बालदिन / पं .जवाहरलाल नेहरू
“कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती
होती,
मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत
जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या
पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…”
कवितेच्या या सुंदर ओळी बालपणाचे महत्व सांगतात.
प्रत्येकाच्या आयुष्याचा एक सुवर्णकाळ म्हणजे त्याचे बालपण होय. हेच सर्वाना
आवडणारे बालपण जगणे आणि जपणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांचे हक्क आणि
मुलांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी व समाजात जागरूकता वाढवण्यासाठी १४
नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
१४
नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म
दिवस होय. पं. जवाहरलाल नेहरू लहान मुलांच्यामध्ये रमायचे. त्यांच्या लाघवी
स्वभावामुळे मुलानाही ते आपलेसे वाटायचे. पं. नेहरू लहान मुलांच्या सोबत आपुलकीने
गप्पा मारायचे. त्यांना लहान मुलांच्या विषयी विशेष प्रेम होते. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य
आहेत हे त्याचे स्पष्ट मत होते आणि त्यामुळेच १४ नोव्हेंबर १९६५ पासून पंडीत
जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो.
बाल्यावस्थेचा काळ हा संस्काराचा काळ असतो. मातीच्या गोळ्याप्रमाणे
असणाऱ्या लहान मुलांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते भविष्यात देशाचे
आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पं. नेहरूंनी बालकांसाठी विविध योजना तयार
केल्या.
बालदिन साजरा करताना आपण पं.
नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुला-मुलींना सुरक्षित आणि
प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. त्यांना आपल्या आवडी-निवडी, छंद, कला
जोपासण्यासाठी समान व योग्य संधी मिळायला हवी. आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि
पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधी ही मोठ्या प्रमाणात मिळाल्या
पाहिजेत.
बालकानाही आनंद घेण्याचा, मौजमजा,मस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या
मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक
तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या आपल्या मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही
सहभागी करून घेण्याबाबतची जाणिव मुलांच्या
मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतील. याशिवाय त्यामुळे
वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या बालकालाही आपल्या प्रयत्नामुळे चांगले
आयुष्य मिळू शकेल.
बालदिनाच्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. शाळेमध्ये
विद्यार्थ्याच्यासाठी विविध स्पर्धा
आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्याच्या
मनोरंजनासाठी व अभिव्यक्तीसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. सरकार मार्फत विविध
कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
बालदिन हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो वर्षभर साजरा करण्यात यावा.
भारतासारख्या विकसनशील देशात बालकांच्या बाबतच्या विविध समस्या व अडचणी सातत्याने
दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे खूप गरजेचे आहे. बालकांचे हक्क व त्यांच्या
आवडी-निवडी जोपासण्यात याव्यात.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांच्याविषयी
वाटणाऱ्या प्रेमाची आठवण व बालकांच्या हक्काची जाणिव यासाठी १४ नोव्हेबर हा दिवस
बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो.
-संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment