Friday, 26 February 2021

Rajbhasha Marathi Din : राजभाषा मराठी दिन

माझी भाषा : राजभाषा मराठी

Today is मराठी भाषा day...फुल्ल सेलिब्रेशन करायचं, खूप प्रोग्रॅम्स आहेत आपल्याकडे.

होय ना.... हल्ली असंच मराठी बोलतो आपण.

                   आधुनिकीकरण आणि आपले भाषाज्ञान दाखवण्याच्या वेडात आपण भाषेची पूर्ण भेसळ करून टाकतो. याला आधुनिकतेची किनार लावली की झालो आपण भाषासमृद्ध असेच बऱ्याचदा आपल्याला वाटते. पण तसं नाही. मराठीच नव्हे तर जगातील प्रत्येक भाषा वेगळी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्या भाषेची विविधता आहे, गोडी आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे, साहित्य आहे. एकूणच तिला स्वतंत्र अस्तित्व आणि मान आहे. पण आपण काय करतो सगळ्याची मोडतोड करून विचित्र भाषा जन्माला घालतो आणि तिचेच कौतुक करतो.

परवा रेडिओ वर एक वाक्य ऐकले " काल मी गोष्ट read केली." या वाक्यात read ऐवजी वाचली असा शब्द वापरला असता तर काय बिघडले असते पण नाही भाषा बिघडवण्याचा छंदच लागला आहे सध्या.

माझा कोणत्या भाषेला विरोध नाही. पण तिचा वापर योग्य झाला पाहिजे.

                   आज राजभाषा मराठी दिन आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब. पण ती फक्त आजच्या दिवसासाठी नसावी तर ती कायम राहावी. संत ज्ञानेश्वर म्हणतात "अमृताशी पैजा जिंकेल मराठी माझी" आणि अशी समृद्ध भाषा आपली मातृभाषा आहे याचा अभिमान आहे. इतर भाषा यायला पाहिजेत शिकायला पाहिजेत हे 100 टक्के मान्य पण याचा अर्थ आपण आपली भाषा कमी समजणे हे चुकीचे आहे. 

 

                   सध्या मराठी सोडून इतर भाषा बोलण्यावर मराठी माणसाचा जोर आहे. यामुळे आपणच आपली सुंदर भाषा दुर्लक्षित करतोय. मराठीत पण सुंदर बोली भाषा आहेत मालवणी, कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, पुणेरी, विदर्भ, यासारख्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेची आपली स्वतंत्र गोडी व नावीन्य आहे. ते आपण जपले पाहिजे. ग्रामीण भाषा बोलले म्हणून कोणी गावंढळ होत नाही तो आपण केलेला गोड गैरसमज आहे.

                आपण बोलताना शक्य तेवढ्या मराठी शब्दचावापर करायला हवा हा आता पर्यायच नसेल तर इतर भाषेतील शब्द वापरणे क्रमप्राप्त ठरते.

 

              असो..... मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व मराठीचा अभिमान असणाऱ्या सर्वांना राजभाषा मराठी दिनाच्या मराठीतून खूप खूप ............

 

 

🖋 संदीप कोळी....

Sandip.koli35@gmail.com

 


Thursday, 25 February 2021

National Sciencce Day : २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन

 

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन

               विज्ञान हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. २८ फेब्रुवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नोबेल पारितोषिक विजेत थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही.रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी आपले संशोधन सादर केले होते. सर सी.व्ही.रमण यांच्या ‘रामन परिणाम’ या संशोधनास नोबेल पारितोषिक मिळाले होते त्याची प्रेरणा सर्व भारतीय विद्यार्थ्यांना व लोकांना मिळावी व भारतात विज्ञानाचा विकास व्हावा यासाठी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

              विज्ञान आपल्या दैनदिन जीवनाची गरज आहे. दिवसातील २४ तास आपल्याला विज्ञानाची गरज आहे. दिवसातील २४ तास आपण विज्ञानावर अवलंबून आहोत. आजचे युग हे विज्ञानाचे  युग आहे. आज सर्वत्र फक्त विज्ञानच वर्चस्व गाजवत आहे. पेनपासून- लॅपटॉपपर्यंत, घड्याळापासून- फ्रीजपर्यत, सायकलपासून – विमानापर्यंत  सर्व काही विज्ञानाचा परिणाम आहे. आज आपण विज्ञानावर शंभर टक्के अवलंबून आहोत. 

              राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दीष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि प्रेरित करणे हे आहे.  विद्यार्थ्याच्यामध्ये  विज्ञान आणि वैज्ञानिक कृतींबद्दल जागृ करणे हे आहे. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही. विज्ञानामुळे गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट होतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्याबरोबरच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.

               देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे.              राष्ट्रीय विज्ञान दिनासारख्या घटना नक्कीच वैज्ञानिक दृष्टीकोन पसरविण्यात उपयोगी ठरू शकतात. केवळ विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो. समाजात जागरूकता निर्माण व्हावी आणि विज्ञानाच्या फायद्यांविषयी वैज्ञानिक विचार निर्माण व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

 

                     या दिवशी राष्ट्रीय व इतर विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमी, शाळा व महाविद्यालये व प्रशिक्षण संस्था अशा सर्व विज्ञान संस्थांमध्ये विविध वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महत्वाच्या घटनांमध्ये भाषण, निबंध, लेखन, विज्ञान प्रश्नमंजुषा , विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र आणि वैज्ञानिकांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. विज्ञान क्षेत्रात विशेष योगदानासाठी राष्ट्रीय व इतर पुरस्कारही जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

                  मानवाची सुरुवात इतर प्राण्याच्या बरोबरच झाली पण मानवाने आपली बुद्धी व विज्ञानाच्या जोरावर सर्वाना मागे टाकून आपली प्रगती केली आहे. जीवनातील प्रत्येक अडचणीवर विज्ञानाने मात करून स्वतःचे जीवन सुखकर बनवले आहे. विज्ञानामुळे आता अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. अजूनही  विज्ञानाची प्रगती सुरूच आहे. विज्ञान हा आपल्या समाजाची कणा आहे.

                २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा दिवस नसून वर्षभर ३६५ दिवस साजरा करायला हवा. आपल्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून समाजातील व आपल्यातील अंधश्रद्धा कायमच्या संपवायला हव्यात. तेव्हाच आपला देश प्रगती करेल व जगातील एक प्रगत आणि विज्ञाननिष्ठ देश बनेल.

 

संदिप कोळी

sandip.koli@gmail.com

Marathi Language Day : २७ फेब्रुवारी राजभाषा मराठी दिन

 

२७ फेब्रुवारी राजभाषा मराठी दिन

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
"
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"

              या ओळींचा गोडवा जितका तितकाच आपल्या मातृभाषेचा गोडवा.....

ज्ञानोबांच्या शब्दात
"
माझा मराठीची बोलू कौतुके। 
परि अमृतातेहि पैजासी जिंके।"

            अशी अमृताशी पैजा घेणारा गोडवा असणारी आपली, माझी मातृभाषा मराठी. २७ ेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते लेखक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस.....

         मराठी ही भारतातील एक महत्वाची भाषा आहे. संस्कृत ही मराठीची जननी आहे. मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते.  मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज च्या काळात ती आणखी समृद्ध झाली नंतर त्यामध्ये आणखी भर पडत गेली. मराठी ही भाषा  देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.

           मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. भारतातील मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे कोटी च्या जवळपास आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.

         मराठी भाषा मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. महाराष्ट्राबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक , गुजरात राज्याच्या काही भागात, हैदराबादमध्यप्रदेशातील इंदूरग्वाल्हेर,  तामिळनाडू मधील तंजावर   दमण आणि दीवदादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील अनेक राज्यात व जगातील अनेक देशात मराठी भाषिकांची वस्ती आहे. या ठिकाणी मराठी भाषा बोलली व समजली जाते.

            मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे मराठी भाषेत ठळक फरक आद्यकाळ, यादवकाळ, बहामनी काळ, छत्रपती शिवाजी महाराजांच़ा काळ, पेशवे काळ, इंग्रजी कालखंड, स्वातंत्रोत्तर कालखंड या काळात झाला.

    मराठी ही साहित्यिक दृष्ट्या एक समृद्ध भाषा आहे. मराठी मध्ये प्राचीन काळापासून अनेक महान संत, ऋषी, साहित्यिक, लेखक यांनी विपुल असा साहित्य ठेवा निर्माण केला आहे. 'लीळाचरित्र' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील अनेक साहित्य जागतिक साहित्यात महत्वाचे साहित्य आहेत. मराठी भाषेत दरवर्षी हजारो नवीन पुस्तके प्रकाशित होतात. याबरोबर शेकडो दिवाळी अंक, अनेक नामांकित वृत्तपत्रे, मासिके, पाक्षिके, साप्ताहिके प्रकाशित होत असतात.    देशभरातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

     कथा, कादंबरी, ललित लेख, कविता, समीक्षण, प्रवास वर्णने, नाटक, एकांकिका, विनोदी साहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान कथा, बालसाहित्य, मुलाखती, चारोळीगझलओवीअभंगभजनकीर्तनपोवाडालावणी भारूडबखरपोथीतीलोकगीतगोंधळ, उखाणेवाक्‍प्रचार, म्हणी यासारख्या अनेक साहित्य प्रकारांचे विपूल लेखन मराठी भाषेत झाले आहे. अशा वैविध्यपूर्ण साहित्याने मराठी भाषेची भरभराट करण्यामध्ये मराठी लेखकांचा खूप मोठा वाट आहे. 

        मराठी भाषेच्या कोकणी, अहिराणी, माणदेशी, पुणेरी, मालवणी, वऱ्हाडी, कोल्हापुरी, तमिळनाडू राज्यातील तंजावर यासारख्या अनेक बोली भाषा आहेत. ज्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही बोलल्या जातत.

         भाषा ही संवादाचे एक माध्यम आहे. प्रत्येक भाषेची आपली वैशिष्ठे व साहित्यिक समृद्धता आहे. मराठी ही त्यातीलच एक प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेच्या या दिनाच्या निमित्ताने चला मराठी भाषेचा गोडवा टिकवूया व मराठी भाषा वाढवूया.   

            

संदिप कोळी

sandip.koli@gmail.com

Wednesday, 17 February 2021

Inspirational Shivcharitra : प्रेरणादायी शिवचरित्र

 

प्रेरणादायी शिवचरित्र

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांस आधारु I

अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी II

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत I

पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा II

                           नवीन वर्षात फेब्रुवारी उजाडला की धामधूम सुरू होते ती शिवजयंतीची. “जगात भारी १९ फेब्रुवारी म्हणत उत्साहाला उधाण येते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठी स्वराज्याचे पहिले छत्रपती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.  गेल्या पंधरा दिवसापासूनच शिवजन्म उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.  

                  छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या महाराष्ट्रसाठीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानसाठी एक सुवर्ण सत्य होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकासाठी वेगळे होते. अखंड स्फूर्तीचा झरा असणारे छत्रपती शिवराय म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ होते व आहेत, जे गेली ३५० वर्ष आपले कार्य, कर्तृत्व आणि स्फूर्तीने अखंड प्रेरणा व मार्गदर्शन करत आहेत.  शिवचरित्रातून काय शिकावे हे प्रत्येकावर अवलंबून आहे, पण शिवचरित्रातून अनेक गोष्टी शिकाव्या हे मात्र नक्की.........

                   निर्णय; शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील एक अजोड पैलू. गुलामगिरीच्या विळख्यात सापडलेल्या मराठी रयतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा  निर्णय महाराजांनी घेतला तो अगदी बालवयात पण या घेतलेल्या निर्णयाला सत्यात उतरवण्यासाठी ते अखंड झटत राहिले. एकदा निर्णय घेतल्यानंतर तो यशस्वी होईपर्यंत जगण्याची ऊर्जा शिवचरित्र आपल्याला देते.

                   धाडस; स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणे व सत्यात उतवणे हे धाडस शिवरायांनी करून दाखवले. ठरवलेल्या ध्येयात अडचणी या असणारच आहेत, पण त्या अडचणींना धाडसाने तोंड देऊन सामर्थ्याने सोडवण्याचे कस शिवचरित्र आपल्याला शिकवते. नियोजनपूर्वक धाडस शिवरायांची नित्य प्रवृत्ती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन काळात अशी अनेक संकटे आली पण या संकटांना धाडसाने तोंड दिले. आपल्याला ही यशस्वी होण्यासाठी असे नियोजनपूर्वक धाडस करावे लागेल.

                 नेतृत्व; छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण दिले. स्वराज्यासाठी लढणारी व प्रसंगी मरणाला पत्करणारे निष्ठावान माणसे राजांनी बांधली.  अफजलखानाची भेट, शास्ताखानाचा प्रसंग, पन्हाळा लढा अशा अनेक मोहिमा व कठीण प्रसंगात राजांनी स्वतः नेतृत्व केले. स्वराज्यासाठी लढण्याचा आत्मविश्वास जनतेत जागा करणारे युगप्रवर्तक नेतृत्व शिवचरित्र आपल्याला शिकवते. नेतृत्व हे सर्वमान्य व सर्वसमावेशक असावे.

                  नावीन्य; आपली शक्तिस्थळे व कमतरता या दोन्ही गोष्टी राजांना अचूक ठाऊक होत्या, त्यामुळे शत्रूवर मात करण्यासाठी काहीतरी नवीन करण्यावर त्यांचा भर होता. गनिमी कावा हे त्यांचे जगाने गौरवलेले अभिन युद्धतंत्र नाविन्याचा अविष्कार आहे. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीतून सतत नाविन्याचा शोध घेण्याचा धडा  शिवचरित्र आपल्याला देते.

                 माघार; लांब उडी मारायची असेल तर चार पावले मागे घ्यावीच लागतात. प्रत्येक वेळी आपण जिंकू किंवा यशस्वी होऊ असे होत नाही. काही वेळा माघार घेऊन नव्याने उभारी घेता येते हे शिवाजी महाराजांनी शिकवले. माघार घेणे म्हणजे क्षणभराची उसंत घेणे, तयारीसाठी, हे  शिवचरित्र आपल्याला शिकवते.

                प्रशासन; आपले काम किती चांगले हे लोकांच्या आनंदावर ठरते. प्रशासनात पारदर्शकता असल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन होत नाही. महाराजांनी स्वराज्यात कर रचना, चोख शासन, स्त्रियांना सुरक्षितता, धर्माचा आदर व न्यायप्रियता यातून प्रशासन सांभाळले. आपल्याला ही यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामात चोख प्रशासन असणे गरजेचे आहे हे शिवचरित्रातून आपल्याला कळते.

              दूरदृष्टी; समोर दिसते ते पाहणे ती दृष्टी व जे दिसत नाही ते पाहणे म्हणजे दूरदृष्टी. शिवराय आपल्याला दूरदृष्टी आपल्या चरित्रातून शिकवतात. समुद्रातील आरमार हे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे एक मोठे उदाहरण आहे. आपण ही फक्त सध्याचा  विचार न करता येणाऱ्या अडचणी व संधी यांचा विचार केला पाहिजे. यशस्वी होण्यासाठी दूरदृष्टी हा महत्त्वाचा पैलू आहे.

               योजना; एखादी गोष्ट करण्यासाठी पूर्वतयारी किती महत्त्वाची हे शिवचरित्र शिकवते. शिवरायांनी आपल्या प्रत्येक मोहिमेची सूक्ष्म तयारी केली होती. येणाऱ्या अडचणी, धोके जाणून त्याची पूर्वतयारी आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. युद्ध फक्त मैदानावर जिंकता येत नसते, तर त्याचा पाया हा त्याच्या पूर्वतयारीत असतो. आपण ही अनेक गोष्टी करतो पण त्या करण्यापूर्वी त्याचे सूक्ष्म नियोजन करून मग करावे ही शिवचरित्र आपल्याला शिकवते.

                छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या स्वातंत्र्याचे राजे होते. शिवचरित्र हा एक  प्रेरणादायी अध्याय आहे. कर्तव्य, संघर्ष, प्रशासन, प्रेरणा, धाडस, मार्गदर्शन, नियोजन, ऊर्जा, विश्वास, संयम, निष्ठा, नेतृत्व, युद्धतज्ञ, दूरदृष्टी, सामर्थ्य, युक्ती, आत्मविश्वास, मोठ्यांचा आदर, अध्यात्म, गुरुनिष्ठा, नाविन्य, कर्तृत्व, जनप्रियता यासारख्या अनेक पैलूने ते घडले आहे आणि या सर्व छटांचा एक चेहरा म्हणजे युगपुरुष  छत्रपती शिवाजी महाराज.

                  शिवजयंतीच्या निमित्ताने जन्मोत्सवाच्या या मंगल वातावरणात शिवचरित्राचे काही पैलू जरी अंगीकारले तरीही आपल्यासाठी खूप अभिमानाची व्यक्तिमत्व संपन्न करणारी नवसंजीवनी ठरेल.

 

संदिप कोळी

sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...