Tuesday, 16 February 2021

Diwali : दिवाळी

दिवाळी

आभाळी सजला मोत्यांचा चुरा

दारी दिव्यांचा सोनेरी सडा

गंध गहिरा दरवळला उठण्याचा

आला दिवाळसण आनंद लुटण्याचा

                         भारतीय लोक हे उत्सवप्रिय लोक म्हणून ओळखले जातात. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे अनेक सण व उत्सव लोक आवडीने उत्साहाने साजरे करतात. या सणाच्या माध्यमातून आपली संस्कृती, एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी व्यक्त करत असतात.

                      भारतात साजऱ्या होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा प्रमुख सण आहे. दिवाळी हा भारतातील हिंदू लोकांचा प्रमुख सण आहे. प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी साजरा केलेला उत्सव म्हणजे दिवाळी होय. तेव्हापासून आपल्याकडे दिवाळी साजरी केली जाते.

                      दिवाळीला दीपावली असेही म्हटले जाते. दिवाळी हा प्रामुख्याने दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी हा सण प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतो. या सुमारास शेतीची खरीप हंगामातील कामे संपलेली असतात. पावसाळा संपून पिके हाती आलेले असतात. साधारणपणे दिवाळी हा सहा दिवसांचा सण म्हणून साजरा केला जातो. भारतात साजऱ्या होणाऱ्या सणापैकी दिवाळी हा एक मोठा सण आहे. दिवाळीच्या सणाला भारतातील बहुतेक भागात सुट्टी असते.

                     दिवाळी या सणाची पूर्वतयारी म्हणून सर्वजण आपल्या घराची स्वच्छता करतात. घरात वेगवेगळे गोड पदार्थ, मिठाई असे खाद्यपदार्थ तयार करतात. घरातील सर्वांसाठी नवीन कपड्यांची खरेदी करतात. अंगणात आकाश दिवा व घराला विद्युत रोषणाई केली जाते. संपूर्ण घर दिव्यांनी सजवली जातात. दारामध्ये आकर्षक रांगोळी घालून अंगणे सजवली जातात.

                   वसुबारस या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी गाईची पासासह पूजा करतात. त्यानंतर चा दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी होय. या दिवशी धनाची पूजा केली जाते. तसेच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.  

                  नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस होय. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून सुवासिक उटणे, तेल लावून स्नान करतात. या दिवसापासून फटाके उडवायला सुरुवात करतात. दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे असते. घर, उद्योग, व्यवसाय, दुकान या ठिकाणी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. बाल प्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा’ हा वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस होय. या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात. भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचे उत्सव असतो. अशाप्रकारे दिवाळीतील विविध दिवस साजरे होतात.

                      दिवाळीच्या या दिवसात लोक मित्र, नातेवाईक यांच्या घरी भेट देतात. त्यांना मिठाई व भेटवस्तू देतात. महाराष्ट्रात लहान मुले दिवाळीच्या या दिवसात किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतात. यातून ऐतिहासिक वारसा मुलांच्या पर्यंत पोहोचविला जातो. भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या स्थानिक प्रथेनुसार दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो.

                   दिवाळी हा दिव्यांचा सण होय. दीपावलीच्या या सहा दिवसांमध्ये सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण असते. लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सर्वजण आपल्या समस्या, अडचणी, कामे बाजूला ठेवून या सणात सामील होतात. या सणाच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र येतात. घरातील सर्व नात्यांची वीण घट्ट होण्यासाठी मदत होते.

                भारतातील विविधतेत साजरे होणारे सण आपले महत्त्व, वैशिष्ट्यांसह साजरे होतात. दिवाळी हा सण दिव्यांचा, आनंदाचा, प्रेमाचा सण आपण उत्साहाने साजरा करूया

 

-संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com    

                                                            

 

 


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...