महात्मा जोतीबा
फुले
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
या ओळीत विद्येचे महत्व
सांगणारे महात्मा जोतीबा फुले महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक थोर लेखक,
विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी महाराष्ट्रातील
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संस्था
स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी
विचारांची मांडणी केली.
महात्मा जोतिबा फुले यांचे
पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. वडिलांचे
नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते
फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्हेन हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी,
पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते.
जोतीराव लहान होते,
तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या
१३ वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी
विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश
मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख,
त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
बहुजन
समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य
आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय
केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात
महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी
पत्नी-सावित्रीबाईंवर यांच्यावर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी
शाळा सुरू केल्या. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले.
२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी
सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील
समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
मानवी हक्कावर सन १७९१
मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव
त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले.
त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील
मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी
होईल असे त्यांचे निश्चित मत व अनुमान होते.
महात्मा फुले यांनी
विपुल लेखन केले आहे. समाजातील विविध समस्या व सामाजिक भान ठेऊन त्यांनी लेखन केले.
शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि
दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते.
आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित
केला. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा
ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
महात्मा फुले यांचे
सामाजिक,
शैक्षणिक कार्य, त्याचे विचार समाजसेवा यामुळे मुंबईच्या जनतेने ११ में १९८८
रोजी त्यांचा सत्कार करून ‘महात्मा’ ही
पदवी बहाल केली. तेव्हापासून जोतीबा फुले हे महात्मा जोतीबा फुले झाले. २८
नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे म. फुले यांचे निधन झाले.
महात्मा जोतीराव फुले
यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नां नी घडविले होते.
त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी
ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक
भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील
असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध
ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते
-संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment