छत्रपती शिवाजी
महाराज
भारताच्या इतिहासात मुघल रुपी सत्ता सर्पाने पूर्ण
हिदुस्तान गिळंकृत करून टाकला होता. रयतेवर प्रचंड अत्याचार सुरु होता. स्वतःच्या
देशात आपल्याच लोकांना स्वतंत्र नव्हते. अशा अंधकार काळात स्वराज्याचा उदय करणारे
व रयतेला सुराज्याचे गोड अनुभव देऊन पारतंत्र्यातून मुक्त करणारे युगपुरुष म्हणजेच
छत्रपती शिवाजी महाराज होय.
शिवाजी महाराजांचा जन्म समस्त मराठी रयतेसाठी एक नवी
पहाट होती. छत्रपती शिवाजी
महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३०
रोजी पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर
झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.
जिजाऊ शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा म्हणत. शहाजी महाराज
विजापूरच्या राजाच्या सेवेत होते. पुण्यातही काही भागाचे ते जहागीरदार होते.
शिवाजी महाराज
वडिलांच्यापासून दूर असले तरी आई जिजाऊच्या मायेच्या व संस्काराच्या छत्रछाये खाली
होते. आई जिजाऊ अतिशय धार्मिक
आणि महत्वाकांक्षी होत्या. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि
न्यायासाठी लढायला शिकवले. आई जिजाऊंची शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती
आणि त्यांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता. सन १६४०
मध्ये शिवरायांच्या विवाह सईबाई यांच्याशी झाला.
लहानपणापासूनचे संस्कार,
स्वराज्याची जाणिव व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांच्या यशाची घौडदौड
सुरु झाली. शिवाजी महाराजांच्या
अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या फिरून आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. व स्वराज्य निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरायला सुरुवात झाली.
हेच मावळे शिवरायांच्या
स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते.
स्वराज्य प्रतिज्ञेनंतर काही वर्षातच शिवाजी महाराजांनी
आदिलशाहीतील पुण्याच्या जवळील चाकण, कोंढाणा, तोरणा, तसेच सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता.
शिवाजी महाराजांच्या ह्या पराक्रमामुळे आदिलशाही
अस्वस्थ झाली.
शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे ह्याची
जाणीव झाली.
शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड चालू ठेऊन
जावळी खोरे जिंकून घेतले. ह्या घटनेने आदिलशहा चा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या
शक्तिशाली सरदार अफजल खान ह्याला शिवरायांना पराभूत करण्यासाठी पाठवले. अफजल खान व शिवाजी महाराज
यांची भेट प्रतापगडाच्या
पायथ्याशी नियोजित होती. भेटीसाठी बोलावलेल्या अफजलखानाने शिवाजी महाराजांना
मारण्याचा प्रयत्न केला पण शिवाजी राजांना याची जाणिव होती. शिवाजी महाराजांनी
प्रतिहल्ला केला. खानाचा कोथळा बाहेर काढला व खान
कोसळला. शिवाजी महाराजांवर हल्ला झाला हे समजताच जंगलात लपलेल्या
मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे
खानाचं सैन्य बिथरले आणि मारले गेले.
अचानक हल्ला करण्याच्या या
युद्धपद्धतीला गनिमी कावा म्हणतात. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ह्याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक
लढाया जिंकल्या. गनिमी कावा ही पद्धत आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये
वापरली जाते. त्यानंतर पन्हाळा,
पुरंदरचा तह, आग्रा कैद, सिंहगड लढा, घोडखिंड, कर्नाटक स्वारी असे अनेक पराक्रम
शिवाजी राजे व त्याच्या निष्ठावान मावळ्यांनी गाजवले व मुघलांना सळो की पळो करून
सोडले. या लढायांमध्ये तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद
यासारख्या वीरांनी स्वराज्यासाठी आपले प्राण दिले.
सामर्थशाली
असे मराठा साम्राज्य दूरवर पसरवल्यांनतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा
निर्णय घेतला. ६ जुन १६७४ रोजी रायगडवर आयोजीत राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी
महाराजांच्या मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरव करण्यात आला. ह्या
राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, शककर्ते, क्षत्रिय कुलावतंस आणि हिंदू धर्मोद्धारक अशा नावांनी गौरव
करण्यात आला. चार दशके स्वराज्यासाठी लढल्यांनतर ३ एप्रिल १६८०
रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल राज्यकर्त,
एक धर्मनिरपेक्ष नेता आणि लष्करी दूरदृष्टी असणारे राजे होते. भारतीय नौदलाचे जनक म्हणून त्यांना ओळखले
जाते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरु केले. शिवरायांनी आपल्या स्वराज्यात समानतेचे तत्व जोपासले. अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय
धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच
शिवाजी महाराज हे युगपुरुष होते असे म्हणणे सार्थ ठरते.
-संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment