Tuesday, 16 February 2021

Netaji Subhash chndra Bose : नेताजी सुभाषचंद्र बोस

 

नेताजी सुभाषचंद्र बोस

                “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा” या प्रेरणादायी शब्दात स्वातंत्र्याविषयी यल्गार करून स्वातंत्र्याची धगधगती मशाल समस्त भारतीयाच्या मनात भडकवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होय.  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास खूप मोठा आहे. अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपापल्या परीने व पद्धतीने स्वतंत्र लढ्यात योगदान दिले आहे. याच स्वातंत्र्य लढ्याच्या अग्रभागी असलेले सुभाषबाबू एक महत्वाचे नाव होते.

       सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता.

           लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नावाच्या शाळेत शिकत होते. शाळेमध्ये असतानाच सुभाषबाबूंच्या मध्ये सुप्त देशभक्ती जागृत झाली. वयाच्या १५व्या वर्षी, सुभाषबाबू गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाषबाबू त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली. महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागतात म्हणून सुभाषबाबूंनी महाविद्यालयात संप पुकारला होता. १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

                 भारतात परतल्यानंतर सुभाषबाबूंनी महात्मा गांधीजींची भेट घेतली. त्यावेळी असहकार चळवळ सुरु होती. चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषबाबूंची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार सुभाषबाबू  चित्तरंजन दास यांच्यासोबत काम करू लागले. दोघांनी मिळून बंगाल प्रांतात असहकार चळवळीचे नेतृत्व केले. सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले

                सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा या दोन वेळा राष्ट्रीय सभेचेअध्यक्ष होते. १९३९ मध्ये सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या आपल्या पक्षाची स्थापना केली. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला.  सर्वप्रथम १९२१ साली त्यांना चित्तरंजन दास याच्यासोबत सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. सुभाषबाबूंच्या मनातील मार्ग ओळखून ब्रिटीशांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगात डांबले.

               १९४१ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुभाषबाबूंना इंग्रजांनी तुरुंगातून बाहेर आणून नजरकैदेत ठेवले. इंग्रजांच्या नजरकैदेतून सुभाषबाबू वेषांतर करून स्वतःची सुटका करून घेतली. ते जर्मनीला जाऊन पोहचले. १९४२ मध्ये  सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.

            त्यांनतर १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये नेताजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. रास बिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले. नेताजीनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिशाविरुद्ध युद्ध पुकारले. १९४३ मध्ये जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून घेतली. त्यांनी इंफाळ व कोहिमापर्यंत मजल मारली. आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. जपान कडून मिळणारी मदत बंद झाल्यावर आझाद हिंद सेनेच्या अडचणी वाढू लागल्या.

                १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका व लढा खूप महत्वाचा होता. भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राच्या राष्ट्रभक्तीच्या स्मृती आपल्या सर्वांच्या मनात कायम जागृत राहतील.

 

-संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

          

         

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...