संस्कार, बालमानसशास्त्र या विविध संकल्पना सध्या आपल्याला आपल्या पालकत्वाच्या मोठ्या जबाबदारीची जाणीव करुन देतात, पण जुनी -वयस्क माणसं नेहमी म्हणतात आमच्या वेळी नव्हतं असं काही, मुलात मूल मोठं व्हायचं.त्यांच्या भूमिकेतून ते ही खरे आहे की, तो काळ, त्यावेळीची  कुटुंबरचना, समाजरचना महत्त्वाची होती. मुख्यता: मुलांना सोबत होती. सध्याच्या परिस्थितीप्रमाणे मुलांना अपेक्षांच्या ओझ्याखाली अपेक्षापूर्तीसाठी झगडावे लागत नव्हते, पण काळ बदलला आणि  ‘Change is the rule of nature’ याप्रमाणे पालकत्वातही बदल झाला. पूर्वीच्या मुलं म्हणजे भगवंताचा प्रसादमानण्याला अपेक्षा व जबाबदारीची किनार लाभली व सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार याची गरज निर्माण झाली.

              लहान मुलांच्या बाबतीत नेहमी वापरले जाणारे एक वाक्य म्हणजे लहान मुले म्हणजे मातीच्या गोळ्यासारखी असतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो, तसा मुलांनाही आकार देता येतो.पण थोडा बारकाईने विचार केला तर  हे थोडे न पटणारे आहे. माती निर्जीव असते. आपण दिलेल्या आकारावर तिची कोणती प्रतिक्रिया नसते, पण आपला पाल्य सजीव आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे. भावना आहेत. विचार आहेत. संवेदना आहेत आणि म्हणून आपण आपल्याला हवा तसा आकार देण्यापेक्षा पाल्याचा विचार करून त्याला हवे त्याप्रमाणे घडवणे ही पालकत्वाची जबाबदारी आहे. यासाठी आपल्या बाळावरील संस्कार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मूळात संस्कार कशाला म्हणायचे? हाच मोठा गोंधळ आहे. काही पालकांच्या मते रिवाज पाळणे, रिती-भाती पाळणे, पाठांतर, काही म्हणता येणे, आपल्या आई-वडिलांचे ऐकणे म्हणजे संस्कार, पण यातच आपण चूक करतो.  संस्कार हा खूप व्यापक शब्द आहे.  स्वच्छता, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता, आदर, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, दुसऱ्याला मदत करणे, विनम्रता, प्रेम, कौतुक, हे सर्व संस्कारच आहेत. थोडक्यात आपल्याला आपल्या मुलाला माणूस म्हणून घडवणे म्हणजे खरा संस्कार होय .पालक म्हणून आपण तो कशा पद्धतीने करतो हे महत्त्वाचे.........

                 सध्याच्या २१ व्या युगात जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांच्या सर्व गोष्टीत सकारात्मक लक्ष देणे ही काळाची गरज बनली आहे. मुलांना समजून घेणे व त्यांना समजून देणे हा सतत चालणारा प्रवास आहे. मुलाचे त्याचे असे विश्व असते. जसे फुल उमलताना त्याचा सुगंधाचा गाभा असतो तिथपर्यंत जायचे नसते.त्याप्रमाणे मुलांना आशय असतो तो आपण ढवळायचा नसतो. नाहीतर मुलांमधील अस्वस्थता कधी नकारातून, कधी निराशेतून तर कधी आक्रमकतेमधून व्यक्त होऊ लागते. यासाठी पालक म्हणून आपण ही काळजी घ्यायला हवी. आपण झाड लावतो. झाडाला पाणी घालतो. कीड लागू नये म्हणून शक्य तेवढी काळजी घेतो. बाकी सगळे प्रयत्न झाडाचे असतात. म्हणजे झाडाचा आकार, पानाचे फुटवे, फुलांचे उमलणे, फळांचा गोडवा या सर्व गोष्टी झाडावर अवलंबून असतात. आपण फक्त योग्य काळजी घ्यायची असते. मुलांचेही तसेच असते. आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे, आपली मुले ही आकार घेणारा एक सजीव आहे. जगण्याच्या या संघर्षात त्याला सक्षम बनवणे हे आपले कर्तव्य आहे.  

                          ‘Give a Man a Fish, and You Feed Him for a Day.

               Teach a Man to Fish, and You Feed Him for a Lifetime’

             ही छोटीशी चीनी म्हण आपल्याला  सांगते की आपल्या मुलांना आयुष्यभराच्या गोष्टीसाठी तयार ठेवा आणि यासाठी आपण केलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयोगी पडतील.

             शेवटी आपण आपल्या मुलांचे मालक नसून पालक आहोत याची मनाशी कायम खूण गाठ बांधून त्यांना सदैव एकाच चेहऱ्याने वावरायला व जगायला शिकवले पाहिजे. पालक म्हणून आपल्या मुलांला घडवताना त्यांना आयुष्यभर पुरेल व जगण्याच्या प्रवासात नेहमी साथ देईल अशा संस्कारांची शिदोरी मुलांना देणे हीच आपली जबाबदारी व आद्य कर्तव्य आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

© संदीप कोळी.

📱9730410154

sandip.koli35@gmail.com


Saturday, 30 May 2020

सेवानिवृत्ती लेख Retirement

सेवानिवृत्ती लेख

आदरणीय गुरुवर्य……

प्राध्यापिका कु. कुन्ने पुष्पा श्रीकांत.

ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, पेटाळा, कोल्हापूर.

 --------------------------------------------------------------------------------

 “गुरु माझा ज्ञानाचा झरा, गुरू माझा आसमंत सारा,

  गुरु माझा उन्हात सावली, गुरु माझा साक्षात माऊली.”

                 आज ३१ मे २०२० ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळा, कोल्हापूरच्या प्राध्यापिका, आमच्या आदरणीय गुरुवर्य कु. कुन्ने पुष्पा श्रीकांत या आपल्या ज्ञानदानाच्या पवित्र सेवेतून आपल्या विहित वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहे.

                 ३ डिसेंबर १९६२ रोजी श्रीकांत व लतिका या सुशिक्षित दांपत्याच्या घरी यांचा जन्म झाला. आई शिक्षिका व वडिलांचा व्यवसाय अशा वातावरणात त्यांची व भाऊ संजय यांची जडण-घडण सुरू झाली. प्राथमिक शिक्षण ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर आईच्या नोकरी व वडिलांच्या व्यवसायामुळे कुन्ने कुटुंबीय जयसिंगपूर येथे स्थायिक झाले. इ. ६ वी पासून १० वीपर्यंतचे शिक्षण जयसिंगपूरच्या, जयसिंगपूर हायस्कूल येथे झाले. अभ्यासातील प्रगती व शिक्षणाची आवड या गोष्टीमुळे घरच्यांनीही त्यांचे शिक्षण सुरू ठेवले. ११ वी ते एम.ए पर्यंतचे शिक्षण त्यांनी सांगलीच्या, चंपाबाई ठाकरसिंह विद्यापीठ येथे पूर्ण केले. मराठी व इतिहास विषयात पदवी, तर मराठी या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात मोकळ्या वेळेत शिवण व टायपिंगचे कोर्से आवडीने पूर्ण केले. बी.ए पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगली आकाशवाणी येथे आपल्या सुमधुर आवाजात २ वर्षे निवेदनाचे काम केले. बी.ए व एम.ए पूर्ण करत असताना कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य संत साहित्य अभ्यासक रेळेकर सर यांच्या वैचारिक समृद्धतेचा त्यांना खूप फायदा झाला. अभ्यासाबरोबर या वर्षात त्यांनी वर्गाचे बिनविरोध प्रतिनिधित्वही केले.

                  शालेय वयापासून एअरफोर्स किंवा शिक्षिका ही दोनच स्वप्न जगणाऱ्या कुन्ने  मॅडम यांनी आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत शिक्षिका होण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी सांगलीच्या, पुतळाबेन शहा कॉलेजमधून बी.एड आणि एम.एड या शिक्षकी पेशासाठी आवश्यक उच्च पदवी प्राप्त केली.

                  सुरुवातीला काही स्थानिक शाळा, जुनिअर व सीनिअर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर जयसिंगपूर, येथील कल्पवृक्ष शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे  प्राध्यापिका म्हणून २ वर्षे सेवा केली. दरम्यान आईच्या वैद्यकीय कारणामुळे त्यांचे हे कार्य काही काळासाठी खंडित झाले. त्यानंतर १९९८ ते २००२ ही ४ वर्ष त्यांनी वारणा कोडोलीच्या यशवंतराव शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य केले. २००२ पासून ते आज अखेर त्यांनी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या ज्यु. कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.

                     शिक्षक हा राष्ट्रनिर्माणाचा मजबूत स्तंभ आणि याच मजबूत स्तंभाला आणखी मजबूत, शिस्तप्रिय, क्षमाशील व कर्तव्यदक्ष बनवण्याचे काम मॅडम २४ वर्ष करत आहेत. आपले ज्ञान, मधुर वाणी, सर्वांशी मिळून मिसळून वागणे, क्षमाशील, उपक्रमशीलता, गुणग्राहकता, नाविन्याची आवड या गुणांनी त्या विद्यार्थीप्रिय व प्रेरणादायी ठरल्या आहेत. ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा’ या वाक्याचा खऱ्या जीवनाशी संदर्भ लावायला त्यांनी शिकवले. ज्ञानदानाच्या या दोन तपात आदर्श शिक्षक घडवण्याचे कार्य त्यांच्या शब्दांनी केले आहे व हे हजारो आदर्श शिक्षक लाखो आयुष्य घडवण्यासाठी आज धडपडत आहेत. ज्ञानाच्या या प्रवासात त्यांनी अनेक संमेलन, शिक्षण परिषदा, प्रशिक्षणे याठिकाणी तज्ञ मार्गदर्शिका म्हणून मार्गदर्शन केले आहे.

               आदर्श शिक्षक घडवणाऱ्या मॅडम यांची आदर्श शिक्षिका म्हणून अनेक ठिकाणी सन्मान झाला आहे.  महाराष्ट्रातील अनेक नामवंत शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व सन्मान केला आहे.

               ज्ञानदानाचे पवित्र कामाबरोबर समाजसेवेचा वसाही त्यांनी घेतला आहे. ‘आडात असेल तरच पोहर्‍यात येणार’ त्याप्रमाणे समाजसेवेचे व्रत त्यांना आपल्या आई-वडिलांकडून संस्कारांनी मिळाले आहे. आपल्या मुलीच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चा एवढा खर्च अनाथ व गरीब मुलांच्या शिक्षणावर करणाऱ्या त्यांच्या आईने स्वतःच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली असतानाही कारगिल रिलीफ फंडासाठी आपले २ महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन दिले होते. हा वसा मॅडमनी पुढे चालवला आहे. कॉलेज जीवनापासून प्रत्येक वाढदिनी रक्तदान करणार्‍या मॅडमनी, शेकडो मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्यक्ष आर्थिक रूपात हातभार लावला आहे. प्रत्येक वर्षी अपंग दिनादिवशी मुकबधिर विद्यालयात वस्तू स्वरूपात भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले आहे. त्यांनी आपल्या स्वतःची संग्रही सर्व पुस्तके ग्रंथालयाला दान करण्याचा संकल्प सोडला आहे. याशिवाय उमेद फाउंडेशन मध्ये त्या सक्रिय सहभागी आहेत.  त्यांच्या विचारावर महात्मा गांधी व साने गुरुजी यांचा पगडा आहे, तर  डॉ. प्रकाश आमटे डॉ. अभय बंग, डॉ.रविंद्र कोल्हे  यांच्या समाजसेवेने त्या प्रेरित आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातील 50%  रक्कम समाजसेवेसाठी वापरावी हा त्यांच्या आईचा संस्कार त्यांनी जपला आहे.

                  मराठीच्या प्राध्यापिका असणाऱ्या कुन्ने मॅडम यांना वाचन करणे, लेखन करणे,  कविता करणे याची गोडी आहे. विविध ठिकाणे पाहणे, पर्यटन करणे ह्याची त्यांना आवड आहे. मोकळ्या वेळेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा त्यांना छंद आहे.

                  सेवानिवृत्तीच्या या एका छोट्या विश्रांतीनंतर लेखन व प्रवासासाठी वेळ देण्याचा त्यांचा मनोदय आहे. ‘आई’- या हळव्या कोपऱ्यात बद्दल लिखाण करण्याचा त्यांचा मानस आहे. नोकरीच्या धावपळीत त्यांनी आलेल्या प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देऊन कुटुंब भक्कमपणे चालवले आहे.

                  शिक्षक म्हणजे ज्ञानाच्या सागरात मुक्तपणे वावरणारा राजहंस. आपल्या ज्ञानाच्या, कौशल्याच्या व प्रगल्भतेचा जोरावर राष्ट्रासाठी सुज्ञान पिढी घडवणारा दीपस्तंभ. ज्ञानाचा हा दीपस्तंभ सदैव तेवत असतो पण या प्रवासात टप्पा येतो सेवानिवृत्तीचा. विहित वयोमानानुसार व सरकारी नियमानुसार थांबण्याचा संकेत.......

                   आमच्या गुरुवर्य प्राध्यापिका कुन्ने मॅडम आज सेवेतून निवृत्त होत असल्या तरी विद्यार्थी “ बी घडवण्याचे” त्यांचे कार्य आजन्म सुरू राहील. येणाऱ्या काळात त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे संकल्प व त्यांचे समाजसेवेचे व्रत अखंड सुरु राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा.....  

------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी 

97360410154
sandip.koli35@gmail.com


Monday, 25 May 2020

आमची उन्हाळी सुट्टी Our Summer Holidays


आमची उन्हाळी सुट्टी

                    सध्या शाळेच्या मुलांना उन्हाळी सुट्या आहेत. त्यामुळे ही मुले निवांत. अशा सुट्टी पडलेल्या व सुट्टीसाठी आलेल्या मुलांना मोबाईलवर गेम खेळताना, टीव्ही पाहताना पाहिले आणि आमची उन्हाळी सुट्टी आठवली. 
                     उन्हाळ्याची सुट्टी म्हंटले कि मजा, मस्ती आणि धमाल...तशी ही वर्षात 40-45 दिवस मिळणारी ही वर्षातली सर्वात मोठी सुट्टी. परीक्षा संपल्याने, शैक्षणिक वर्ष संपल्याने डोक्यावर कशाचं ओझं नसायचे उलट नवीन इयत्तेची, वर्गाची उत्सुकता असायची. अन त्यातच हि उन्हाळी सुट्टी...
                    तसं वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यापासून सुट्टीला जाण्याविषयी घरच्याकडे तगादा असायचा. पण कसे तरी करून पालक ते 1 मे पर्यंत ढकलायचे मग त्यात वेगवेगळी कारणे आणि प्रलोभने असायची. शेवटी सुट्टीला जायचे ठरले कि कितीही गावांचे पर्याय दिले तरी मामाच्या गावा इतके हॉट फेव्हरेट ठिकाण कोणतेच नसायचे किंवा आजही नाही.
                    लहान असताना 'झुक झुक आगिनगाडी ' या बालगीताप्रमाणे आपल्या मामाच्या गावाला जायला रेल्वे असावी असे प्रत्येक लहान मुलांचे स्वप्न असायचे आणि आमच्या मामाच्या गावाला रेल्वे खरोखर जात होती त्यामुळे आमची दुहेरी मज्जा. मामाचे गाव (आजोळ) म्हणजे आपले हट्ट आणि लाड पुरवणारे हक्काचे ठिकाण......
                   मामाच्या गावाला गेल्यानंतर ते अगदी सुट्टी संपायच्या अगोदर चार दिवसापर्यंत धमाल, मस्ती, मागे वळून पाहायचे नाही हा अँटीट्युड. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा सगळा बिझी कार्यक्रम आखलेला असायचा. सकाळी उशिरा उठायचे मग आपले आटपून सगळी गँग घेऊन मोहीम डायरेक्ट विहिरीवर पोहण्यासाठी. पोहणे म्हणजे काय  फक्त अंघोळी पुरते नव्हे तर चांगला कंटाळा येईपर्यंत किंवा घरातून कोणीतरी ओरडत येत नाही तो पर्यंत पाण्यातच. मध्येच कोणी आलाच बाहेर तर मग माती अंगावर टाकायचा जालीम उपाय होताच.
                  पोहण्याच्या या दिर्घ व्यायामानंतर पाण्यातून बाहेर आले की पोटात भुकेचे ढोल वाजायचे मग काय सुसाट घराकडे. मामीच्या हातचे जेवायला. घरात गेल्या गेल्या ताट घेऊन भाकरीच शोधायची. भले घरात पोहण्याबद्दल कितीही ओरडो आपण आपले पोट भरायचे. भाचा म्हंटले कि मामा-मामीचा आवडता पाहुणा त्यामुळे खाण्याची चंगळ असायची. भरलेल्या पोटावरुन हात फिरवत दुपारचे नियोजन. बाहेर कडक ऊन असल्याने घरातले ओरडतात म्हणून कुठेतरी झाडाखाली किंवा सावलीच्या ठिकाणी कॅरम, पत्ते, सापशिडी, व्यापार यासारखे खेळ रंगायचे.  जुन्या वह्यांचे पुट्ठे काढून त्याचे घर, मनोरे तयार करायचो.खेळताना चिडा-चिडी व्हायची आणि त्याचा शेवट रुसा-फुगीत व्हायचा. पण तो तेवढ्यापुरताच क्षणात येणारा राग आणि त्यापेक्षाही वेगाने तो विरघळणारा.
                    चारच्या दरम्यान उन्हाचा जोर कमी झाला की क्रिकेट चा डाव मांडायचो. शंभर नियम आणि अटी मध्ये हा खेळ खेळायचो. तरीही त्यात मजा असायची. मग संध्याकाळच्या वेळेला शेतात आंबे, जांभळे, याच्या कडे विशेष मोर्चा असायचा.संध्याकाळच्या वेळी सुटणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाला पिकलेले नैसर्गिक, रसाळ, गोड आंबे मिळायचे त्यासाठी वारा सुटला कि आमचा ठिय्या झाडाखालीच.यात अंधार कधी पडायचा हे देखील समजत नसायचे. रात्री सर्वांबरोबर अंगणात जेवायला बसण्याचा आनंद काही औरच. कापड लावलेल्या कळशीतले थंड पाणी आणि मोकळ्या आभाळाखाली मामीच्या हातचे जेवण याची सर कशात नाही. जेवल्यानंतर कधी झोप यायची हे समजायचे नाही.
                  असा सगळा खटाटोप असायचा दररोजचा, यात कधी बदल असायचा, कधी दिवसातून दोन- तीन वेळा पोहणे व्हायचे, कधी मामाच्या बरोबर शेतात दिवस जायचा, शिवाय कधी रानमेवा करवंदे, चिंचा याकडेही दौरा असायचा शिवाय सायकल हेही साथीला असायची. लपाछपी, सूरपारंब्या, लगोरी, गोट्या हेही खेळ रंगत वाढवायचे. अशा एक ना अनेक थरारक प्रयोगांनी जर वर्षीची सुट्टी नटलेली असायची.
                  आताच्या मुलांकडे बघितले की कुठेतरी ती मजा, तो आनंद ही मुले मिस करतायत याची लख्ख जाणीव होते. टी. व्ही , मोबाईल, तंत्रज्ञान आणि काळजी यात मुलांच्या बालपणाचा हा सुखद ठेवा कुठेतरी हरवत चालले आहे . काळाच्या या बदलत्या ओघात बालपण हरवत चाललंय हे नक्की.......

-----------------------------------------------------------------------------------------------------
©संदीप कोळी
 9730410154
sandip.koli35@gmail.com


Tuesday, 19 May 2020

पोहणे Swiming


पोहणे.....
“उडने दो परिंदो को अभी शोख हवा में
फिर लौट के बचपन के जमाने नही आते
                     आमच्या लहानपणी दोन कोर्स महत्वाचे. एक सायकल चालवायला शिकणे आणि दुसरे पोहायला. आयुष्यात बाकी काही नाही जमले तरी चाले पण सायकल व पोहायला येणे must होते. एकंदर तो इब्रत, प्रेस्टीजचा विषय होता.
                   सायकल वर्षभर कधीही शिकता येत होती. त्यासाठी काळाची, वेळेची  अट नव्हती. पण पोहण्यासाठी मात्र उन्हाळ्याची सुट्टी राखीव होती. तसे काही लोक दररोज पोहतात, पण आमच्यासारख्या हौशी लोकांसाठी उन्हाळाच राखून ठेवलेला असे. वार्षिक परीक्षा संपली की ट्रेनिंग सुरू असा घरातल्या मोठ्या माणसांनी चंगच बांधलेला असे.
                 तसही पाणी बघितले की आधीच भीती वाटे, त्यात पोहायचे म्हणजे अजून भीती. त्यावेळी आम्हाला पोहायला शिकण्यासाठी दोनच पर्याय होते एक विहीर आणि दुसरी नदी. स्विमिंग टॅंक (जलतरणतलाव) असतो हेच आम्हाला फार उशिरा कळाले. तोपर्यंत आम्ही पोहायला शिकलो होतो. नदी ही प्रत्येकाच्या वाट्याला येत नव्हती त्यामुळे आमच्यासाठी विहिरीची परीक्षा होती. पोहायला शिकवायला एकापेक्षा एकजण तयार असत पण आमचेधाडस होत नसे. विहिरीत पडलो की आपण लगेच नाकातोंडात पाणी जाऊन मरणार हीच भीती आम्हाला विहितीत उतरू देत नसे. मग काही दिवस फक्त दुसरे पोहताना काठावर बसून बघण्याचा कार्यक्रम. त्यात पण भीती वाटे अचानक कोणी ढकलून दिले तर काय? या भितीपाई पाण्यात कमी आणि चौफेर जास्त लक्ष ठेवावे लागे.
                     फक्त काठावर बसून काही दिवस ढकल्यावर आता प्रत्यक्ष पोहायचे यावर आमचे सोडून इतरांचे एकमत झाल्यावर आम्हाला पाण्यात उतरवण्याचा मुहूर्त ठरे. आम्ही चौथीपासून पाचवीच्या उबरठ्यावर होतो. भर उन्हाळ्यात आम्हाला पोहायला शिकवण्यात आले तेही आमच्या मनाविरुद्ध. त्यावेळी पोहण्यासाठी प्लास्टिकचा कॅन, वाळलेला भोपळा, कडब्याचा बिंडा नाहीतर दोरी हे चारच पर्याय होते. आमच्या काकांनी आमच्यासाठी कडब्याच्या बिंडयाचा पर्याय टिक केला होता. पाण्यात पडल्यावर पोहायला येते त्याप्रमाणे आम्ही पण रडत-खडत पोहायला शिकलो.  
                     एकदा पोहायला यायला लागले की पाण्याची भीती पूर्ण गेली. वर्षभराची पोहण्याची कसर उन्हाळ्याच्या सुट्टीत भरून काढली जात असे. दिवसातून कधी दोन तर कधी तीन वेळा फेरा होई. भरपूर जण असतील तर 2-3 तास तरी कोणाला विहिरीतून बाहेर येऊ दिले जात नसे. अंगावर माती टाकने, साबण लावणे अशा करामती करून बाहेर येऊ दिले जात नसे.
                      गट्टा, सूर, खोच, वरुन उडी मारणे, गाळ काढणे. पाठ शिवणीचा खेळ असे अनेक प्रकार यात होते. कधी-कधी तर एकदा पोहलेली कपडे वळायच्या आत दुसऱ्यांदा पोहायला जात असू. अंग पांढरे होणे, कानात पाणी गेल्यावर एका बाजूला उड्या मारून पाणी काढणे अशा गंमतीही चालत. 
                    वाढत्या वयाबरोबर व काळाबरोबर या गंमती हरवत चालल्या आहेत. सध्या जलतरणतलावाच्या क्लोरीनयुक्त पाण्यात पोहायला शिकताना व पोहताना तशी अनुभूती, मज्जा येते की माहित नाही. पोहण्याच्या त्या आठवणी गोड होत्या अगदी उन्हात पाण्यात उडी मारल्यावर पाणी वर उडाल्यावर निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या........

संदिप कोळी
9730 410154
sandip.koli35@gmail.com

Monday, 11 May 2020

कनोरा Corona

        (वाचताना फार तर्क करून विचार करू नका, फक्त मनोरंजाचा हेतू)
                         कसलं हरकलो  हुतो आमी 2020 आल्यावर, यावर्षी IPL, वर्ल्ड कप सुट्टी नाय म्हणून म्हणलं तर आमालाच सुट्टी मिळाली. त्यो कुठन ईमानातन कनोरा आला अन आमच्या बोकांडी बसला. पहिल्यांदा ऐकलं तवा काय कळलच नाही जाऊ दे जगाची वरात कशाला येतिय आमच्या घरात म्हणून आमी ध्यानच दिलं नाय. पण असं म्हणत म्हणत कनोरा पाक आमच्या दारापर्यंत आला. खालच्या गल्लीच ‘पक्या’ सांगत हुत म्हण लोग काय काय मारून खात्यात. त्यातनच ह्यो कनोरा आलाय. पहिल्यांदा तो बारक्या डोळ्यांच्या माणसांसणी झाला अन त्येनी खिरापत वाटल्यागत सगळ्या जगाला वाटला.  
                तरी बरं आपल्याकडे देश लवकर बंद केलंत्येला नायतर आपल्याकडं धुरळाच उडला असता. उभ्या जन्मात कधी थंड न बसणाऱ्यासनी पण गप घरात बसायला लागलय. त्यातन बी आगाऊपणा केला तर पुलीस सप्पय सुजवत्यात. मागच्या आठवड्यात ‘किश्या’ माव्याची तलब झालती म्हणून मेडिकलच कारण करून गेलं खरं पण येताना मावा नाय, पण पाठीवर मोफतच वळ घिऊन आलंय. मागच्या आळीचं 'परद्या' 'मला कोण काय करतय?'  म्हणून हवा करायला गाडी घिऊन गेलत पुलिसांनी त्याचीच हवा काढलीय. दोनी मांड्या सुजवल्यात अन गाडी बी काढून घेतल्या. घरात आल्यावर गाडी काढून घितली म्हणल्यावर त्येच्या बा न बी लय हाणला. बिचाऱ्याला नीट बसायला येत नाय अन लंगडत चालतय ते येगळचं.
                  ह्या लाक डाउनच्या काळात सगळी घरात खुडूक हायती. सकाळी उठायचं, आवरायचं, जेवायचं, दुपारी झोपायचं, उठायचं, जेवायचं आणि झोपायचं यातच दिवस समतुय. घरातली बी अमास्नी पार वैतागल्यात. आमची गुण बघुन घरातली काय काम बी सांगत नाहित. 'मक्या' तर म्हणत हुता आता लोक डाऊन उठलं की आठ दिस घराकडेच येत नाय.
                  कॅरम खिळून खिळून त्याचा बी रंग गेलाय. तेच्याकड बघुन कधी-कधी वाटतय कि त्यो बी म्हणत असणार "मालक जरा तरी सोडा मला." पत्त्याची पान बी फाटली नवीन पण मिळणात. घरातल्या खिडक्या, पडद, पायऱ्या अन कुंडीतली झाडांची पानं मोजून झाली. एवढं वेळ असून बी पुस्तक उघडल की पेंग अपुआप येतूय. त्यांत परीक्षा छाप-काट्यासारखी एकदा हुनार, एकदा नाय म्हणून टेन्शन. तस परीक्षेचं टेन्शन आमी घेत नसतो, पण घरच्यासनी दाखवायला नाटक करायला लागतय नाहीतर घरात कुठलाबी विषय आमच्यावर इऊन आदळतोय.
                   मास्क-बिस्क लावायच आम्हास्नी काय जमना झालंय. आमची 'म्हातारी आय' तर मास्क घातलेल बघितलं की म्हणतीय “त्येबक माझं खोंड आलं मुसक घालुन.” या मास्क मूळ कोण वळखना झालाय, कोण हात करून जातय ते बी कळत नाय.
                 या कनोरामूळ अफवा तर एवढ्या आल्यात की आता नुसत्या अफवा ऐकून-ऐकून कनोरा हुतुय की काय असं वाटतंय. कोण सांगतय कनोरा हवेतन उडूत येतूय.  कोण म्हणतय वळवाच्या पावसातन येतूय. शेजारची काकू तर म्हणत हुती कनोरा झाला की माणूस मरतुय अन त्याच्याजवळ गेलं की जाळ हुतुय. पलीकडची आजी म्हणत हुती कनोरा झाला की किडच पडत्यात म्हण. या असल्या वाढीव अफवामुळं आमच चिकन- मटण बंद झालय. चिकन खाल्ल की कनोरा हुतुय म्हणून घरातली चिकन बी आणना झाल्यात.जीभला पाक बाबळी आलीय. या कनोरापेक्षा या अफवच्या पतंगाचा वैताग आलाय. 
                  माणूस खोकला तरी गाव भितुय. अन लगेच अफवा. असल्या वाढीव अफवापेक्षा ती मोबाईलवर सांगत्याल्या बाईच ऐकलं तरी बास हुतय.  हात-पाय साबणाण धुवायचं.  कुणाला लय जवळ जायचं नाय अन ताप, खोकला, सर्दी झाली की दवाखान्यात जायचं. एवढं पाळलं तरी लय झालं आपल्याच्यानं. 
                आपली अवस्था पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या जनावरासारखी झाली असली तरी ते आपल्यासाठी फायद्याचं  हाय. नायतर 'नाय अडत नाय तटत' म्हणत कनोरा झाल्यावर आपण बाराच्या भावात जायचो. म्हणून सरकार, डॉक्टर, पुलिस आपल्या फायद्यासाठी सांगत्यात ते एकूया अन हे कनोराचं ईमान जिकंडन आलंत तिकडं पठवुया. ' एव्हरीबडी से खच्याक कनोरा ढिचक्याव' 

©संदिप कोळी.
Sandip.koli35@gmail.com




Friday, 8 May 2020

सायकल Cycle

सायकल
अभी अभी कुछ गुजरा है लापरवाह सा
धूल में दौडता हुआ,जरा पलट कर देखा
बचपन था शायद1”
                               सायकल आपल्या प्रत्येकाचे  पहिले प्रेम. किमान 2000 साला पूर्वी जन्मलेल्या प्रत्येकाला वयाच्या कोणत्यातरी टप्प्यावर सायकलचे आकर्षण नक्कीच होते, किंबहुना आजही मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याविषयीचा जिव्हाळा नक्कीच अबाधित आहे. आईच्या कमरेवरून आणि बाबांच्या खांद्यावरून खाली उतरून स्वतःच्या पायावर उड्या मारताना आकर्षित करणारे सायकल हे पहिले वाहन होते. त्यावेळी आतासारखी रस्त्यावर दुचाकीची रेलचेल नव्हती. त्यामुळे सायकलचे महत्त्व कित्येक पटीने जास्त होते. सर्वसामान्यांना परवडणारी त्या वेळचे एकमेव वाहन होते. चालण्यापेक्षा वेगाने प्रवास, शिवाय शारीरिक व्यायाम यामुळे सायकल सर्वसामान्य मध्यमवर्गात अतिशय लोकप्रिय होती.
                           सायकल वापरण्यासाठी आधी ती चालवायला शिकावी लागेआणि सायकल शिकणे म्हणजे काय होते हे मागच्या चाकाला आधाराची दोन चाके लावून न पडता मिरवणाऱ्या आजच्या मुलांना करणार नाही. पडल्याशिवाय आणि कोपर-गुडघा फुटला शिवाय सायकल शिकता येत नाही अशी आमची श्रद्धा होती आणि बहुतेक वेळा पडणे हे ठरलेले होतेकारण त्यावेळी तीनच प्रकारच्या सायकली होत्या२२ इंची२४ इंची आणि लेडीज सायकल ज्या फक्त मोठ्या व्यक्तींना वापरता येतील अशाच उपलब्ध होत्या. त्यामुळे शिकताना धडपड ही व्हायचीच.
                     सायकल शिकणे हा आमच्या वेळी खूप मोठा कोर्स होता. सुरुवातीला काही दिवस आम्ही फक्त सायकल धरून फिरवत असू. झेपते की नाही हे बघण्यासाठी. नंतर सायकलच्या पॅडल वर एक पाय ठेवून दुसर्‍या पायाने जमीन ढकलून पुढे जाण्यात काही दिवस जायचे. मग तिसऱ्या टप्प्यात नळीतून पाय घालून दोन्ही पॅडल अर्धे-अर्धे मारणे हा खूप मोठा टास्क असे. सायकल शिकताना पडण्याचा हा खरा टप्पा, कारण सायकलचा तोल सांभाळणे, पुढे बघणेपॅडल मारणे, या तीन क्रिया एका वेळी कराव्या लागत त्यामुळे बहुतेक जणांचे कोपर-गुडघे याचवेळी फुटत होते. हे करताना घरातील मोठे कोणीतरी किंवा मित्र सायकल पाठीमागून धरत व तू चालव बिनधास्त म्हणून हळूच सोडून देत. ही क्रिया यशस्वीरित्या पार केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे पॅडल पूर्ण गोलाकार फिरवणे. हे जमले की सायकल चालवायला शिकलो, पण किती दिवस असे नळीतून चालणार मग आता नळीवरून पाय टाकून सायकल चालवणे ही पुढची पायरी. मला आठवते मी सायकल चालवायला न गुडघा-कोपर फुटता शिकलो, पण ज्यावेळी नळीवरून पाय टाकून शिकण्याचे धाडस केले. त्यावेळी वरून पाय दुसऱ्या बाजूला जाईना आणि मी तसाच डायरेक्ट एका खड्ड्यात जाऊन उतरलो. म्हणूनच म्हणतोय सायकल शिकताना पडावे हे लागत होते. शास्त्र होत ते.................
                           त्यानंतर मग फायनल टच, सीटवर बसून सायकल चालवणे हे झाले, की तुम्ही यशस्वीरित्या सायकल शिकला हे सगळ्या गल्लीला कळायचे. परीक्षेत नंबर आल्यासारखे सायकल शिकलोहे आम्ही सर्वाना सांगत सुटायचो. मग यात स्वतःची कलात्मक सुधारणा म्हणून कॅरेजवरून सायकल चालवणे, हात सोडून सायकल चालवणे, टिब्बल सीट सायकल चालवणे असले आगाऊपणा करत होतो.
                           आता मुलांना दोन-तीन वर्षापासून विविध आकारात  रूपात सायकल उपलब्ध होतात. आम्हाला मात्र आयुष्यात लाईफ टाईम एकच सायकल मिळायची त्यामुळे तिचे महत्त्व खूप होते. काही जणांना ती ही मिळत नसे अशा वेळी आम्ही १-२ रुपयाला एक तास अशी भाड्याने सायकल घेऊन फिरत असू. त्यासाठीही सायकल दुकानदाराकडे वेटिंग असे. १ रुपयात मिळालेली सायकल फिरवताना ना उन्हाचा त्रास होता ना तहान-भूकेची जाणिव. सायकल ची उपयुक्तता आमच्यासाठी खूप होती. शाळेत जाणे, मित्रांसोबत फिरायला जाणे, शेतातून ओझे बांधून आणणे, बाजार, दुकानचे साहित्य आणणे यासारख्या अनेक कामात ती सदैव सोबत होती. पंपाने चाकात हवा मारताना जो त्रास व्हायचा तो नंतर सायकल चालवण्याच्या आनंदात विरून जात होता.
                       आताही मुले सायकल वापरतात पण त्यासाठी त्यांना एवढी कसरत करावी लागत नाही, शिवाय १२-१३ वर्षांची झाली ती घरातील मोटरसायकलमुळे सायकलवरचे प्रेम घट्ट व्हायच्या आधीच ती अडगळीच्या जागेत पडते व तीची  जागा दुचाकी घेते.
                        असो प्रत्येक पिढीतील प्रगतीची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. आज आपण वेगवेगळ्या प्रकारची वाहने वापरतो पण रस्त्यावर २२/२४ इंची सायकल चालवणारा व्यक्ती दिसतो त्यावेळी जुन्या आठवणी ताज्या होतात. पाठीच्या आणि मानेचा पट्ट्यासह एसी गाडीत बसून गुळगुळीत रस्त्यावरून जाताना खडबडीत कच्या  रस्त्यावर भर उन्हात दचके खात चालवलेली सायकल आजही भारी वाटते.

🖋️संदिप कोळी.....
📱9730410154


                       



आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...