प्रेरणादायी शिवचरित्र
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांस आधारु I
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी II
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत I
पुण्यवंत
आणि जयवंत,
जाणता राजा II
नवीन वर्षात फेब्रुवारी उजाडला की
धामधूम सुरू होते ती शिवजयंतीची. “जगात
भारी १९
फेब्रुवारी ”म्हणत
उत्साहाला उधाण येते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
मराठी स्वराज्याचे पहिले छत्रपती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती. गेल्या पंधरा दिवसापासूनच शिवजन्म उत्सवाच्या
तयारीला सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा
जन्म आपल्या महाराष्ट्रसाठीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानसाठी एक सुवर्ण सत्य होते. छत्रपती शिवाजी महाराज
प्रत्येकासाठी वेगळे होते.
अखंड स्फूर्तीचा झरा असणारे छत्रपती शिवराय म्हणजे एक चालते बोलते
विद्यापीठ होते व आहेत,
जे गेली ३५०
वर्ष आपले कार्य, कर्तृत्व
आणि स्फूर्तीने अखंड प्रेरणा व मार्गदर्शन करत आहेत. शिवचरित्रातून काय शिकावे हे प्रत्येकावर
अवलंबून आहे,
पण शिवचरित्रातून अनेक गोष्टी शिकाव्यात हे मात्र नक्की.........
निर्णय; शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील एक अजोड पैलू. गुलामगिरीच्या विळख्यात
सापडलेल्या मराठी रयतेसाठी
स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला तो अगदी बालवयात पण या
घेतलेल्या निर्णयाला सत्यात उतरवण्यासाठी ते अखंड झटत राहिले. एकदा निर्णय घेतल्यानंतर
तो यशस्वी होईपर्यंत जगण्याची ऊर्जा शिवचरित्र आपल्याला देते.
धाडस; स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणे व सत्यात
उतवणे हे धाडस शिवरायांनी
करून दाखवले.
ठरवलेल्या ध्येयात अडचणी
या असणारच आहेत, पण त्या अडचणींना
धाडसाने तोंड देऊन सामर्थ्याने सोडवण्याचे कसब शिवचरित्र आपल्याला
शिकवते.
नियोजनपूर्वक धाडस शिवरायांची नित्य प्रवृत्ती होती. छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जीवन काळात अशी
अनेक संकटे आली पण या संकटांना धाडसाने तोंड दिले. आपल्याला ही यशस्वी होण्यासाठी असे नियोजनपूर्वक धाडस
करावे लागेल.
नेतृत्व; छत्रपती शिवाजी
महाराजांनी नेतृत्व कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण दिले. स्वराज्यासाठी लढणारी व प्रसंगी मरणाला
पत्करणारे निष्ठावान माणसे राजांनी
बांधली. अफजलखानाची भेट, शास्ताखानाचा प्रसंग, पन्हाळा लढा अशा अनेक मोहिमा व कठीण
प्रसंगात राजांनी स्वतः नेतृत्व केले.
स्वराज्यासाठी लढण्याचा आत्मविश्वास जनतेत जागा करणारे युगप्रवर्तक नेतृत्व
शिवचरित्र आपल्याला शिकवते.
नेतृत्व हे सर्वमान्य व सर्वसमावेशक असावे.
नावीन्य; आपली शक्तिस्थळे व कमतरता या
दोन्ही गोष्टी राजांना अचूक ठाऊक होत्या, त्यामुळे शत्रूवर मात करण्यासाठी काहीतरी
नवीन करण्यावर त्यांचा भर होता.
गनिमी कावा हे त्यांचे जगाने गौरवलेले अभिनव युद्धतंत्र नाविन्याचा अविष्कार आहे. आपल्याकडे
असणाऱ्या गोष्टीतून सतत नाविन्याचा शोध घेण्याचा धडा शिवचरित्र आपल्याला देते.
माघार; लांब उडी मारायची असेल तर चार पावले मागे
घ्यावीच लागतात.
प्रत्येक वेळी आपण जिंकू किंवा यशस्वी होऊ असे होत नाही. काही
वेळा माघार घेऊन नव्याने उभारी घेता
येते हे शिवाजी महाराजांनी शिकवले. माघार
घेणे म्हणजे क्षणभराची उसंत घेणे,
तयारीसाठी, हे शिवचरित्र आपल्याला शिकवते.
प्रशासन; आपले काम किती चांगले हे लोकांच्या
आनंदावर ठरते.
प्रशासनात पारदर्शकता असल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन होत नाही. महाराजांनी स्वराज्यात
कर रचना,
चोख शासन, स्त्रियांना सुरक्षितता, धर्माचा आदर व
न्यायप्रियता यातून प्रशासन सांभाळले.
आपल्याला ही यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामात चोख प्रशासन असणे गरजेचे आहे हे शिवचरित्रातून आपल्याला
कळते.
दूरदृष्टी; समोर दिसते ते पाहणे ती
दृष्टी व जे दिसत नाही ते पाहणे म्हणजे दूरदृष्टी. शिवराय आपल्याला दूरदृष्टी
आपल्या चरित्रातून शिकवतात.
समुद्रातील आरमार हे शिवाजी
महाराजांच्या दूरदृष्टीचे एक मोठे उदाहरण आहे. आपण ही फक्त सध्याचा विचार न करता येणाऱ्या अडचणी व संधी यांचा विचार
केला पाहिजे.
यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी हा महत्त्वाचा पैलू आहे.
योजना; एखादी गोष्ट करण्यासाठी पूर्वतयारी किती
महत्त्वाची हे शिवचरित्र शिकवते.
शिवरायांनी आपल्या प्रत्येक मोहिमेची सूक्ष्म तयारी केली होती. येणाऱ्या अडचणी, धोके जाणून त्याची पूर्वतयारी
आयुष्याचा खूप मोठा भाग आहे.
युद्ध फक्त मैदानावर जिंकता येत नसते,
तर त्याचा पाया हा त्याच्या पूर्वतयारीत असतो. आपण ही अनेक गोष्टी करतो
पण त्या करण्यापूर्वी त्याचे सूक्ष्म
नियोजन करून मग करावे ही शिवचरित्र आपल्याला शिकवते.
छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या स्वातंत्र्याचे
राजे होते.
शिवचरित्र हा एक प्रेरणादायी अध्याय आहे. कर्तव्य, संघर्ष, प्रशासन, प्रेरणा, धाडस, मार्गदर्शन, नियोजन, ऊर्जा, विश्वास, संयम, निष्ठा, नेतृत्व, युद्धतज्ञ, दूरदृष्टी, सामर्थ्य, युक्ती, आत्मविश्वास, मोठ्यांचा आदर, अध्यात्म, गुरुनिष्ठा, नाविन्य, कर्तृत्व,
जनप्रियता
यासारख्या अनेक पैलूने ते घडले आहे आणि या सर्व
छटांचा एक चेहरा म्हणजे युगपुरुष
छत्रपती शिवाजी
महाराज.
शिवजयंतीच्या निमित्ताने
जन्मोत्सवाच्या या मंगल वातावरणात शिवचरित्राचे काही पैलू जरी अंगीकारले तरीही
आपल्यासाठी खूप अभिमानाची व व्यक्तिमत्व संपन्न करणारी नवसंजीवनी ठरेल.
संदिप कोळी
Nice
ReplyDeleteKhup sundar shiv charitra
ReplyDelete