Tuesday, 16 February 2021

Savitribai Phule : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.

 

                  ज्या काळत स्त्रीच समाजातील  महत्व म्हणजे फक्त चूल आणि मुल सांभाळणे इतकेच होते.  शिक्षण ही दूर-दूर पर्यंत स्त्रियांशी संबंधित बाब मानली जात नव्हती. स्त्रियांना कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले जात नव्हते. स्त्रियांच्या मताचा फारसा आदर केला जात नव्हता अशा पुरुष प्रधान समाजरचनेत ज्ञानाची धगधगती मशाल घेऊन अज्ञानाचा अंधकार दूर करून स्त्रियांच्या जीवनात ज्ञानाची, आशेची व सन्मानाची ज्योत पेटवणाऱ्या व पेटवलेली ज्ञानाची सन्मानरुपी ज्योत अखंड तेवत ठेऊन स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.

होय.

            सावित्रीबाई फुले या महाष्ट्रातील थोर समाजसुधारक व सत्यशोधक समाजाचे  प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी होय. ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. सावित्रीबाईचा जन्म सातारा जिल्हातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्या काळात बालविवाहाची परत होती. सन १८४० साली सावित्रीबाई फुले नऊ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतीराव फुले हे १३ वर्षाचे होते.

                     स्त्रियांनी शिकावे अशी जोतीराव फुले यांची इच्छा होती. विवाहनंतर जोतिबांनी आपल्या पत्नीपासून स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. जोतिबांनी सावित्रीबाईना वाचायला-लिहायला शिकवले. महात्मा जोतीराव  फुले आणि सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचा पाया घातला. प्राचीन काळात स्त्रियांना घराच्या बाहेर आणि शिक्षण घेण्यासाठी पाठवले जात नव्हते. तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी या विरुद्ध आवाज उठवला.

१ जानेवारी, १८४८ साली जोतीराव फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. परंतु त्यांना शिकवण्याचे धाडस कोणी केले नाही. तेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत जावून शिकवू लागल्या. जेव्हा त्या शाळेत शिकवायला जात असताना पुण्यातले अति कर्मठ लोक त्यांच्यावर दगडफेक, शेण आणि चिखल फेकत असत. परंतु सावित्रीबाई फुले यांनी या सगळ्या समस्यांना धीराने तोंड दिले आणि त्यांनी शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या.

                    प्राचीन काळामध्ये समाजात विविध प्रथा रूढ होत्या. बाल विवाह, सती प्रथा, केशवपन या सर्व प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे. तसेच या प्रथांच्या नावाखाली स्त्रियांवर अत्याचार होत असे. म्हणून त्यांनी स्त्रियांना होणाऱ्या क्रूर प्रथांना विरोध केला. बाल जरठ या प्रथेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत. त्यांचे केशवपन करून त्यान कुरूप बनविण्यात येत असे. विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात नाभिकांचा  संप घडवून आणला

                     जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी जोतीराव फुले यांना सहकार्य केले. सन १८७५ -१८७७ मध्ये दुष्काळात दुष्काळ ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अन्नछत्रे चालवली. तसेच अनेक अनाथ स्त्रियांना सत्यशोधक समाजाने आश्रय दिला. समाज जागृतीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली. सावित्रीबाईनी काव्यफुले आणि बावनकशी हे काव्यसंग्रह लिहिले. तसेच सावित्रीबाईंची गाणी (१८९१), सुबोध रत्नाकर ही पुस्तके प्रकशित आहेत.     

          सावित्रीबाई आणि जोतीराव यांना स्वतःचे अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत  नावाच्या  मुलाला दत्तक घेतले. 

                   सन १८९६ साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. म्हणून लोकांची मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात एक दवाखाना सुरु केला. आणि रोग्यांची सेवा करू लागल्या. परंतु याची लागण त्यांना झाली आणि १० मार्च, १८९७ साली सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

                      सावित्रीबाई फुले ह्या एक महान समाज सुधारक आणि पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्यातील मोलाच्या योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस हा बालिकादिनम्हणून साजरा केला जातो. शिवाय महाराष्ट्र शासनाने आता त्यांचा जन्म दिवस महिला शिक्षका दिन म्हणून साजरा करण्याचे योजले आहे.

 

   -संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

 

 

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...