राजमाता
जिजाऊ
आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा असते. प्रेम, वात्सल्य, त्याग, सहनशक्ती,
प्रेरणा, निर्णय, धैर्य, सामर्थ्य यांचा संयोग म्हणजे माता होय. आणि या सर्व गुणांचे सर्वात
मोठे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वराज्यजननी
जिजाबाई शाहजीराजे भोसले म्हणजेच राजमाता जिजाऊ होय.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल
परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.
स्वराज्य संकल्पनेची प्रेरणा जिजाऊनी शिवरायांच्या मनामध्ये जागवली. मोगलाच्या
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतःचे स्वराज्य निर्माण करणे किती महत्वाचे आहे याची
जाणिव शिवरायांना करून दिली. स्वराज्य निर्माण करण्यासाठीचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांच्यामध्ये
निर्माण केला.
महाराष्ट्रात विदर्भातील बुलढाणा
जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सिंदखेड गावातील कर्तबगार मराठे लखुजीराजे जाधव व
म्हाळसाराणी या राजघराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊंचा जन्म झाला. सिंदखेड मध्येच त्यांनी राजनीति, युद्धकलेत
प्राविण्य यासारखी कौशल्य अवगत केली होती. जिजाऊना याचा उपयोग पुढे शिवरायांना
शिक्षण देण्याच्या कामी आला.
डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
इ. सन १६३० मध्ये शिवनेरी
किल्ल्यावर छत्रपती शिवाजींचा जन्म झाला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाऊ पुण्याला
रहायला आल्या. तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. शहाजीराजांचे विश्वासू
सहकारी दादोजी कोंडदेव यांच्या मदतीने पुणे शहराचा पुनर्विकास केला. शिवाजीराजांना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी
जिजाऊंनी खंबीर मार्गदर्शन केले. राष्ट्र आणि धर्म संस्कार करण्यासाठी जाऊन
त्यांना महाभारत आणि रामायणामधील कथा सांगत न्यायनिवाडा करण्याचे धडे शिवाजी
महाराजांना मातेकडून प्राप्त झाले.
कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव
मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा होण्यापाठीमागे जिजाऊंचे
संस्कार कारणीभूत होते. जिजाऊंनी शिवरायांना राजनीती, समान न्याय देण्याची वृत्ती
आणि अन्याय करणार्याला कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिले होते. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर जिजाऊनी
बारकाईने लक्ष ठेवले होते.
शिवरायांचे ८ विवाह
करण्यामागे देखील विखुरलेला मराठी समाजाला एकत्र करणे हाच मुख्य उद्देश होता. शिवाजी महाराज आग्राला
मुघल बादशहाच्या कैदेत असताना स्वराज्याची
सूत्रे जिजाऊ मातेचा हाती होती. जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून हिंदवी
स्वराज्याच्या आड येणार्या प्रत्येक शत्रूशी लढण्याचे धैर्य छत्रपती शिवाजींना
मिळाले. प्रत्येक पराक्रमी पुरुषाने पारतंत्र्यातअसणाऱ्यांना स्वातंत्र मिळवून
दिले पाहिजे याची शिकवण राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिली.
शहाजीराजांची कैद व
सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका, वेळोवेळी निर्माण होणारे राजकीय पेच अशा
अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या मोहिमांवर असताना
खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून
कर्तृत्वाचा वसा घेतात पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत
त्यांनी दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या.
जिजाऊनी केलेल्या या
संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवाजीराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून
काढली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची,
प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्यांना राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ
लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदीवी
स्वराज्यत शेवटचा श्वास घेतला.
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या व छत्रपती
शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने ते सत्यात उतरवणाऱ्या स्वराज्यजननी राजमाता जिजाऊना
मानाचा मुजरा.....
-संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment